‘इतिहास दरवेळी मार्गदर्शक ठरतोच असे नाही’!

By admin | Published: August 11, 2015 03:25 AM2015-08-11T03:25:11+5:302015-08-11T03:25:11+5:30

मला बऱ्याचदा काही ऐतिहासिक बोधांविषयी प्रश्न विचारला जातो. हे बोध वर्तमानात आणि भविष्यात मार्गदर्शक ठरू शकतात की नाही हे जाणून घेण्याच्या उद्देशाने बहुधा हा प्रश्न विचारला गेलेला असतो.

'History does not always guide the guide!' | ‘इतिहास दरवेळी मार्गदर्शक ठरतोच असे नाही’!

‘इतिहास दरवेळी मार्गदर्शक ठरतोच असे नाही’!

Next

 - रामचन्द्र गुहा (विख्यात इतिहासकार आणि लेखक )

मला बऱ्याचदा काही ऐतिहासिक बोधांविषयी प्रश्न विचारला जातो. हे बोध वर्तमानात आणि भविष्यात मार्गदर्शक ठरू शकतात की नाही हे जाणून घेण्याच्या उद्देशाने बहुधा हा प्रश्न विचारला गेलेला असतो. पण हा उद्देश योग्य असेल तर मग राजकारणी लोक त्यांना ज्ञात इतिहासापासून बोध घेऊन विवेकाने सत्ता का राबवू शकत नाहीत? पण याबाबत थोर प्रतिभावान आणि विद्रोही इतिहासकार ए.जे.पी.टेलर साशंक होते. एका फ्रेंच सम्राटाविषयी ते असे म्हणाले होते की, ‘एखाद्या राज्यकर्त्याने इतिहासाचा विद्यार्थी व्हावे ही अत्यंत धोकादायक बाब असावी कारण हा सम्राट इतिहासातल्या चुकांमधून हेच शिकला की आधी कोणीच केली नाही अशी चूक कशी करावी’ अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु बुश (ज्यु) हे इतिहासाबाबत सजग होते. त्यांच्या बिछान्याजवळ इतिहासातील लढाया आणि राजकारणी यांच्या संबंधीची जाड-जूड पुस्तके रचलेली असत. एकदा येल आणि हार्वर्ड विद्यापीठातल्या इतिहासाच्या प्राध्यापकांना व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यातील एजेपी टेलर वगळता इतर स्वत:च्या विद्वत्तेविषयी खूपच अभिमानी होते. त्यांच्या मते इतिहासाचे सखोल ज्ञानच वर्तमानात यशस्वी परराष्ट्र धोरण बनवण्यात उपयोगी येऊ शकते. त्यांनी बुश यांना ठामपणे सांगितले होते की इंग्लंडने १९व्या शतकात जशी जागतिक पोलिसाची भूमिका बजावली होती, तशी भूमिका अमेरिकेने २१व्या शतकात बजावली पाहिजे. पण इतिहासातून धडा घेऊन निश्चित केलेली ही भूमिका पुढे अफगाणिस्तान आणि इराकमध्ये नेमकी फसली होती! इतिहास ही मानव्यविद्या आहे, ते तांत्रिक ज्ञान नाही. इतिहासाचा उद्देश मानवी समुहाचा अभ्यास करणे आहे, सामाजिक किंवा राष्ट्रीय प्रश्न सोडवणे हा नाही. मुळात कुठलाच इतिहासकार एखाद्या राष्ट्रप्रमुखाला चांगल्या प्रकारे सत्ता कशी राबवावी यासाठी सहाय्य करू शकत नाही किंवा सल्लाही देऊ शकत नाही. त्याच प्रकारे तो एखाद्या कंपनीच्या अधिकाऱ्यालाही त्याचा उद्योग फायद्यात कसा जाईल या बाबत मार्गदर्शन करु शकत नाही. गेल्या तीस वर्षापासून मी इतिहासाचा अभ्यास करतो आहे आणि आता मी एकाच निष्कर्षाप्रत येऊन पोहोचलो आहे की, कुणीच कायमचा विजेता वा पराभूत नसतो. इतिहासाचा हाच धडा लोक नेमके विसरतात. आपण आता भारतासाठी खूप वेळ चांगली फलंदाजी करू शकत नाही हे जाणून घेण्यासाठी सचिन तेंडुलकरला किती मोठा कालावधी लागला, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. सर्वांची त्याच्याकरवी निराशा होईपर्यंत तो खेळतच राहिला. त्याच्या कसोटी सामन्यांचा आकडा २०० पर्यंत पोहोचावा म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तर वेस्ट इंडीज विरोधात कसोटी मालिका भारतातच भरवली आणि तेही डेल स्टेन आणि मोर्न मोर्केल यांना टाळत. भारतीयांनी तरीही सचिन तेंडुलकरला डोक्यावर घेतलेच होते. १९५८ साली जवाहरलाल नेहरू काश्मीरमध्ये