दिवाळखोरीचा इतिहास
By Admin | Published: February 1, 2017 05:36 AM2017-02-01T05:36:51+5:302017-02-01T05:36:51+5:30
इतिहास आणि मिथकांची समृद्ध परंपरा असलेला अंबाजोगाई, धर्मापुरी, पुरुषोत्तमपुरीचा परिसर आहे. याचा पुरातत्व खात्याने संगतवार अभ्यास केला नाही की, उत्खनन केले नाही.
- सुधीर महाजन
इतिहास आणि मिथकांची समृद्ध परंपरा असलेला अंबाजोगाई, धर्मापुरी, पुरुषोत्तमपुरीचा परिसर आहे. याचा पुरातत्व खात्याने संगतवार अभ्यास केला नाही की, उत्खनन केले नाही.
समृद्ध इतिहासाची अडगळ झाली की काय होते, याचे चित्र मराठवाड्यात पावलापावलावर दिसते. तेर, पैठण, भोकरदन ही शहरे प्राचीन व्यापाराचा ऐतिहासिक वारसा असणारी. याच रांगेत बीड जिल्ह्यातील धर्मापुरी, अंबाजोगाईचाही विचार करावा लागेल. परवा अंबाजोगाई पुन्हा प्रकाशात आले ते सफाई मोहिमेत सापडलेल्या शिल्पातून. या शहरात तर गल्ल्यांमधून शिल्प आहेत आणि किती तरी शिल्पे जमिनीच्या पोटात असतील.
आजही हे शहर मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. आद्यकवी मुकुंदाराज इथलेच. पासोडीकार दासोपंतांचीही कर्मभूमी हीच. या दोघांच्या समाध्या आजही जतन केल्या आहेत. परवा ज्या सकलेश्वर मंदिर परिसरात शिल्पे सापडली त्यावरून हे आठवले. या शहराचा इतिहास पाहताना राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य यांचा संदर्भ तपासायला हवा. पुढे देवगिरीच्या यादवांच्या काळातील ठोस पुरावे या मंदिरे आणि शिल्पांच्या, शिलालेखांच्या स्वरूपात आजही आहेत. यादवांचा सेनापती खोलेश्वराचे हे गाव. तो मूळचा विदर्भातील; पण येथे वास्तव्य म्हणून अंबाजोगाईनगरीचा विकास, विस्तार त्याने केला. मंदिरे उभारली, सरोवर बांधले, येथील इतिहास संशोधक डॉ. शरद हेबाळकर यांनी या शहरावर विपुल संशोधन केले आहे. या शहरात विविध ठिकाणी सात शिलालेख आहेत. खोलेश्वराचा उल्लेख वर आला. आजचे हे मंदिर मूळ सुंदरनारायणाचे विष्णू मंदिर. खोलेश्वर आणि त्याचा मुलगा राम गुजरातच्या लढाईवर गेले. याप्रसंगीच्या युद्धात राम धारातीर्थी पडला. त्याच्या स्मरणात खोलेश्वराची मुलगी लक्ष्मी हिने हे मंदिर बांधले. पुढे आक्रमणात ते उद्ध्वस्त झाले. अगदी अलीकडे म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर १९५०-५१ मध्ये येथे महादेवाची स्थापना केली आणि त्याचे नाव खोलेश्वर पडले. येथील काशीविश्वेश्वर, अमलेश्वर ही यादवांच्या काळातील १३व्या शतकातील मंदिरे आहेत. आता उत्खननानंतर प्रसिद्धीला आलेले सकलेश्वराचे मंदिर हे बाराखांबी नावाने ओळखले जाते. आक्रमणांमध्ये ते उद्ध्वस्त झाले असावे. परवा साफसफाईच्या वेळी जे खोदकाम झाले त्यात गरुड, विष्णू, स्तंभ, नर्तिका, धर्मापुरीत आहे तशी आरशात आपला चेहरा न्याहाळणारी सूरसुंदरी या मूर्ती सापडल्या. काही खांब अवशेष सापडले. मंदिरासोबत येथे शैव लेण्या आहेत. हत्तीखाना नावाने ओळखल्या जाणारी वास्तू मुळात भूचरनाथाची लेणी आहे, अशा काही शैव लेण्यांच्या इतिहासाचा धांडोळा घेण्याची गरज आहे. चित्पावनांची कुलदैवत असलेल्या योगेश्वरीचे मंदिर हे १४व्या शतकातील यादवकालीन आहे. कोकणातील चित्पावनांचे कुलदैवत पार मराठवाड्यात कसे, असा प्रश्न पडतो; पण त्यामागेही पुराणकथा आहे. परशुरामाने चितेतून पावन केल्याने चित्पावनांचा जन्म झाला; पण चितेतून जन्मलेले असल्याने त्यांना मुली देण्यास कोणी तयार नव्हते. अंबाजोगाईत त्यांना मुली देण्यास तयारी दर्शविली; पण दूरदेशी जाणाऱ्या मुली इकडे सतत याव्यात यासाठी योगेश्वरी त्यांची कुलदैवत ठरविण्याची अट त्यावेळी घातली, अशी मिथक कथा. या मंदिराचा गाभारा यादव काळाची साक्ष देतो.
इतिहास आणि मिथकांची समृद्ध परंपरा असलेला अंबाजोगाई, धर्मापुरी, पुरुषोत्तमपुरीचा परिसर आहे. याचा पुरातत्व खात्याने संगतवार अभ्यास केला नाही की, उत्खनन केले नाही. या ठिकाणी मंदिरांचे समूह आहेत. जागोजागी शिल्प आहेत. अहिल्याबाई होळकरांनी दोन-अडीचशे वर्षांपूर्वी ही दूरदृष्टी दाखविली होती. देशातील अशा शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आता या ऐतिहासिक वास्तू पुरातत्व खात्याच्या कायद्याच्या कलमांमध्ये अडकल्या आहेत. कोणी जतन करण्याचा प्रयत्न केला, तर कायद्याचा बडगा पाहावयास मिळतो; पण हे खाते एखादा रखवालदार नेमण्यापलीकडे काही करीत नाही. औरंगाबादसारख्या शहराने अशा वारशांचे जतन करण्याचे श्रम घेतले नाहीत. आपला ठेवा जतन करता येत नाही यापेक्षा दिवाळखोरी काय असते. आपण तर अशा ठिकाणांकडे दुर्लक्ष करून दिवाळखोरीचा इतिहासच निर्माण केला आहे.