हा इतिहास जपून ठेवावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 06:32 PM2020-02-05T18:32:04+5:302020-02-05T18:32:16+5:30

इतिहासाचे लेखन, इतिहासाच्या पाऊलखुणा, शिलालेख, राजवाडे, वाडे, मंदिरे, दर्गा, मस्जिद, चर्च आणि स्मारके, समाधी यांचे काम सतत चालू राहिले पाहिजे.त्यासाठी खास प्रयत्न होत राहिले पाहिजेत. अनेक धडपड्या संशोधकांकडे मौलिक वस्तू, इतिहासाचे दस्ताऐवज, मुद्रिका, जुने ग्रंथ, शिल्पे, चित्रे, नकाशे आहेत. ते पाहिले की थक्क होते.

 This history should be preserved! | हा इतिहास जपून ठेवावा !

हा इतिहास जपून ठेवावा !

Next
ठळक मुद्देअशा सर्व इतिहासाच्या नोंदी जतन करणे, भावी पिढीला सांगणे, त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यस्मरणाची शताब्दी दोन वर्षांवर आली तरी समाधिस्मारक झाले नव्हते.

- वसंत भोसले

इतिहासाचे लेखन, इतिहासाच्या पाऊलखुणा, शिलालेख, राजवाडे, वाडे, मंदिरे, दर्गा, मस्जिद, चर्च आणि स्मारके, समाधी यांचे काम सतत चालू राहिले पाहिजे.त्यासाठी खास प्रयत्न होत राहिले पाहिजेत. अनेक धडपड्या संशोधकांकडे मौलिक वस्तू, इतिहासाचे दस्ताऐवज, मुद्रिका, जुने ग्रंथ, शिल्पे, चित्रे, नकाशे आहेत. ते पाहिले की थक्क होते.

‘‘आधुनिक काळात विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व कुणालाच नाकारता येत नाही; परंतु विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाजूने दुराग्रही बनलेले काही लोक अलीकडे मुलांना इतिहास शिकविण्याची गरज नाही, असे म्हणू लागले आहेत. हे मानवी जीवनाचे अत्यंत एकांगी आकलन म्हणावे लागेल. मानवाला आपल्या व्यक्तित्त्वाचा केवळ विकास करण्याच्या दृष्टीनेच नव्हे, तर आपल्या अस्तित्वाचे यथोचित आकलन होण्याच्या दृष्टीनेही इतिहासाचे ज्ञान अत्यावश्यक असते. हे ओळखल्यामुळेच हल्ली जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून दस्तावेजीकरणाला विलक्षण महत्त्व आले आहे. दस्तावेजीकरण ही इतिहासाची जपूणकच असते. खरे तर इतिहास हा काही फक्त राजकीय घटनांचा नसतो, तो जीवनाच्या सर्व अंगांचा असतो. हे सत्य आता सर्वमान्य झाले आहे की, प्रत्यक्ष विज्ञान-तंत्रज्ञानाचाही इतिहास लिहिला जात असतोच. अर्थात, दुसऱ्या बाजूने पाहता, इतिहासलेखनाला आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे. हेही विसरता येत नाही.’’

सातारचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांचे हे विवेचन त्यांच्या ‘इतिहासलेखन : काही पथ्ये, काही सूत्रे’ या लेखातील आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्मारकाचा नुकताच कोल्हापुरात कार्यक्रम झाला. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या पाठपुराव्याने हे स्मारक उभे राहिले. त्यांच्या त्या शोधक दृष्टीने हा इतिहास शोधून काढला. या पार्श्वभूमीवर डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या या लेखाची आठवण झाली. त्यातील हा उतारा इतिहासाचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करणारा आहे. आपल्या अस्तित्वाचेच यथोचित आकलन होण्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाची गरज आहे, असे म्हणतात. मनोविकास प्रकाशनचे अरविंद पारकर यांनी अलीकडेच धुळ्याचे डॉ. मुकुंद धाराशीवकर यांच्या मागे लागून भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे चरित्र लिहून घेतले आणि प्रसिद्ध केले. भारतातील विसाव्या शतकातील ज्येष्ठ अभियंता अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी आपले उच्चशिक्षण पुण्यात केले आणि चोवीस वर्षे महाराष्टÑात सरकारी नोकरीही केली. ज्या काळात आधुनिक तंत्रज्ञान नव्हते, तेव्हा सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक प्रयोग त्यांनी केले. हैदराबाद शहर १९०९ मध्ये महापुराने उद्ध्वस्त झाले होते. त्याच्या पुनर्उभारणीसाठी काम केले. अशा माणसांचे चरित्र मराठीमध्ये प्रथमच प्रकाशित होत आहे, असे पारकर यांनी नमूद करावे याचे मला आश्चर्य वाटते ते यासाठी की, ज्ञानाचा अद्भुत खजिना ज्यांच्याकडे होता, त्यांनी जीवनाची एक तत्त्वप्रणाली निवडली होती. विज्ञानाभिमुख माणूस वैयक्तिक जीवनात आदर्शवादी होता. अशा मानवाचे चरित्र मराठीत येण्यासाठी सत्तर वर्षे लागावीत? त्यांचे जीवनच १०१ वर्षांचे होते. म्हणजे सुमारे पावणेदोनशे वर्षांनंतर हा माणूस मराठी वाचकाला समजतो आहे.

इतिहासाचे लेखन, इतिहासाच्या पाऊलखुणा, शिलालेख, राजवाडे, वाडे, मंदिरे, दर्गा, मस्जिद, चर्च आणि स्मारके, समाधी यांचे काम सतत चालू राहिले पाहिजे. त्यासाठी खास प्रयत्न होत राहिले पाहिजेत. कोल्हापूर, सातारा, सांगलीशिवाय सीमावर्ती कर्नाटकच्या भागात अनेक ऐतिहासिक घटना, घडामोडी होऊन गेल्या. महाराष्टÑाची वाटचाल ज्या फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनेच चालू आहे, असे आपण म्हणतो, या तिन्ही महामानवांचा कार्यकाळ या परिसरात व्यतित झाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गावच सातारा जिल्ह्यात आहे. सावित्रीबाई फुले यांचे नायगाव साताºयात आहे. शाहू महाराजांचे संस्थान कोल्हापूरचे! ज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा महाराणी ताराराणी यांनी केली. औरंगजेबाशी सात वर्षे त्या संघर्ष करीत नव्याने स्थापन झालेल्या करवीर संस्थानचे त्या संरक्षण करीत होत्या. या संस्थानचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजक्रांती केली. त्यांच्या मदतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडत गेले. माणगाव येथे शंभर वर्षांपूर्वी या दोन महामानवांच्या उपस्थितीत परिषद झाली. त्यात दलित समाजाचा नेता उदयास आला आहे, असे सांगत राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना नेतृत्व करण्यास सांगितले. हा सर्व इतिहास ताजाच आहे. मात्र, या इतिहासाची ठाशीव जपणूक व्हावी, असे काम झालेले नाही.

