वास्तवाकडे पाठ फिरवणे एवढेच त्याचे राजकारण झालेले आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 10:25 AM2022-04-25T10:25:17+5:302022-04-25T10:25:34+5:30
‘पार्टनर, तुम्हारा पाॅलिटिक्स क्या है?’ आपण राजकीय भूमिका बाळगण्याचा विचार जरी केला तरी आपली चैन संपेल त्यामुळे विचारच न करण्याचा धोरणात्मक निर्णय मराठी लेखकांनी घेतलेला आहे.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, माजी अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ
उदगीरच्या संमेलनात भारत सासणे यांनी अध्यक्षीय भाषणात घेतलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा एकट, दुकट मराठी लेखक सोडला, तर बहुतांश मराठी लेखक भूमिका का घेत नाहीत, हा प्रश्न पुनः समोर आणला गेला आहे. जे घेतात ते संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्ष नसताना एरवी त्या भूमिकांचे काय करतात? अशा भूमिका बाळगू इच्छिणाऱ्या लेखकांच्या - प्रगतशील लेखक संघटनेचा अपवाद वगळता - संघटना का असत नाहीत? साहित्य संस्था मुळात लेखकांच्याच होत्या. पण, त्यांनी ते त्यांचे कामच नाही, अशी सरंजामी भूमिका बाळगत हातच्या घालवल्या. मुळात या त्यांच्याच संस्था त्यांना स्वतःच चालवाव्यात, असे का वाटत नाही? या संस्था आणि त्यांची संमेलने ज्या थोर महाभागांना रिकामटेकडेपणाचे उद्योग वाटतात ते तिथले रिकामटेकडे घालवून, कार्यप्रवण लोक आणण्यासाठी काहीच का करत नाहीत?
देशातील कोणत्याही समाजघटकांवरील अन्याय अथवा मानवाधिकार हननाच्या प्रसंगी एकेकाळी किमान निषेधासाठी तरी आमच्या पिढीतले लेखक तातडीने गोळा होत असू. तेवढेही आज लेखक करतांना का दिसत नाहीत? सत्ताकारण, वर्चस्वकारण, फक्त काहींसाठीच अमर्याद संपत्ती संचयकारणाचेच अर्थकारण, यांनीच तेवढा आजचा अवकाश व्याप्त आहे. त्याविरोधात, वंचितांच्या बाजूने लिहिणारा, बोलणारा जो त्या प्रत्येकाला विकासविरोधी, राष्ट्रविरोधी ठरवण्यापर्यंत सत्तेची मजल गेली आहे; त्याविरुद्ध मराठी लेखक संघटित भूमिका घेऊन उभे झाल्याची, केवळ प्रगतशील लेखक संघ वगळता किती उदाहरणे आहेत? माणसाचा श्वासोच्छवासदेखील नियंत्रित करून, बसल्या जागी त्याला प्रतिकार, प्रतिरोधविहीन करून गुदमरवून टाकणारे आजचे राजकीय वातावरण मराठी लेखकाला अस्वस्थ करत नाही.
आपणही संवादाचे एक प्रभावी माध्यम एकेकाळी होतो, याचेही त्याला भान आणि समज दोन्ही नाही. समकालीन राजकीय वास्तवाचे कोणतेही समर्थ आणि सक्षम पडसाद, एखाद दुसऱ्या कवीचा, तोही क्षीण अपवादवगळता मराठी कथा, कादंबऱ्यांच्या, नाटकांच्या पातळीवर समर्थपणे दिसत नाही. समकालीन जीवनभानाची उपस्थितीच तिथे नाही. उद्या या काळाचा असा वाङ्मय इतिहास बघून या काळात असे काही घडले असेल, याचा या कलात्मक पातळीवर मागमूसही आढळणार नाही, अशी कडेलोटाची अवस्था आहे.
व्यवस्थाविरोध, समाजसुधारणेच्या कित्येक लढ्यांचे विवेकी नेतृत्वच एकेकाळी मराठी साहित्यिक-कलावंतांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तोच आघाडीवर होता. दलित, ग्रामीण, आदिवासी, जन असे सामाजिक, राजकीय भानाचे साहित्य प्रवाह मराठी लेखकानेच दिले. आणीबाणीच्या विरोधाचे राजकारण असो वा नामांतराचे आंदोलन असो वा शेतकरी संघटनेचे, स्त्रीमुक्तीचे असो, अंधश्रद्धा निर्मूलनाचे किंवा कोणत्याही समाजघटकांच्या शोषणाविरुद्धचे लढे हे सारे राजकीय भान असलेल्यांनीच उभारले, हाताळले. हे सारे त्याच्या जीवनाचा अपरिहार्य भागच होते.
मात्र, या साऱ्याला कलात्मक, सृजनाच्या पातळीवर शब्द दिला तो मोठ्या प्रमाणावर केवळ मराठी कवितेनेच. वैचारिक गद्यानेच. मात्र, २,५०० वर्षांच्या अभिजात दर्जा हवा असणाऱ्या मराठी भाषेजवळ एकही नाव घेण्याजोगी ताजी राजकीय कादंबरी, नाटक नाही हे वास्तव आहे. आपण राजकीय संवेदन बाळगण्याचा विचार जरी केला तरी आपली चैन, सुरक्षा, लाभ, स्वार्थ यांना धक्का बसेल. त्यामुळे विचारच करायचा नाही, असा धोरणात्मक निर्णय जणू मराठी लेखकाने घेतलेला आहे.परिणामी कोणत्याही लहान मोठ्या संस्थांमधील निर्णय घेणाऱ्या सत्तास्थानांपासून तो सर्वोच्च राजकीय सत्तास्थानापर्यंतच्या कोणत्याही पातळीवरील अतिसामान्यदेखील राजकारणी दुखावला जाईल, अशी कोणतीच कृती करायला तो तयार नाही.
निर्भय, निर्भीड, सडेतोड हे शब्दच त्यासाठी त्याने आपल्या शब्दकोषातून काढून टाकले आहेत. उलट शक्य तेवढे त्यांचे स्तुतिपाठक होण्याचीच मिळाली तर त्याने संधी घेतली आहे. अशा लेखकांचे हे राजकारण हीच त्यांची तथाकथित राजकीय अलिप्तता. ही त्याची आवडती ‘अराजकीय’ अशी भूमिकाच आहे. आपण विचार जरी केला तरी ‘बिघडून’ जाऊ आणि चुकून आपण लिहिलेच तर आपली सुरक्षा, लाभ, सन्मान, शासकीय समित्या, पुरस्कार हे सारे गमावून बसू, या भयगंडाने तो पछाडलेला आहे. वास्तवाकडे पाठ फिरवणे एवढेच त्याचे राजकारण झालेले आहे. त्यामुळे तो भूमिकाच घेत नाही. गजानन माधव मुक्तिबोधांच्या भाषेत त्याला एवढेच विचारणे क्रमप्राप्त आहे, ‘पार्टनर, तुम्हारा पाॅलिटिक्स क्या है?’