प्राच्यविद्या क्षेत्रातील बहुमुखी विद्वत्तेचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 05:42 AM2021-07-31T05:42:25+5:302021-07-31T05:43:04+5:30

shrikant bahulkar: डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती- संशोधन केंद्राचा ग.मा. माजगावकर स्मृती पुरस्कार उद्या, दि. १ ऑगस्ट रोजी प्रा. डॉ. श्रीकांत बहुलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त..

Honoring the versatile scholars in the field of Oriental Studies | प्राच्यविद्या क्षेत्रातील बहुमुखी विद्वत्तेचा सन्मान

प्राच्यविद्या क्षेत्रातील बहुमुखी विद्वत्तेचा सन्मान

googlenewsNext

 - डॉ. अंबरीश खरे
(संस्कृत विभागप्रमुख, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे)

खेड तालुक्यातील बहुळ गावी श्रीकांत शंकर बहुलकर यांचे बालपण गेले. कुटुंब पारंपरिक विचारसरणीचे आणि सुसंस्कारित. पुण्यात आल्यावर बहुलकरांचे प्रारंभीचे शिक्षण भारत हायस्कूलमध्ये झाले. पुढे स. प. महाविद्यालयात  पदवीपूर्व शिक्षण घेत असतानाच संस्कृत हा भाषाविषय उच्चशिक्षणाकरिता घेण्याचे त्यांनी निश्चित केले. पदव्युत्तर शिक्षण घेताना पुणे विद्यापीठात पद्मविभूषण प्रा. रा.ना. दांडेकर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पं. वा.बा. भागवत गुरुजी यासारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले.  श्रीकांत बहुलकरांनी  एमएचे शिक्षण चालू असतानाच अथर्ववेदातील भैषज्य (औषधीशास्त्र) हा विषय संशोधनासाठी निश्चित केला होता. प्राचीन भारतातील वैद्यक परंपरेचा प्रारंभ जिथून होतो, त्या प्राचीन ग्रंथांवर हे संशोधन आधारलेले आहे. 
प्राच्यविद्या क्षेत्रातील भारतीय विद्वानांची आंतरराष्ट्रीय पातळीवर  दखल घेतली जाण्याचा बहुमान सरांना त्यांच्या समर्पित वृत्तीने केलेल्या संशोधन कार्याने मिळवून दिला. आयुर्वेदामध्ये मौलिक संशोधन करणाऱ्या प्रा. म्युलेनबल्ड यासारख्या नामांकित डच संशोधकानेदेखील त्यांच्या या कार्याची नोंद घेतली.
अथर्ववेदाच्या संशोधन-प्रकल्पांवर काम करीत असताना डॉ. बहुलकरांना चिं.ग. काशीकर, ह.रा. दिवेकर आणि आचार्य वि.प्र. लिमये यासारख्या ख्यातकीर्त विद्वानांचे अमोल मार्गदर्शन लाभले. अफाट वाचन, विलक्षण बुद्धी आणि चौकस नजर या अंगभूत गुणांच्या जोरावर त्यांचे नाव एक चांगला संशोधक आणि विद्वान म्हणून जागतिक पातळीवर पोहोचले. शिष्यवृत्ती मिळवून जपानला गेले, तेव्हा तिथे त्यांनी तिबेटन भाषा शिकून तिबेटी औषधीशास्त्राचा अभ्यास केला. अथर्ववेदातील मूळ भैषज्यविषयक कामाला पूरक असेच हे काम असले, तरीही तिबेटी भाषा शिकल्याने त्यांच्यासमोर अभ्यासाकरिता अजून एक विशाल दालन खुले झाले. त्यांना वज्रयान अथवा तंत्रयान या बौद्ध पंथाचा सखोल अभ्यास आणि त्यामध्ये संशोधन करण्याच्या संधी चालून आल्या. 
लुप्त झालेल्या प्राचीन भारतीय बौद्ध ग्रंथांवर लिहिली गेलेली भाष्ये अथवा त्यांचे अनुवाद हे तिबेटमध्ये उपलब्ध आहेत. संस्कृत आणि तिबेटन या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असल्याने वेद आणि बौद्ध तंत्र या एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या असणाऱ्या विषयांतील नावाजलेले तज्ज्ञ म्हणून जागतिक स्तरावर त्यांचे नाव सुपरिचित झाले. 
जपानमधून भारतात परत आल्यावर त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या (तत्कालीन) बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यभार स्वीकारला. संस्कृत  विभागप्रमुख आणि साहित्य- ललितकला विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही अनेक वर्षे काम पाहिले. सारनाथ येथे तिबेटी अध्ययनाकरिता स्थापलेल्या केंद्रीय विद्यापीठाच्या दुर्मीळ बौद्ध हस्तलिखित संशोधन विभागाचे प्रमुख संपादक म्हणूनही ते कार्यरत होते.  दूरदृष्टी नसलेल्या अनेक विद्वानांना निवृत्तीनंतर पुढे काय करायचे, असा प्रश्न पडतो. मात्र, पुढे पंधरा- वीस वर्षे करता येईल अशा संशोधनाचा आराखडा कायम तयार असल्याने बहुलकर सरांना असा प्रश्न कधीच पडला नाही.
सरांनी संस्कृत लेखनही विपुल प्रमाणात केले. त्यांनी लिहिलेल्या संस्कृत भाषणांना आणि निबंधांना अनेक राष्ट्रीय पारितोषिकांची प्राप्ती झाली आहे. सरांची छंदोबद्ध काव्येही फारच मनोरम असतात. नालंदा येथील बौद्ध आचार्यांच्या परंपरेचे वर्णन करणाऱ्या दलाई लामांच्या काव्याचा त्यांनी केलेला श्रद्धात्रयप्रकाशनम् हा संस्कृतानुवाद इतका उत्कृष्ट झाला, की त्याकरिता दलाई लामांनी त्यांचा विशेष सत्कार केला. डॉ. बहुलकरांना हार्वर्ड विद्यापीठाच्या डिव्हिनिटी स्कूलमध्ये येहान नुमाता मानद प्राध्यापक म्हणून काम करण्याकरिता निमंत्रित करण्यात आले. हे निमंत्रण मिळालेले ते पहिलेच भारतीय विद्वान होत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या हिंदू अध्ययन केंद्रामध्येही अभ्यागत प्राध्यापक (शिवदासानी फेलो) म्हणून कार्य केले. त्यांना जपान, कॅनडा, जर्मनी, नेदरलँडस्‌, रोमेनिया, फिनलंड, इंग्लंड, रशिया, अमेरिका, थायलंड, क्रोएशिया इत्यादी देशांमधील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधून व्याख्याने आणि भेटी देण्याकरिता, मार्गदर्शन करण्याकरिता म्हणून सातत्याने येणारी निमंत्रणे त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. साहित्यनिर्मिती, अध्यापन आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ कार्याची पावती म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारासारख्या गोष्टी त्यांच्याकडे आपोआप चालत आल्या. ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजतर्फे सिनिअर फेलो होण्याचा बहुमान त्यांना मार्च २०२१ मध्ये मिळाला आणि आता या बहुआयामी व्यक्तिमत्त्वास राजहंस प्रकाशन, तसेच डॉ. रा.चिं. ढेरे संस्कृती- संशोधन केंद्रातर्फे ग.मा. माजगावकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संस्कृत आणि भारतीयविद्येच्या क्षेत्रात सुमारे पाच दशके चालू असलेल्या बहुलकर सरांच्या कार्याचा हा यथोचित गौरव होय.
(avkhare@gmail.com) 

Web Title: Honoring the versatile scholars in the field of Oriental Studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.