काही व्यक्ती व संस्थांनी आपले आयुष्य वाहून घेऊन ते जपण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठात शाहू संशोधन संस्था स्थापन केली. त्यांचे शिष्य डॉ. जयसिंगराव पवार यांनी विद्यार्थिदशेपासून इतिहास संशोधनाच्या कामाचा वसा घेतला. आज ऐंशी वर्षांच्या उंबरठ्यावर असतानाही ते दररोज बारा बारा तास संशोधन, वाचन, लिखाण, चिंतन, मनन करतात. एकाच वेळी अनेक प्रकल्प त्यांचे चालू आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार, कार्य व इतिहास जगाच्या पातळीवर घेऊन जाण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. मराठीत आलेल्या शाहू स्मारक ग्रंथाचा आता अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. राज्यघटनेत मान्यताप्राप्त चौदाही प्रादेशिक भाषेत हा ग्रंथ घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र, कोल्हापूरचा सुमारे दीड हजार वर्षांचा इतिहास खंडात्मक स्वरूपात आणण्याची त्यांची धडपड, सातारच्या प्रतिसरकारचा इतिहास, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, आदींचे चरित्र ते समोर आणत असतात. जैन तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. विलास संगवे, आप्पासाहेब पवार, माधवराव बागल, गोविंदराव पानसरे ते राजर्षी शाहू महाराज यांच्याबरोबर काम केलेले रावबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्यापर्यंत असंख्य लोकांनी संशोधनाचे कार्य केले. प्रा. डॉ. रमेश जाधव, डॉ. अशोक चौसाळकर, इंद्रजित सावंत, देविकाराणी पाटील, मंजुश्री पवार या नव्या पिढीतील लेखक-संशोधकांपर्यंत अनेकांनी हा इतिहास समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. डॉ. रमेश जाधव यांनी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ बाराशे पानांचा प्रसिद्ध केला आहे. चौसाळकर सरांनी भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे अध्वर्यू श्रीपाद अमृत डांगे यांचे उत्तम चरित्र लिहिले आहे. कोल्हापूर घडविणाºया शंभर लोकांचा छोट्या पुस्तिकेद्वारे परिचय करून देण्याचा उपक्रम गोविंदराव पानसरे यांनी राबविला. हा सर्व इतिहासाचा खजिना आहे.

इंद्रजित सावंत व देविकाराणी पाटील यांनी शाहू महाराज यांचे छायाचित्रांकित चरित्र मोठ्या आकाराच्या पुस्तकरूपात प्रसिद्ध केले आहे. त्यात अत्यंत दुर्मीळ छायाचित्रे आहेत. असे अनेक लेखक, संशोधक आहेत, ज्यांनी या परिसराचा इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. डॉ. मधुकर बाचुळकर, रमन कुलकर्णी यांनी सह्याद्री पर्वतरांगा पालथ्या घालून नोंदी ठेवल्या. त्या पुस्तकरूपानेही प्रसिद्ध केल्या आहेत. गडकिल्ल्यांचे अभ्यासक डॉ. अमर आडके यांचे ‘सह्याद्रीच्या गिरिस्थानवरून’ ही दोन खंडात्मक आलेली पुस्तके उत्कृष्ट आहेत. महान लेखक वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, रमेश मंत्री, आदी नावे नोंदविता येतील. त्यांनी या परिसराला साहित्यात उतरविले. प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वि. स. खांडेकर यांचे स्मारक, नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारले.

शाहिरी परंपरा, लोककला, शिल्पकला, चित्रकला, आदींच्या माध्यमांतून अनेक दिग्गजांनी हा इतिहास जपला. कोल्हापूर, सांगली, साताºयाला चित्रपट निर्मितीची परंपरा होती. नाट्यनिर्मितीचा प्रारंभ सांगलीत झाला. सर्कसचा जन्म, तमाशाचा उदय सांगली जिल्ह्यात झाला.डॉ. आ. ह. साळुंखे यांचे योगदान कधी विसरता येणार नाही. ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ या संशोधनात्मक ग्रंथापासून ‘सर्वाेत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ ग्रंथापर्यंत अठ्ठावीस साहित्य, परंपरा, धर्मचिकित्सा, आदी प्रकारात लिहिले आहेत. त्यात आपला सर्व मानवी इतिहास उतरला आहेच. त्यांचा भर पुन्हा चिकित्सेवर अधिकच आहे. माणसाला शहाणे करून सोडण्याचा त्यांचा मार्ग आगळावेगळा आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, देवदत्त दाभोळकर, श्रीपाद दाभोळकर या बंधंूनी इतिहासाचे दाखले देत भविष्याचा वेध घेतला. श्रीपाद दाभोळकर यांनीच तासगावची द्राक्ष उत्पादनाची पद्धत विकसित केली. ‘दहा गुंठे शेतीत एका कुटुंबाचा उदरनिर्वाह’ ही संकल्पना त्यांनी प्रयोग परिवारातून मांडली. देवदत्त दाभोळकर यांनी शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट काम करताना इतिहासाचे दाखले दिले आहेत.

