सणावाराचे दिवस, गर्दी टाळणे गरजेचे...
By किरण अग्रवाल | Published: September 2, 2021 12:30 PM2021-09-02T12:30:12+5:302021-09-02T12:32:06+5:30
Corona Viurs Threat : नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निर्बंधांचे पालन केले व खबरदारी घेतली तर तिसरी लाट रोखता येऊ शकेल; पण तेच होताना दिसत नाही.
- किरण अग्रवाल
दहीहंडी फोडून झाली, आता गणेशोत्सव येऊ घातला आहे. त्यानंतर लागोपाठ सण उत्सवाचे दिवस असल्याने बाजारात आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. कोरोनाच्या सावटातून दूर होत आकारास आलेले हे चलनवलन व चैतन्य टिकवून ठेवायचे तर कोरोना गेला असे समजून चालणार नाही. शासनाने सक्ती करण्याची वेळ येऊ न देता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निर्बंधांचे पालन केले व खबरदारी घेतली तर तिसरी लाट रोखता येऊ शकेल; पण तेच होताना दिसत नाही. सणासुदीत सभा, मेळावे घेऊन गर्दी करणे टाळा असे निर्देश देत केंद्राने कोरोनाविषयक निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढविले आहेत. राज्यानेही मार्गदर्शक सूचना दिल्या असून, सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे मुंबई उच्च न्यायालयानेही सांगितले आहे; परंतु अशी गर्दी व विशेषतः राजकीय आंदोलने कमी झालेली नाहीत. केरळमध्ये ओणमनंतर रुग्ण वाढले, तसे आपल्याकडे होऊ द्यायचे नसेल तर प्रत्येकानेच आपली जबाबदारी ओळखून सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
दुसरी लाट ओसरली असे म्हटले जाते; पण अजूनही देशात प्रतिदिनी सुमारे चाळीस हजारावर रुग्ण आढळत असून, ३५०पेक्षा अधिक जणांचा मृत्यू होत आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या पावणेचार लाखांच्या घरात आहे. महाराष्ट्रात प्रतिदिनी सुमारे चार हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून, शंभरपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. पन्नास हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत, त्यामुळे देशात केरळपाठोपाठ महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक म्हटली जात आहे. तिसरी लाट येणार की नाही येणार, येणार तर कधी येणार व कितपत नुकसानदायी राहणार? याबद्दल विविध मतप्रवाह आहेत खरे; पण ती येणार याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. मुंबईच्या मानखुर्द येथील एका बालगृहातील १८ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून, औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील बारा कैदीही बाधित आढळून आले आहेत. तिसरी लाट आगामी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कमाल उंची गाठेल व तेव्हा प्रतिदिनी एक लाख लोकांना बाधा होईल, अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच सेंटर फॉर डिसिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी)चा एक अहवाल आला असून, लसींचा कालांतराने प्रभाव कमी होत चालल्याचे त्यात म्हटले आहे. पण असे सारे चित्र असूनही लोक म्हणावी तशी खबरदारी घेताना दिसत नाहीत.
राज्यात कोरोनाविषयक निर्बंध आहेत; पण ते कागदावरच असल्यासारखे दिसते आहे. लोकांकडून स्वयंस्फूर्तीने त्यांचे पालन होत नाहीच, आणि सरकारी यंत्रणाही त्याबाबत गंभीर दिसत नाहीत. यातही सामान्य माणसे व संस्था थोड्याफार भीतीपोटी सावध राहताना दिसतात; परंतु राजकीय पक्ष मात्र निर्बंध न जुमानता सक्रिय झाले आहेत. मंदिरे खुली करण्यासाठी नुकताच राज्यभरात भाजपतर्फे शंखनाद करण्यात आला, तर शासनाने निर्बंध घातले असतानाही मनसेतर्फे काही ठिकाणी दहीहंडी फोडली गेली. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक प्रकरणावरून भाजप व शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसून आले. इतरही विविध कारणांवरून जागोजागी राजकीय आंदोलने जोमात असून, यात कोरोनाविषयक निर्बंधांचे कुठलेही पालन होताना दिसत नाही. कोरोना गेला, तो आता पुन्हा येणार नाही अशा अविर्भावात सारे सुरू आहे. पूर्ण क्षमतेने वाहतूकही सुरू झाली आहे. ग्रामीण भागात अजून एसटी सुरू झालेली नाही, परंतु ज्या मार्गावर ती सुरू आहे ती एसटी असो की खासगी वाहने, भरभरून धावत आहेत. यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा तर उडतोच आहे; पण मास्कदेखील वापरले जाताना दिसत नाहीत. यापुढे गणेशोत्सव व अन्य सणवार आहेत, यातही असेच सुरू राहिले तर तिसऱ्या लाटेला आपसूक निमंत्रण मिळून जाणे स्वाभाविक ठरेल.
महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडे आपण डेल्टा प्लस या विषाणूची चिंता करतो आहोत; पण दक्षिण आफ्रिका व चीन, मॉरिशस, इंग्लंड आदी काही देशात सी 1.2 हा कोरोनाचा नवा विषाणू आढळला असून, तो अधिक घातक व कोरोना लसींनाही दाद न देणारा असण्याची शक्यता नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसिजेसच्या संशोधनातून पुढे आली आहे. हा विषाणू शरीरात अँटिबॉडीज विकसित होण्याच्या प्रक्रियेतही बाधा निर्माण करतो, असेही अहवालात म्हटले आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी ही स्थिती आहे. केंद्र व राज्य सरकारही लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे खरा परंतु लस घेतली म्हणजे आपण पूर्णता सुरक्षित झालो असे समजून चालणार नाही. लॉकडाऊन तर कुणालाच नको आहे, उद्योगांनाही व नोकरदारांनाही; कारण त्यामुळे सर्वांनाच खूप भोगावे लागले, आर्थिक आघाडीवर आपण मागे पडलो. तेव्हा आता पुन्हा बंदची वेळ यायलाच नको. कोरोना आता नेहमीचा साथी आहे हे समजूनच सारे सुरू ठेवावे लागेल, पण ते करताना खबरदारीकडे दुर्लक्ष नको. तेव्हा कोरोनापासून व तिसऱ्या लाटेपासून बचावायचे तर स्वयंशिस्त व शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन कटाक्षाने केले जाणे गरजेचे आहे.