ऊस उत्पादकांचा हेका

By Admin | Published: May 7, 2016 02:35 AM2016-05-07T02:35:38+5:302016-05-07T02:35:38+5:30

आम्हाला कोणी काही सांगितले तरी आम्ही ऊसच पिकवणार, आम्ही काय लावावे हे आम्हाला कोण्या जलतज्ज्ञाने शिकवू नये, असा सूर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे.

Hook of sugarcane growers | ऊस उत्पादकांचा हेका

ऊस उत्पादकांचा हेका

googlenewsNext

आम्हाला कोणी काही सांगितले तरी आम्ही ऊसच पिकवणार, आम्ही काय लावावे हे आम्हाला कोण्या जलतज्ज्ञाने शिकवू नये, असा सूर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. अलीकडेच राजस्थानमधील जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळाला उसाच्या वारेमाप लागवडीची जोड दिली आहे. उसाला पाणी जास्त लागते हे जरी खरे असले तरी, उसामुळे दुष्काळ पडला हे म्हणणे माजी कृषिमंत्री शरद पवारांना खटकलेले दिसते. काही असले तरी उसामुळे महाराष्ट्रात शेतकरी पोटभरून खातोय हे कुणालाही मान्य करावे लागेल. ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्त्या केली असे चित्र नाही. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची मुबलकता आहे. म्हणून शेतकरी ऊस लावतात. विदर्भ मराठवाड्याची भिस्त कापूस, सोयाबीन आणि तुरीवर आहे. तर खानदेशाची भिस्त कांदा, द्राक्षे आणि केळीवर आहे. या सर्व पिकांपैकी भरवशाचे आणि हमीभाव देणारे ऊस हे एकमेव पीक असल्याने शेतकरी त्याकडे वळला असून, याच पिकाने शेतकऱ्यांच्या घरात सुबत्ता आणली आहे. देशाच्या महसुली उत्पन्नात मोठी भर घातली आहे. आता इथेनॉलच्या माध्यमातून इंधनाची बचत होणार आहे. देशभरातील साडेचार कोटी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे हक्काचे साधन आणि ४० लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देणारे हे पीक आहे. शिवाय पूरक व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या पिकाशी निगडित आहे. याकडे कोणीच पाहिले नाही. केवळ उसामुळे पाणी जास्त वापरले जाते या एकाच गोष्टीकडे लक्ष दिले आहे. कमी पाणी लागणारी इतर पिके शेतकऱ्यांनी घेऊन पाहिली पण अशा पिकांच्या काढणीसाठी मजूर जास्त लागतात आणि ते मिळतही नाहीत. शिवाय भावाची हमी नाही. उसाशिवाय शेतकऱ्यांनी कांदा, केळी, द्राक्षे अशी इतरही पिके लावून पाहिली. पण या पिकांचे बाजारभाव पाहिले तर मनाने कठोर असलेलाच शेतकरी जिवंत राहू शकतो इतकी भयाण अवस्था आहे. दोनच दिवसांपूर्वी जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्त्या केली. पाणी असूनही पिकाला भाव नाही म्हणून आत्महत्त्या करायची वेळ येत असेल तर मग हमीभाव देणारे आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे आणि लाखोंना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उसाच्या पिकाकडे वक्रदृष्टी टाकण्याला काय अर्थ आहे.

Web Title: Hook of sugarcane growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.