व्यसनाधीन मुलांना फक्त तुरुंगात डांबून प्रश्न कसा सुटेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 08:51 AM2021-10-27T08:51:33+5:302021-10-27T08:52:26+5:30

व्यसन हा शारीरिक व मानसिक आजार आहे.. तो गुन्हा मानून त्यावर शिक्षा देणं ही हिंसाच!... मग ती शिक्षा कुटुंब देवो, समाज देवो अथवा कायदा!

How can addicted children be left in jail? |  व्यसनाधीन मुलांना फक्त तुरुंगात डांबून प्रश्न कसा सुटेल?

 व्यसनाधीन मुलांना फक्त तुरुंगात डांबून प्रश्न कसा सुटेल?

Next

- मुक्ता पुणतांबेकर
(संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे)

तुरुंगात कोंडलेल्या आर्यन खानच्या निमित्ताने सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. ज्यांच्याकडे अत्यल्प प्रमाणात अंमली पदार्थ सापडले आहेत, अशा तरुण वयातल्या मुलांना थेट तुरुंगात न कोंडता त्यांच्या समुपदेशनाची व्यवस्था केली गेली पाहिजे, असं निरीक्षण सामाजिक न्याय मंत्रालयाने नोंदवल्याचं वाचलं. अंमली पदार्थ प्रकरणातील अन्य सनसनाटीपणा जरा बाजुला ठेवून या सूचनेचा विचार केला जाणं आवश्यक आहे, असं मला मुक्तांगणच्या अनुभवातून निश्चितपणाने वाटतं.
 
वाढत्या वयातली, जगण्याचा अनुभव घ्यायला आसुसलेली तरुण मुलं-मुली व्यसनात अडकल्याचं बघताना त्रास होतो, हे खरं आहे.  व्यसन हा शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवरचा आजार आहे. तो गुन्हा मानून त्यावर शिक्षा देणं ही हिंसाच आहे, मग ती शिक्षा कुटुंब देवो, समाज देवो अथवा कायदा. ड्रग्जसारख्या अमली पदार्थांच्या आहारी गेल्यावर सवय जडून व्यसन लागतं. मग ‘ती’ गोष्ट मिळाली नाही की   हातापायाची थरथर, नाकाडोळ्यांतून पाणी येणं, झोप न लागणं, डायरिया, उलट्या, भूक न लागणं, भास होणं अशा प्रकारचे त्रास सुरू होतात.  

या त्रासाला घाबरूनच व्यक्ती व्यसन सोडत नाही. केलेले निश्चय, दिलेली वचनं सगळं मागं पडून दुष्टचक्रात अडकतात. यावर घरचे काय करतात? - पैसे देणं बंद करतात, अंगारेधुपारे करतात, उपदेश देतात, धमक्या देतात, कोंडून घालतात. कायदा काय करतो ?- तुरुंगवास आणि शिक्षा! थोडक्यात त्या व्यक्तीचं नियंत्रण करण्याचे प्रयत्न, योग्य समुपदेशन आणि जरूरीनुसार औषधोपचार याशिवाय  “नियंत्रण मिळवण्याच्या अन्य प्रयत्नां”चा काही उपयोग होत नाही. पहिली पायरी असते ती स्वीकाराची! नेमकं या उलट समाजात घडत असतं म्हणून तर अडचणी उभ्या राहतात. पौगंडावस्थेतील मुलं त्यांच्यातील संप्रेरकांच्या बदलामुळे शरीर विकासाच्या वेगळ्या टप्प्यात असतात. त्यामुळं त्यांची मानसिकता, भावुकता, विचार करण्याची पद्धत वेगळी असते.  मोठी माणसं मेंदूच्या विकासाचा हा टप्पा समजून न घेता मुलांना दूषणं देतात, उपदेश, टीका करतात. 

मग मुलं आपल्या अडचणींविषयी बोलेनाशी होतात. त्यांचं ऐकून घेणारे लहान-मोठ्या वयातले मित्र त्यांना जवळचे वाटू लागतात. याच वाटेवर ताण हलका करण्यासाठीनिमित्त म्हणून  ड्रग्ज भेटतात आणि गैरसमज होऊन रस्ता निसरडा होतो. आपण पालक, शेजारी, समाज, शिक्षक कुणीही असू, हे समजून घेणं जरूरीचं आहे की आपण झपाट्यानं वाढणारी अनेक मुलं मनानं अजूनही लहान व कौतुकाची भुकेली असतात. चुकणा-या गोष्टी सांगायचीही काही पद्धत, वेळ असते. मुलांचा खासगीपणा न राखता चुकीच्या पद्धतीनं त्यांची कानउघाडणी करण्यानं संबंध केवळ दुरावतात व महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायची जागा आपण गमावून बसतो.

संवाद सुरू करायचा असेल तर हे टाळलं पाहिजे.  आमच्याकडे लॉकडाऊनदरम्यान एक मुलगा आला होता. कोरोनामुळे चार महिने त्याला मुक्तांगणमध्येच राहावं लागलं. त्याला आईबाबा न्यायला आले तेव्हा त्यांची ती पुनर्भेट बघायला मीच उत्सुक होते, पण तो समोर येताच आईनं त्याचे वाढलेले केस, पोनीटेल बघून ‘काय केलंय हे केसांचं?’ असा शेरा मारला. आनंदात राहायला शिकलेल्या त्याचे भाव झर्रकन बदलले आणि तो चिडून गेला. फंकी कपडे नि केस हे खरंतर खूप क्षुल्लक मुद्दे आहेत. पालकांना सुधारलेली तब्येत, हसरा भाव याविषयी बोलता आलं असतं. - मला दिसतं की पालक अशा चुका करतात. 

सांगणा-यानं कृतीच्या पातळीवर बदल केला तर सांगायचा हक्कही येतो. म्हणूनच आम्ही भांडणांचेही नियम केले आहेत. जसे, विषय बदलायचा नाही, वेळेचं बंधन पाळायचं, ज्यांच्यामध्ये विसंवाद आहे त्या माणसांखेरीज भांडणात कुणाला सामील करून घ्यायचं नाही. अशा नियमांनी संबंध विकोपाला जात नाहीत. पौगंडावस्थेतल्या मुलांशी दोहोबाजूंनी नियम करून ते पाळण्याचा आग्रह धरावा लागेल. दोहोबाजूंनी तडजोड करत प्रश्नांची उत्तरं काढावी लागतील. व्यसनात अडकलेल्या मुलांसाठीच्या शासकीय ऑब्झर्वेशन होम्सची अवस्था वाईट आहे.

तिथं टीव्ही असतो व वेळेवर जेवण देतात एवढंच. एरवी मुलं डांबलेलीच. मात्र व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये जशी दिनचर्या असते. शारीरिक व्यायाम, मेडिटेशन, फिल्म्स बघणं, विविध क्षेत्रातील पाहुण्यांच्या भेटी, चर्चा-तशी व्यवस्था सरकारी निरीक्षणगृहात करायला हवी. त्यांना ते सहज शक्य आहे. समुपदेशन व जरूरीनुसार औषधोपचाराने खूप फरक पडतो. व्यसनाधीन मुलामुलींच्या बदलासाठी पूरक वातावरण तयार झालं तर नकारात्मक प्रभाव टाकणारे मॉडेल्स तयार होणार नाहीत. पुनर्वसनाचा असा मानवी पातळीवर विचार करण्यातून अत्यंत चांगले बदल घडतात हे आम्ही अनुभवतो आहोत.

Web Title: How can addicted children be left in jail?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.