‘हा माणूस खूप खातो’ म्हणून हॉटेल बंदी !!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 06:12 AM2021-12-02T06:12:27+5:302021-12-02T06:13:12+5:30
चीनमधल्या अशाच एका लाइव्ह स्ट्रीमरला एका भलत्याच अडचणीला तोंड देण्याची वेळ आली आहे. कांग नावाच्या या लाइव्ह स्ट्रीमरला चीनच्या चांगसा शहरातल्या हंदादी सीफूड बार्बेक्यू बफे या हॉटेलने त्यांच्या हॉटेलमध्ये यायला बंदी केली आहे आणि त्यामागचं त्यांनी दिलेलं कारण आहे, की तो खूप जास्त खातो.
सतत वेगवेगळ्या चवीचं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खायला आवडणाऱ्या लोकांना आवड पूर्ण करण्याचा आत्ताआत्तापर्यंत एकच मार्ग होता. तो म्हणजे आपल्याला आवडलेल्या हॉटेलमध्ये जाणं! मात्र आपण राहत असलेल्या ठिकाणच्या पलीकडचं जेवण जेवायला मिळणं तर सोडाच, बघायला मिळणंदेखील अवघड होतं. रेसिपी बुक्स किंवा वर्तमानपत्रातील रेसिपीचे स्तंभ यातूनच नावीन्याची भूक भागवायला लागत होती.
इंटरनेटच्या उदयानंतर ठिकठिकाणचं फूड कल्चर सहज बघता येऊ लागलं. तरीही, एखादा पदार्थ बघून तो चवीला कसा लागेल हे काही कळायचं नाही. एखाद्या हॉटेलमधील एखादा पदार्थ आवर्जून खाऊन बघितला पाहिजे हे सांगणारं कोणी नव्हतं. ही मोठी उणीव सोशल मीडियाने भरून काढली.या मीडियात फूड कल्चरला मोठी जागा मिळाली. त्यातूनच फूड ब्लॉगर्स किंवा फूड इन्फ्ल्युएंसर्सचा उदय झाला.
ठिकठिकाणच्या रेस्टॉरंटसमधील वेगवेगळ्या पदार्थांबद्दल खरा अभिप्राय देणं, त्यांच्या रेसिपीजची चर्चा करणं अशा अनेक प्रकारे फूड ब्लॉगर्स किंवा फूड इन्फ्ल्युएंसर्स काम करतात. या ब्लॉगर्सच्या फूड ब्लॉग्जमध्ये आपल्याबद्दल लिहून आलं की आपण त्याच्या फॉलोअर्सपर्यंत थेट पोचतो हे माहिती असल्याने रेस्टॉरंटस् अशा मोठ्या ब्लॉगर्सना आपणहून आमंत्रण देतात. फूड ब्लॉगर किंवा इन्फ्ल्युएंसर असणं हे काम व्यवसाय म्हणून यशस्वीपणे करणारे अनेक लोक सोशल मीडियावर आहेत.
फूड ब्लॉगिंग आता लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यापर्यंत आलं आहे. मात्र, चीनमधल्या अशाच एका लाइव्ह स्ट्रीमरला एका भलत्याच अडचणीला तोंड देण्याची वेळ आली आहे. कांग नावाच्या या लाइव्ह स्ट्रीमरला चीनच्या चांगसा शहरातल्या हंदादी सीफूड बार्बेक्यू बफे या हॉटेलने त्यांच्या हॉटेलमध्ये यायला बंदी केली आहे आणि त्यामागचं त्यांनी दिलेलं कारण आहे, की तो खूप जास्त खातो. हे हॉटेल ‘ऑल यू कॅन ईट’ प्रकारचं आहे. म्हणजे त्या हॉटेलमध्ये प्रवेश करताना एक ठराविक रक्कम भरावी लागते आणि त्यानंतर ग्राहक त्यांना पाहिजे तो पदार्थ पाहिजे तितक्या प्रमाणात खाऊ शकतात. या प्रकारच्या हॉटेल्सचे त्यांचे स्वतःचे काही अंदाज असतात. एक माणूस एका वेळी जास्तीत जास्त किती खाऊ शकतो याची गणितं मांडलेली असतात. एकूण ग्राहकांपैकी किती जण जास्त खातील, किती लोक मध्यम प्रमाणात खातील, किती लोक कमी खातील याचे अंदाज बांधलेले असतात.
