गृहपाठ - संविधान आणि गणित शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:54 AM2019-04-05T04:54:00+5:302019-04-05T04:54:18+5:30
व्यक्ती, समाज आणि राष्ट्र अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यास शिक्षण हे केंद्रिभूत ठरते.
संतोष सोनावणे
व्यक्ती, समाज आणि राष्ट्र अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यास शिक्षण हे केंद्रिभूत ठरते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती आपला स्वत:चा विकास साधत सामाजिक संतुलन राखण्याचाही प्रयत्न करत असतो. या सगळ्यात शाळाशाळांत राबवला जाणारा अभ्यासक्रम खूप मोठी भूमिका बजावत असतो. गणित विषयाच्या माध्यमातून गणिताचा अभ्यासक्रम, गणिताचे पाठ्यपुस्तक, वर्गातील आंतरक्रिया याद्वारे संविधानात्मक मूल्यांचे उपयोजन करता येणे शक्य आहे. अशाच काही संविधानात्मक मूल्यांचा आणि गणित शिक्षण यांचा सहसंबंध कसा जोडता येईल, ते पाहू या.
सर्वसमावेशकतेचे तत्त्व
गणित या विषयाला केवळ एक विषय आणि परीक्षेत यांत्रिक पद्धतीने उदाहरणे सोडवून त्याची उत्तरे काढणे इतकेच मर्यादित ठेवले जाते. मात्र, एक समाजातील जबाबदार व्यक्ती या नात्याने या विषयाची जोड शाब्दिक उदाहरणार्थ प्रतिष्ठा दाखवणारे भाषिक संवाद, सणसमारंभात आकृतीबंध या क्षेत्राचा वापर करून रांगोळी, सुशोभन करता येईल. कार्यानुभवाच्या माध्यमातून भूमिती आणि त्यातूनच पुढे सामाजिक पातळीवर श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजवण्यास मदत करता येईल.
समानतेचे तत्त्व : गणित विषयाच्या माध्यमातून आपल्या संविधानाच्या सार्वभौमिक समानतावादी तत्त्वांचे उपयोजन सहजगत्या साध्य करता येऊ शकेल. गणित शिक्षणाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे आपण लक्षात घेतल्यास आपल्या लक्षात येईल की, या उद्दिष्टांच्या प्रतिपूर्तीसाठी मुलांसमोर समानता या तत्त्वाला समोर ठेवून स्पष्टीकरणाची मांडणी करायला हवी. गणित शिक्षणासमोरची आजची जी आव्हाने आहेत, ती पार करण्यासाठी समानता या तत्त्वाचा वापर हा शाळाशाळांत व्हायला हवा. जसे की, विचारलेल्या उदाहरणात सर्व जातीधर्मांच्या नावांचा, त्यांच्या परंपरेचा, संस्कृतीचा जाणीवपूर्वक वापर करायला हवा. यामुळे शाळेतील मुलांमध्ये सहकार्य, सामंजस्य ही भावना वाढीस लागायला मदत होईल. गणिताची विविध क्षेत्रे आणि वयानुरूप मुलांकरिता घ्यावयाच्या कृती किंवा उपक्र म यांची एक जंत्री तयार करता येईल. ज्यात प्रामुख्याने समानता या तत्त्वाचा अंतर्भाव करून वर्गांतर्गत क्रि या घडवून आणता येतील. विविध विषयांसोबत गणिताचा समन्वय साधून तेथील आशय हा गणिताशी जोडून गणित विषय कठीण किंवा अवघड आहे, अशी भावना असणाऱ्या मुलांना सोबत घेता येईल. वर्गातील मुलांची बौद्धिक पातळी समान नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही, सर्व मुले एकाच पातळीवर विचार करतील, यादृष्टीने अध्ययन-अनुभवांची रचना करता येईल.
ताणतणावविरहित अध्ययन प्रक्रि या
आनंद हाच रचनावादी शिक्षणपद्धतीचा गाभा आहे. जिथे आनंद आहे तिथे शिकणे, ज्ञानाची निर्मिती, अनुभवांचा संदर्भ, इ. गोष्टी सुलभ होतात. त्यामुळे शाळा आणि वर्ग मुलांना हवाहवासा वाटू लागतो. इतरांना मदत करतकरत व इतरांची मदत घेतघेत शिकणं कधी होतं, हे समजतच नाही. स्वत:चं आपल्या समस्येची उकल शोधून पुढे जाणे, हे आजच्या स्पर्धेच्या जगातील यशाचे खरे गमक आहे. हे समजले की, मग कसले नैराश्य आणि कसला ताणतणाव. तरीही, आज गणित या विषयाबद्दल मुलांमध्ये भीती आणि तणाव आहे. हे सारे दूर करण्यासाठी क्रीडा या गणितातील महत्त्वाच्या भागाचा इथे खूप चांगला उपयोग करून घेता येईल. मुलांना खेळ असे प्रकार आवडतात. त्याचाच उपयोग करत विविध गणितीय कोडी, गाणी, गोष्टी रांगोळी, कूटप्रश्न यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल.
