घर घेता का घर ?

By admin | Published: May 9, 2016 02:51 AM2016-05-09T02:51:08+5:302016-05-09T02:51:08+5:30

नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकरांच्या ‘कोणी घर देता का घर’ या आर्त सवालात किंचितसा बदल करून ‘घर घेता का घर’ असे म्हणण्याची वेळ देशातील बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे

Home to take home? | घर घेता का घर ?

घर घेता का घर ?

Next

नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकरांच्या ‘कोणी घर देता का घर’ या आर्त सवालात किंचितसा बदल करून ‘घर घेता का घर’ असे म्हणण्याची वेळ देशातील बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे. कारण, घरांच्या विक्रीमध्ये २५ ते ३० टक्के तर व्यावसायिक जागांच्या विक्रीत ३५ ते ४० टक्के घसरण झाली आहे. उद्योग व वाणिज्य क्षेत्रांतील नामांकित संस्था ‘असोचेम’ने जाहीर केलेल्या अहवालानुसार राजधानी दिल्लीत अडीच लाख म्हणजे बांधकाम झालेल्या घरांपैकी सुमारे ३५ टक्के घरे विक्रीअभावी पडून आहेत, तर त्यापाठोपाठ मुंबई महानगराचा नंबर लागतो. तेथे सुमारे एक लाख घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत उभी आहेत. दिल्ली, मुंबईचेच काय, राज्यातील पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्येही हीच स्थिती
पाहावयास मिळत असून, केवळ भू-विकासक अथवा बांधकाम व्यावसायिकांच्याच दृष्टीने नव्हे तर, या व्यवसायाशी निगडीत सर्वच घटकांसाठी ती चिंतेचीच म्हणता येणारी आहे. नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने गावाकडून शहराकडे स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढल्याने मोठ्या शहरांतील बांधकाम व्यवसाय भरभराटीस आला आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, चेन्नईप्रमाणेच हैदराबाद, अहमदाबाद, पुण्यासारखी शहरे अस्ताव्यस्त वाढत आहेत. या शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणे महागडे ठरत असल्याने साधारण नोकरवर्गही कर्ज काढून स्वत:चे घर विकत घेऊ पाहतो. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी
बँकांनीही मोठा हातभार लावल्याने गृहनिर्माण व्यवसायाने जोर धरला होता. परंतु, गेल्या काही दिवसांत किमती कमी करून व बँकांचे व्याजदर घटूनही गृह खरेदी थंडावल्याने या क्षेत्रातील तेजीचा फुगा फुटला आहे. ज्यांनी मोठी गुंतवणूक करून या क्षेत्रात पाऊल ठेवले त्यांना आज गुंतवणुकीची रक्कम काढणेही जिकिरीचे झाले आहे. या घर खरेदीतील घसरणीचा परिणाम गृहबांधणीशी संबंधित उत्पादनांसह कामगार क्षेत्रावरही अपरिहार्यपणे घडून येत आहे. गृहबांधणी क्षेत्रात सुमारे एक कोटीपेक्षा अधिक कामगार असून, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने काही जणांना गावाकडे परतणे भाग पडत आहे. म्हणायला ही परिस्थिती ‘चलो गाव की ओर’ या संकल्पनेला पूरक ठरणारीच आहे. परंतु शहरात हाताला काम नाही म्हणून गावाकडे परतणाऱ्या लोंढ्याला तेथे तरी काय काम मिळेल हा प्रश्नच आहे. केवळ व्यावसायिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिक पातळीवरही परिणाम करणारी ही बाब आहे.

Web Title: Home to take home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.