मात्र, या कांग नावाच्या माणसाने हंदादी सीफूड बार्बेक्यू बफे या हॉटेलचे सगळेच अंदाज चुकविले. त्याच्या मालकाचं म्हणणं आहे की कांग त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला आला की त्याला दर वेळी काहीशे युआनचं नुकसान होतं. हॉटेल मालकाचं म्हणणं आहे, की कांगने एका वेळी त्याच्या हॉटेलमध्ये दीड किलो पोर्क ट्रॉटर्स खाल्ले. परत एका वेळी साडेतीन ते चार किलो प्रॉन्स खाल्ले. प्रॉन्स वाढून घेण्यासाठी लोक सामान्यतः चिमटा वापरतात, कांग मात्र त्याचा संपूर्ण ट्रे ताटात वाढून घेतो. तो एका वेळी २० ते ३० सोया मिल्कच्या बाटल्या संपवतो. इतक्या प्रचंड प्रमाणात खाणारे लोक आम्हाला परवडत नाहीत, असं हॉटेल मालकाचं म्हणणं आहे.
त्यावर कांग असं म्हणतो की, भरपूर खाऊ शकणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत हे हॉटेल भेदभाव करतं आहे. त्याचं असंही म्हणणं आहे, मी वाढून घेतलेलं सर्व अन्न संपवतो. मी काहीही वाया घालवत नाही. केवळ मी खूप जास्त खाऊ शकतो हा माझा गुन्हा आहे का?
कांगवर हॉटेलने बंदी घातल्याचा बातमीला चीनमधल्या वीबो या सगळ्यात लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साइटवर २५० मिलियनहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. काही लोकांना असं वाटतंय की कांगवर अन्याय झाला आहे, तर इतर काहींना असं वाटतंय की हॉटेलला जर खूप खाणारे लोक परवडत नसतील तर त्यांनी ‘ऑल यू कॅन ईट’ अशा प्रकारचं हॉटेल चालवूच नये.
एकीकडे लोकांचं मत कांगच्या बाजूला झुकलेलं असताना चिनी सरकार मात्र फूड इन्फ्लुएन्सर्सवर बंधनं घालायच्या विचारात आहे. अन्नाची नासाडी होणं हा चीनमधला ज्वलंत प्रश्न असून, फूड इन्फ्लुएन्सर्समुळे हा प्रश्न अधिकाधिक जटिल होत चालला आहे असं त्यांना वाटतं. ‘इटिंग लाइव्हस्ट्रीम’ किंवा ‘इटिंग स्लो’ असे शब्द सर्च करण्यासाठी टाकले तर त्याला वॉर्निंग सिग्नल्स दिले जाताहेत. चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी अन्नाच्या नासाडीबद्दल देशाला खडसावल्यानंतर सोशल मीडिया साइटसनी हे पाऊल उचलायला सुरुवात केली आहे.
‘खाऊन माजावं, टाकून माजू नये’
अर्थात, कितीही केलं, तरी अन्न हे काही फक्त विकत घेणाऱ्याच्या मालकीचं नसतं. ते जागतिक संसाधन आहे आणि त्यामुळे ते जपूनच वापरलं गेलं पाहिजे. शेवटी ‘खाऊन माजावं, टाकून माजू नये’ या विचाराला काही पर्याय नाही हेच खरं!; पण कांगसारख्या खूप खाणाऱ्या माणसांना हे सांगणार कोण?