बालस्नेही मूल्यमापन प्रक्रि या
वर्र्गातील प्रत्येक मूल हे वेगळे असते. याचा विचार करून त्याच्या कलाकलाने त्याला शिकते करण्यासाठी आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ही पद्धती स्वीकारली आहे. तिची योग्य आणि काटेकोरपणे अंमलबजावणी यातच त्याचे यश सामावले आहे. केवळ मुलांचं शिकणं आणि त्यांचा विकास हा साचेबद्ध अशा इयत्तांच्या कोशात पाहणं योग्य नाही. त्याला परीक्षा व पासनापास या वार्षिक (दुष्ट) चक्रात बसवणेही निश्चितच योग्य नाही. शिक्षण हक्क कायद्याच्या सूक्ष्म वाचनानंतर लक्षात येईल की, हा कायदा जसा नापास करण्यावर बंदी घालतो, तसा तो बालकाला कोणत्याही वेळी वयानुरूप वर्गात बसण्याचा हक्कही देतो. आरटीआय कायद्यातील न्यायव्यवस्थेतील आधार व मर्मदृष्टी समाजाने समजून घ्यायला हवी. अधिक चांगले शिकवण्यासाठी आपल्या प्रयत्नात अजून कोणत्या त्रुटी आहेत, जे मुलांच्याच मदतीने शिक्षक शिकतो, ती प्रक्रिया म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन. बालकाशी सतत संवाद साधून, विचारांचे आदानप्रदान करून, त्याच्यासोबत राहून, त्याचे निरीक्षण करून त्याच्या विकासासाठी शक्य ते प्रयत्न करणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे, असे कायदा म्हणतो.
बालकाचा सर्वांगीण विकास
गणिताचे शिकणे, हे केवळ परीक्षेतील उदाहरणे सोडवणे व गणित विषयात उत्तीर्ण होणे इतके मर्यादित नाही. मुलांना गणितातील विविध खेळ, क्रीडा, उपक्रम, प्रात्यक्षिक, प्रयोग, प्रकल्प या माध्यमातून अनेक विषयांचा आधार घेत तार्किक-चिकित्सक-जिज्ञासावर्धक विचार पेरण्याचे काम व्हायला हवे.
श्रमप्रतिष्ठेस महत्त्व
गणित हा बुद्धिवंतांचा विषय आहे, त्यामुळे श्रमावर आधारित व्यवसाय निगडित विषय यासोबत जोडले जाऊ शकत नाहीत, असा एक गैरसमज दिसून येतो. मात्र कृषी, व्यापार, हस्तकौशल्यावर आधारित उद्योग यामध्ये गणित आणि त्यातील विविध संकल्पना यांचे किती महत्त्व आहे, हे मुलांना पटवून द्यायला हवे. थोडक्यात व्यावहारिक उपयुक्तता व तर्कसंगत विचारसरणी पेरणारा गणित हा विषय अधिक सक्षमतेने मुलांसमोर जायला हवा हे निश्चित.
आपल्या देशाच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची भाषा आहे. तर काही मूलभूत हक्कांबाबत तरतूदही करण्यात आली आहे. या मूलभूत हक्कांविषयी उपयोजनाची जबाबदारी ही अभ्यासक्र माची आहे. हाच अभ्यासक्र माचा हेतू असावा. त्यामध्ये सर्व विषयांप्रमाणे उचित आणि न्याय्य निर्णय घेण्यासाठी गणित विषयाचे महत्त्व अधोरेखित करावे लागेल. व्यक्ती आणि समूह यांच्या नात्यात प्रयत्नपूर्वक संतुलन कसे निर्माण करावे, याकरिता तशी तर्कशक्ती विकसित करावी लागते आणि तार्किक विचार प्रक्रि या हे गणित शिकवते. त्यामुळे संविधान आणि राष्ट्रहित जपण्यात गणित शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते.गणिताचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक, वर्गातील आंतरक्रिया याद्वारे संविधानात्मक मूल्यांचे उपयोजन करता येणे शक्य आहे.