सुट्टीसाठी गेले असता त्यांनी तिथे असे ठरवले होते की परतल्यानंतर पंतप्रधान पदातून निवृत्ती घ्यायची व नव्या चेहऱ्याला संधी द्यायची. पण परतीच्या वाटेत त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे मन वळवले व निवृत्ती घेतली गेली नाही. त्यांनी जर त्यावेळी आपला निर्णय बदलला नसता तर ते आज सगळ्यात यशस्वी राजकारणी म्हणून गणले गेले असते. कारण ब्रिटीश साम्राज्याविरुद्धच्या संघर्षात आणि भारताला स्वतंत्र लोकशाही राष्ट्र म्हणून उभे करण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. पंतप्रधानपदावर कायम राहिल्यामुळे त्यांना मुंदडा प्रकरण, केरळ सरकारची बरखास्ती आणि चीन विरुद्धची असफलता अशा नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. जर वेळीच त्यांनी नव्या चेहऱ्याला संधी दिली असती तर इतिहासाने वेगळे निष्कर्ष मांडले असते. व्यक्तींप्रमाणे शहरांच्या बाबतीत सुद्धा कष्टातून मिळवलेला नावलौकीक कसा सहजपणे घालवला जातो याचे उदाहरण म्हणजे बंगळुरु शहर. या शहराने दशकभरापूर्वी उद्योग निर्मितीसाठी सुयोग्य स्थान असा नावलौकीक प्राप्त केला होता. भारताची सिलीकॉन व्हॅली असे सुद्धा या शहराला गौरवले जाऊ लागले. इथले शांत वातावरण, सर्वव्यापी संस्कृती आणि इथे असलेल्या सुसज्ज संशोधन प्रयोगशाळांमुळे असे समजले जात होते की हे शहर उर्वरीत भारतापेक्षा फारच पुढे जाणार आहे. वास्तवात पुढे जाऊन जे घडले ते अगदी विरुद्ध होते. इथल्या मुलभूत सुविधांकडे झालेले दुर्लक्ष, स्थानिक राजकारण्यांची लघुदृष्टी आणि इथल्या मुख्य कंपन्यांमध्ये नेतृत्वावरून चाललेला संघर्ष यामुळे इथे येणारी गुंतवणूक इतर शहरांकडे वळली. यातून हाच निष्कर्ष निघतो की जी शहरे कधीकाळी प्रगत आणि संपन्न समजली जात होती ती सुद्धा अवनत स्थितीला जाऊ शकतात. तीच गोष्ट राज्यांच्या बाबतीतही आहे. केरळ एकेकाळी धार्मिक सहिष्णुतेसाठी आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी अग्रेसर मानले जात होते. मात्र गेल्या काही वर्षात केरळात जातीय संघर्ष आणि स्त्रियांवरच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. आठ राज्यांच्या सर्वेक्षणात असे पुढे आले आहे की केरळातील महिला सगळ्यात जास्त असुरिक्षत आहेत. इतिहासाचा हा धडा तसा देशांच्या बाबतीतही लागू पडतो. इतिहास आपल्याला हेच शिकवतो की कुठल्याच व्यक्ती, संघटना, उद्योग समूह किंवा राष्ट्राची ख्याती कायमस्वरूपी नसते. तरी सुद्धा मी सचिन तेंडुलकरकडे कौतुकाने पाहतो, कारण माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या आधी त्याच्यासारखा एकही फलंदाज मी पाहिलेला नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा नाही. शहरांच्या प्रगती आणि अधोगतीच्या इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला दिल्ली आणि हैदराबाद ही शहरे राहण्यासाठी व काम करण्यासाठी बंगळुरुपेक्षा अधिक चांगली वाटतात तेव्हां मीच आश्चर्यचकित होतो. इतिहासाचा वापर केवळ शैक्षणिक कारणांसाठीच व्हावा. इतिहास आणि अन्य मानवी समाजाविषयी विस्तृत लिखाण करून इतिहासकार आपल्याच देशवासियांना मानवीय आणि सामाजिक अनुभवाने समृद्ध करू शकतो. इतिहासाच्या ज्ञानातून आम आदमी केवळ स्वत:ची समीक्षा करू शकतो, इतरांविषयी कमी भयभीत राहू शकतो. पण राजकारण्यांसाठी, खेळाडूंसाठी किंवा व्यावसायिकांसाठी मात्र इतिहास त्यांच्या गर्वावरील उतारा ठरु शकतो.

Web Title: 'History does not always guide the guide!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.