‘अच्छे दिन’ची चाहूल देणारा आशादायी अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 06:03 AM2019-02-06T06:03:55+5:302019-02-06T06:04:30+5:30

काहीतरी पदरी पडेल, या आशेवर ज्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, तो प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केला. तो करताना कसबी, मुरब्बी अर्थतज्ज्ञाप्रमाणे वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी फटकेबाजीही केली.

A hopeful budget of 'good day' | ‘अच्छे दिन’ची चाहूल देणारा आशादायी अर्थसंकल्प

‘अच्छे दिन’ची चाहूल देणारा आशादायी अर्थसंकल्प

Next

- अभिजित केळकर

काहीतरी पदरी पडेल, या आशेवर ज्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते, तो प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केला. तो करताना कसबी, मुरब्बी अर्थतज्ज्ञाप्रमाणे वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी फटकेबाजीही केली. स्वतंत्र भारतात एखाद्या प्रभारी अर्थमंत्र्यानी अर्थसंकल्प सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एखादा चार्टर्ड अकाउंटंट ज्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीसमोर प्रोजेक्ट रिपोर्ट मांडतो आणि तो किती फायदेशीर आहे, हे समजावून सांगतो; त्याप्रमाणे गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प कसा असावा, मग तो हंगामी का असेना, तो कसा असावा याचे उत्तम उदाहरण या मांडणीतून पाहायला मिळाले.

गेल्या चार वर्षांत सरकारने केलेल्या कामाचे प्रगतिपुस्तक व्यवस्थित अभ्यास करून मांडण्यात आले होते. संपूर्ण भाषण ऐकताना देश किती प्रगती करतो आहे हे ऐकून जनता खरंच धन्य झाली असेल. एक मात्र खरे की, या संकल्पामुळे एक आशावादी वातावरण नक्कीच तयार झाले. आपला देश अधोगतीला चालला आहे आणि अच्छे दिन येणारच नाहीत, ही मानसिक भीती दूर होण्यात या अर्थसंकल्पाची, त्यातून तयार झालेल्या वातावरणाची थोडी मदत नक्कीच झाली. हीच या वेळच्या अर्थसंकल्पाची सर्वात मोठी जमेची बाजू मानायला हवी.
पाच लाखांपर्यंतचे करपात्र उत्पन्न करमुक्त करणे, बँकेतील ठेवींवरील व्याजावरील सवलतीची मर्यादा वाढविणे आदी घोषणा नि:संदेह स्वागतार्ह आहेत. मध्यमवर्गीय महिला तसेच ठेवींवरील व्याजावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या या निर्णयाचा खूप फायदा होईल. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लेखानुदान मांडण्याची वेळ आल्याने सरकार जास्त काही करू शकत नव्हते. त्या स्थितीत हात बांधलेले असतानाही अशा घोषणा करून सरकारने बॉम्बगोळा टाकला आहे.

करमाफी, शेतकऱ्यांना मिळणारे पैसे आणि सवलत देणाºया इतर घोषणा यांचा मेळ केला तर हे लक्षात येते की, या सवलतींमुळे सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसणार आहे. मात्र ही तूट कुठून भरण्यात येईल, हे गुलदस्त्यात आहे.

या अर्थसंकल्पाने एक मोठी गमतीदार परिस्थिती निर्माण केली आहे. जर हेच सरकार हवे असेल तर यांनाच निवडावे लागेल, नाहीतर ही दाखवलेली स्वप्ने पूर्ण होणार नाहीत आणि समजा, मतदारांनी दुसरे सरकार निवडले आणि त्यांनी सत्तेवर येताच या घोषणा रद्द केल्या तर बघा, आम्ही तर लोकाभिमुख आणि शेतकºयांसाठी किती चांगल्या योजना केल्या होत्या़ मात्र यांनी त्या रद्द केल्या, अशी ओरड करायला विरोधी पक्ष म्हणून भाजपाला आयती संधी मिळणार. म्हणजेच धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी मानसिकता सामान्य नागरिकांमध्ये नक्कीच फोफावणार. ती निर्माण करण्याचे काम या लोकप्रिय घोषणांनी केले आहे. एक गोष्ट मात्र नक्की की, या अर्थसंकल्पी भाषणामुळे लोकांच्या मनात असलेली भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलची भीती काही प्रमाणात कमी झाली आणि पीयूष गोयल नावाचा एक दमदार अर्थमंत्री भविष्यात जोरदार फटकेबाजी करू शकेल, याबाबत कुठलीही शंका आता उरली नाही. त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा खराच होता, पण त्यातील अर्थ हा स्वप्नवत होता. वास्तववादी नव्हता, असे म्हणायला हरकत नाही़

Web Title: A hopeful budget of 'good day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.