राष्ट्रपतींची ऐतिहासिक भेट, के. आर. नारायणन यांच्यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे दुसरे राष्ट्रपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:11 AM2017-09-25T01:11:39+5:302017-09-25T01:12:27+5:30
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अलीकडची नागपूर भेट ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीला एक वेगळे महत्त्व आहे व या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात तिची ठळकपणे नोंदही होणार आहे.
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अलीकडची नागपूर भेट ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीला एक वेगळे महत्त्व आहे व या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात तिची ठळकपणे नोंदही होणार आहे. के. आर. नारायणन यांच्यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे ते दुसरे राष्ट्रपती आहेत.कोविंद हे राष्ट्रपतिपदी आरुढ झाल्यानंतर पहिल्यांदाच दीक्षाभूमीला आले. राष्ट्रपतिपद हे देशाचे सर्वोच्च संविधानिक पद आहे. त्या पदाच्या काही परंपरा आणि शिष्टाचार आहेत. या परंपरेमुळे या पदावर असलेल्या व्यक्तींना अनेक मर्यादा असतात. ती बंधने इच्छा असूनही तोडता येत नाहीत. डॉ. शंकरदयाल शर्मा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी या महामहिम व्यक्तींनी त्याबद्दलची आपली खंत अनेकदा बोलूनही दाखविली आणि प्रसंगी हे जोखड तोडण्याचा प्रयत्नही केला. डॉ. शंकरदयाल शर्मा राष्ट्रपती असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या सत्कार समारंभाला आले होते. या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार करण्यासाठी डॉ. शर्मा परंपरा झुगारुन व्यासपीठावरुन खाली उतरले आणि त्यांनी सत्कारमूर्र्तींच्या जवळ जाऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना वंदन केले. सार्वजनिक समारंभात व्यासपीठावर राष्ट्रपतींसाठी ठेवण्यात येणाºया स्वतंत्र आसन व्यवस्थेचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना प्रचंड संताप यायचा. त्यांना अशी व्यवस्था नकोशी होती. परवा राष्ट्रपती कोविंदसुद्धा अशाच साधेपणाने वावरले. राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर या पदावरील व्यक्तीला कुठे भेट द्यायची असेल तर एखाद्या राज्याच्या राजधानीला प्राधान्य द्यावे, असा शिरस्ता आहे. पण, राष्ट्रपती कोविंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेने पुनित झालेल्या दीक्षाभूमीवर सर्वप्रथम आले. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा संदेश दिला, त्या महापुरुषाचा धम्मभूमीला राष्ट्रपती कोविंद यांनी सर्वप्रथम भेट देणे, ही घटना लोकशाही प्रदान देशात ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. याच भेटीत राष्ट्रपती महोदयांनी जैन संत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचीही भेट घेतली. विद्यासागरजी महाराज यांनी यावेळी ‘इंडियाला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या’, असे राष्ट्रपतींना केलेले आवाहन वर्तमान राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. केंद्र सरकारची धोरणे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतक-याला कुमकुवत करणारी आहेत. ‘हे सरकार आपले नाही’ ही भावना गरीब माणसाच्या मनात बळावत आहे. वंचितांचा हा मोठा वर्ग आत्मनिर्भर व्हावा, ही आचार्य श्रींची कळकळ राष्ट्रपतींनाही आपली वाटावी, एवढे आत्मबळ कोविंद यांना नागपूर भेटीने नक्कीच दिले असणार.