हॉलीवूडची नजर भारतीय ॲक्टर्स, लोकेशन्सवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:36 AM2021-03-20T04:36:22+5:302021-03-20T06:53:14+5:30

कोरोनामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याचा फायदा भारताला होतो आहे. हॉलीवूड ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची फिल्म इंडस्ट्री आहे.

Hollywood's eye on Indian actors, locations! | हॉलीवूडची नजर भारतीय ॲक्टर्स, लोकेशन्सवर!

हॉलीवूडची नजर भारतीय ॲक्टर्स, लोकेशन्सवर!

Next

भारतीय अभिनेते आणि प्रेक्षकांना कायम हॉलीवूडनं मोहिनी घातली आहे. त्यामुळे हॉलीवूडचे अनेक चित्रपट अमेरिकेसोबतच भारतातही प्रदर्शित होतात आणि त्यांना प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळते. हॉलीवूडच्या अनेक चित्रपटांनी  मोठमोठ्या बिग बजेट हिंदी चित्रपटांपेक्षाही जास्त गल्ला जमवला, ही वस्तुस्थिती आहे. भारतीय अभिनेत्यांनी हॉलीवूडच्या चित्रपटांत एखादी छोटीशी भूमिका केली तरी लगेच त्यांचं नाव होतं. पण कोरोनाकाळानंतर ही परिस्थिती बरोब्बर उलट होते आहे. हॉलीवूडलाच आता भारताची मोहिनी पडली आहे आणि अलीकडच्या काळात अनेक हॉलीवूडपट भारतात येऊ घातले आहेत. पण या चित्रपटांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यातल्या बहुतेक चित्रपटांचं शूटिंगही आता भारतातच होणार आहे. शिवाय अनेक भारतीय कलाकार यात प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. काश्मीर, मुंबई, जयपूर, दिल्ली, कोलकाता, गोवा.. यासारखी अनेक लोकेशन्स हॉलीवूड निर्माता-दिग्दर्शकांच्या मनात भरली असून तिथे आता मोठ्या प्रमाणात हॉलीवूडच्या चित्रपटांचं शूटिंग सुरू होईल. (Hollywood's eye on Indian actors, locations!)

कोरोनामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याचा फायदा भारताला होतो आहे. हॉलीवूड ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची फिल्म इंडस्ट्री आहे. कोरोनाच्या मुद्यावरुन अमेरिकेनं सातत्यानं चीनला लक्ष्य केल्यामुळे चिनी लोकांनी हॉलीवूड पटांवर जवळपास बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे चीनला पर्याय म्हणून  हॉलीवूडनं आता भारताकडे आपलं लक्ष वळवलं आहे. हॉलीवूडचे निर्माते दिग्दर्शक केवळ भारतात यायलाच उत्सुक आहेत, असं नव्हे, तर भारतीय प्रेक्षक, त्यांची मानसिकता, त्यांची आवड-निवड लक्षात घेऊन कथेतही त्याप्रमाणे बदल करण्याची त्यांची तयारी आहे.

क्रिस्टोफर नोलन हा एक इंग्लिश-अमेरिकन सिने लेखक, निर्माता व दिग्दर्शक. गेल्यावर्षी अमेरिकेतील थिएटर्स बंद असल्यामुळे ‘टेनेट’ आणि ‘वंडर वुमन’ हे चित्रपट त्यानं भारतात प्रदर्शित केले होते. त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. ‘टेनेट’चं भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन १२.४३ कोटी तर ‘वंडर वुमन’चं कलेक्शन १५.५४ कोटी रुपये होतं. कोरोनाकाळातली ही कमाई खूप मोठी मानली जाते.

‘टेनेट’ या चित्रपटातील काही दृष्यांंचं चित्रण मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटल आणि ताज महाल पॅलेसमध्ये झालं होतं. जॉन डेव्हिड वॉशिंग्टन, रॉबर्ट पॅटिनसन, एलिझाबेथ देबिकी, मायकेल केन आणि केनेथ ब्रेनाग यांच्या या चित्रपटांत प्रमुख भूमिका असल्या तरी चित्रपटाला भारतीय टच देण्यासाठी त्यात ‘प्रिया’ नावाच्या एका व्यक्तिरेखेला प्राधान्यानं स्थान दिलं होतं. प्रियाची ही भूमिका डिंपल कपाडियानं केली होती. फिल्मच्या पोस्टरवरही डिंपलच्या नावाला स्थान देण्यात आलं होतं. कोरोना काळात या चित्रपटानं जगभरात प्रचंड गल्ला जमवला.

हॉलीवूडच्या चित्रपटांच्या कमाईचा जवळपास ७० टक्के हिस्सा विदेशातला असतो. त्यातील तब्बल ५० टक्के हिस्सा एकट्या चीनचा असतो. १९९१ मध्ये हॉलीवूड चित्रपटांचा चीनमधील कमाईचा हिस्सा ३१ टक्के होता, २०१९ मध्ये चीनकडून आलेल्या कमाईचा वाट्टा तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त होता. कोरोनाकाळात जगभरात सगळेच उद्योग डबघाईला आलेले असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी हॉलीवूडला चीनचाच मोठा आधार होता, ‘एवेंजर्सः एंडगेम’ या एकाच चित्रपटानं चीनमधून मोठी कमाई केली होती. पण हॉलीवूड चित्रपटांकडे चिनी प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे हॉलीवूडलाही आता भारताशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. बहुभाषी भारतातील विविध भाषांमध्ये हॉलीवूडपटांचं डबिंग करण्यासाठीचं बजेटही दुपटीपेक्षा अधिक केलं आहे. आता अनेक हॉलीवूडपटांचं डबिंग आणि सबटायटल्स भारतीय भाषांत होऊ लागली आहेत.

पुढच्या महिन्यात जेम्स बॉण्डचा ‘नो टाइम टू डाय’, मे मध्ये ‘ब्लॅक विडो’, फास्ट एंड फ्यूरियस सीरिजचा ‘एफ नाईन’, जुलैमध्ये टॉम क्रूजचा ‘टॉप गनः मेवेरिक’ याशिवाय ‘मोर्टार कॉम्बॅट’, ‘अ क्वाएट पॅलेसः पार्ट टू’, ‘गॉडजिला वर्सेस कांग’, ‘द कन्ज्यूरिंग’.. इत्यादी अनेक हॉलीवूडपट भारतात येत्या काळात रिलीज होत आहेत. भारतीय चित्रपटांचं वार्षिक बजेट साधारण २७ हजार कोटी रुपयांचं आहे. हॉलीवूडचे प्रमुख निर्माता वॉर्नर ब्रदर्स दरवर्षी साधारण शंभर चित्रपट तयार करतात. या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतातच चित्रपट निर्मितीची योजना आहे.

हॉलीवूड करतंय बक्कळ कमाई! 
हॉलीवूडचे चित्रपट दरवर्षी भारतात अधिकाधिक कमाई करताहेत. २०१५ मध्ये हॉलीवूडपटांची बॉक्स ऑफिसच्या कमाईची टक्केवारी होती आठ टक्के, २०१९ मध्ये ती २१ टक्के झाली. २०१८ मध्ये हॉलीवूडनं भारतातून ९२१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. २०१९ मध्ये हा आकडा १२२० कोटी रुपयांवर गेला. येत्या दोन वर्षांत हॉलीवूडला भारताकडून अधिक कमाईची अपेक्षा आहे. कमाईचा हा वाटा किमान २५ ते ३० टक्के किंवा १६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल असा जाणकारांचा अंदाज आहे.
 

Web Title: Hollywood's eye on Indian actors, locations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.