सांगलीचे सदानंद कदम, मिरजेचे मानसिंग कुमठेकर, गौतम काटकर, संपत कदम, कोल्हापूरचे गणेश नेर्लीकर, प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, सांगलीच्या प्रा. डॉ. तारा भवाळकर, असे असंख्य लोक आहेत जे इतिहासात डोकावून भावी पिढीला तो इतिहास उलगडून सांगत आहेत. सदानंद कदम, मानसिंग कुमठेकर, गौतम काटकर, कोल्हापूरचे राजू राऊत असे मला माहीत असलेल्या संशोधकांकडे अनेक मौलिक वस्तू, इतिहासाचे दस्ताऐवज, मुद्रिका, जुने ग्रंथ, शिल्पे, चित्रे, नकाशे आहेत. ते पाहिले की थक्क होते. डॉ. तारा भवाळकर यांनी अनेक पुस्तके


यांनी अनेक पुस्तके लिहिली. ग्रामीण रितीरिवाज, परंपरा, संस्कृती व स्त्रिया यांचे असंख्य संदर्भ सांगितले. लोककलेचा त्यांचा अभ्यास उत्तम आहे. येथे उल्लेख केलेली नावे सहज लिहिता लिहिता आली. अनेकांचे उल्लेख राहिले आहेत, त्यांची क्षमा मागायला हवी. अशी खूप मंडळी आहेत. त्यांचीही एक मोठी परंपरा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा वयाच्या दहाव्या वर्षी (१८८४) राज्याभिषेक सोहळा झाला. त्याला उपस्थित असणारे सदानंद देशपांडे यांनी १८८५ मध्येच राज्याभिषेक सोहळ्याच्या उत्तम नोंदी ठेवून पुस्तिका लिहिली आहे. याची गेल्या वर्षी १३५ वर्षांनी दुसरी संपादित आवृत्ती कोल्हापूरजवळच्या वडणगे येथील प्रा. विकास पोवार यांनी प्रसिद्ध केली. हा मोठा ठेवा आहे. संपूर्ण कोल्हापूर गाव या सोहळ्याला कसे सजले होते? याच्या नोंदी त्यात आहेत. सांगली, मिरज, बुधगाव, कुरुंदवाड, तासगाव, आदी ठिकाणी पटवर्धनांची संस्थाने होती. त्याच्यापैकी खूप कमी इतिहास आज हाती लागतो. यावरही काम झाले पाहिजे. सातारच्या प्रतिसरकारचा इतिहास लिहिण्यासाठी प्राचार्य डॉ. आबासाहेब शिंदे यांनी आयुष्यातील दहा वर्षे खर्ची घातली तो ऐवजच आहे. देशातील पराक्रमी स्वातंत्र्यलढा आहे. रयतेच्या मुलांचा आहे. तोही उपलब्ध आहे.

अशा सर्व इतिहासाच्या नोंदी जतन करणे, भावी पिढीला सांगणे, त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यस्मरणाची शताब्दी दोन वर्षांवर आली तरी समाधिस्मारक झाले नव्हते. ते इतिहास संशोधकांच्या धडपडीतून उभे राहिले. यासाठी सर्व इतिहास संशोधक, लेखक, अभ्यासक यांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. त्याचे जतन करण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात तीन भव्य स्मारके व्हायला हवीत.

Web Title:  This history should be preserved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.