ऐतिहासिक विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 02:54 PM2018-08-04T14:54:28+5:302018-08-04T14:56:23+5:30
जळगाव महापालिका निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. सुरेशदादा जैन यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. सुरेशदादा जैन यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे. जळगाव जिल्हा हा ‘शतप्रतिशत भाजपा’ करण्याचे नेते आणि कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अचूक नियोजन, धोरणात्मक रणनीती आणि वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, द्वेषाचे राजकारण करण्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर दिलेला भर यामुळे भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. राज्य सरकारकडून २०० कोटी रुपये आणून वर्षभरात जळगावचा विकास करुन दाखवितो, अन्यथा विधानसभेला मत मागायला येणार नाही, ही गिरीश महाजन यांची प्रतिज्ञा जळगावकरांना भावली. केंद्र व राज्य सरकार भाजपाचे असताना महापालिकेतही भाजपाचीच सत्ता आली तर जळगावचे प्रश्न मार्गी लागू शकतील, असा विश्वास देण्यात भाजपा नेते यशस्वी ठरले. महापालिका कर्जबाजारी असून हुडकोचे कर्ज, २००० गाळेधारकांचा सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळेकराराचा प्रश्न हे दोन विषय सरकारशी संबंधित आहेत. २०१३ च्या निवडणुकीतही हेच विषय होते. तरीही जळगावकरांनी सुरेशदादा जैन यांच्या आघाडीला निवडून दिले. परंतु पाच वर्षांत हे प्रश्न ‘जैसे थे’ राहिल्याने विकास कामे रखडली. याउलट अमृत पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, जळगाव-मुंबई विमानसेवा, जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, १०० खाटांचे शासकीय महिला रुग्णालय अशा योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आणून भाजपाने विकास आम्हीच करु शकतो हे पटवून दिले. सुरेशदादा जैन आणि गिरीश महाजन हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांचे स्रेहपूर्ण संबंध आहेत. एकमेकांना मदत करण्याची भूमिका त्यांची राहिली आहे. परंतु जळगाव महापालिका निवडणुकीत ‘युती’चा विषय संपल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेनेत गेलेल्या विद्यमान महापौरांसह दहा नगरसेवक, राष्टÑवादीचे ८ नगरसेवक भाजपाने ओढले. दिग्गज नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढली. त्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृह व समूहभेटीच्या माध्यमातून भाजपाविषयी विश्वास निर्माण करण्याचे कार्य केले. संपूर्ण जिल्ह्यातील भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर प्रभागनिहाय जबाबदारी देण्यात आली. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी दोनदा दौरे करुन संघटनात्मक बाबीचे नियोजन केले. त्याचा परिपाक म्हणजे हा विजय आहे. सुरेशदादा जैन यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपाठोपाठ या निवडणुकीत पराभव चाखावा लागला. जळगाववरील ४० वर्षांची सत्ता या पराभवाने संपुष्टात आली. या निकालातून जिल्ह्याचे भाजपाचे नेतृत्व एकनाथराव खडसे यांच्याकडून गिरीश महाजन यांच्याकडे चालून आले आहे. खडसे यांच्याशिवाय महाजन यांनी ही निवडणूक जिंकून दाखवली. खडसे यांनी त्यांच्या गटाच्या सहा उमेदवारांसाठी फक्त दोन दिवस सभा घेतल्या. मात्र त्यापैकी केवळ एक उमेदवार निवडून आला. खडसेंशिवाय निवडणुका जिंकता येतात, हा संदेश देण्यात महाजन यशस्वी ठरल्याने आता जळगावचे पालकमंत्रीपद मिळण्यातील अडचणदेखील दूर होण्याची शक्यता आहे.
-मिलींद कुलकर्णी