‘उमवि’चा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:12 PM2018-03-24T13:12:17+5:302018-03-24T13:12:17+5:30
जळगावच्या उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची राज्य सरकारने घोषणा केल्याने खान्देशच्या विद्यापीठाचा सन्मान झाला आहे, असेच म्हणावे लागेल. विद्यापीठाच्या स्थापनेपासून असलेल्या या मागणीची दखल घेतली गेली याचा खान्देशवासीयांना निश्चित आनंद आहे. राज्यातील बहुसंख्य विद्यापीठांना महापुरुषांची नावे दिली गेली असली तरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ त्याला अपवाद होते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मोर्चे, आंदोलने, निवेदने, ठराव या माध्यमातून मागणी लावून धरली, परंतु शासनदरबारी खान्देशचा आवाज नेहमीप्रमाणे दुर्लक्षित राहत होता. अगदी दोन महिन्यांपूर्वी भोरगाव लेवा पंचायतच्या महाअधिवेशनातदेखील नामकरणाचा ठराव प्रामुख्याने करण्यात आला होता. ‘देर आए, दुरुस्त आए’ असे म्हणून या निर्णयाचे स्वागत करायला हवे. १९९० मध्ये पुणे विद्यापीठापासून विभाजित होत उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ स्थापन झाले. नावात ‘उत्तर महाराष्टÑ’ असले तरी महसूल विभागातील नगर आणि नाशिक जिल्ह्याचा या विद्यापीठात समावेश नाही. केवळ नंदुरबार, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांचे व भौगोलिकदृष्ट्या खान्देशचे हे विद्यापीठ आहे. खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव या विद्यापीठाला देणे त्यामुळेच संयुक्तिक आहे. १८८० चा जन्म असलेल्या बहिणाबाई स्वत: निरक्षर होत्या. जळगावजवळील असोदा हे त्यांचे जन्मगाव. १३ व्या वर्षी लग्न होऊन त्या सासरी म्हणजे जळगावला आल्या. शेती हाच त्यांचा उपजीविकेचा व्यवसाय. शेतकरी कुटुंबातील बहिणाबार्इंना प्रतिभाशक्तीचे वरदान आणि डोळस जीवनदृष्टी लाभली होती. अनुभूती, आविष्कार आणि काव्यमय शब्दांनी त्यांनी दैनंदिन जीवनातील घडामोडींवर भाष्य केले. अतिशय गोडवा असलेल्या लेवा गणबोलीत त्यांनी कविता रचल्या. बहिणाबार्इंच्या मृत्यूनंतर त्यांच्या ५० कविता प्रकाशित झाल्या. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी त्या लिहून घेतल्या होत्या. आचार्य अत्रे यांना हे हस्तलिखित दाखविल्यावर त्यांनी या कविता प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला. अरे संसार संसार, मन वढाय वढाय, अरे खोप्यामधी खोपा यासारख्या जीवनाचे सार साध्या, सोप्या भाषेत सांगणाऱ्या बहिणाबाई त्यांच्या काव्यातून अजरामर आहेत. स्वत: अशिक्षित असूनही असोद्याच्या शाळेच्या वर्णनापासून तर माणसाला कोºया कागदाची उपमा देणाºया बहिणाबाई प्रकांडपंडित म्हणायला हव्या. त्यांच्या काव्यावर अनेकांनी एम.फिल., पीएच.डी. केली असून अजूनही अभ्यास आणि मीमांसा सुरू आहे. सरस्वतीच्या दरबाराला त्यांचे नाव देऊन त्या दरबाराचा गौरव झाला आहे. सरस्वतीचे देणे त्यांनी एका कवितेत वर्णन केले आहे,
माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी, किती गुपीतं पेरली