वादांशिवाय साहित्य संमेलन गाजणार कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 05:44 AM2021-11-16T05:44:57+5:302021-11-16T05:46:01+5:30
साहित्य संमेलन वाजलं पाहिजे, गाजलंही पाहिजे. त्यात मिळमिळीतपणा नको. त्यामुळेच संयोजकांपासून, निमंत्रकांपर्यंत सारेच ‘तयारी’त आहेत..
संजय पाठक
संमेलन चांगलं झालं पाहिजे, वाजलं पाहिजे आणि गाजलंही पाहिजे, पण त्यासाठी आवश्यक ते काय?... केवळ साहित्य व्यवहार नाही तर संमेलनाभोवतीचे वादही झाले पाहिजेत. तीही एक वैचारिक चर्चाच आहे. समेलनांचे स्थळ कुठे असावे, अध्यक्ष कोण, उद्घाटक कोण प्रतिगामी की पुरोगामी?... ही सुरुवातीची कहाणी पार पडल्याशिवाय संमेलनाचा साहित्य व्यवहार पूर्णच होऊ शकत नाही. आता नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवायचं आणि तेही इतक्या मिळमिळीत वातावरणात? - वाद झालेच पाहिजेत, यासाठी आयोजक, निमंत्रक शर्थीचे प्रयत्न करीत आहेेत. त्यात राज ठाकरे यांच्या मनसेने उडी घेतली आणि संमेलनाच्या गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख पूर्ण का नाही म्हणून निषेधाचा सूर आळवला. उद्घाटक कोण असावेत, यावरूनही वाद सुरू झाला आहे.
तात्पर्य काय, वाद झडले पाहिजेत आणि एकमेकांच्या विरोधात लढले पाहिजे. त्याशिवाय साहित्य संमेलनाचा ‘फिल’ येत नाही. नाशिकमध्ये ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचे ठरले, त्यावेळीच या वादविवादाचा उपोदघात सुरू झाला. हे संमेलन दिल्लीला व्हावे की नाशिकला, असा एक वादाचा पहिला अंक सुरू झाला. नाशिकला संमेलन भरवण्याच्या अंतिम निर्णयाने वादाच्या पहिल्या अंकावर पडदा पडला. नाशिकमध्ये संमेलन होणार, मात्र ते घ्यावे तर केव्हा घ्यावे, कोरोना लाट थांबली असे केव्हा मानायचे, असा वाद सुरू असताना नाशिकच्या संयोजकांनी मार्चमधील मुहूर्तही जाहीर करून टाकले. त्यावेळी नाशिकमध्ये कोरोनाची इतकी तीव्र लाट आली, की संमेलन तर पुढे ढकलावे लागलेच, स्वागताध्यक्ष म्हणजेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही काेरोनाने गाठले. ते कोरोनामुक्त होत नाहीत तोच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटलांची एक विस्तृत मुलाखत ‘अक्षरयात्रा’मध्ये प्रसिध्द झाली. त्यात नाशिकच्या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य संमेलनाचा कसा बाजार मांडला जात आहे आणि यापूर्वीचे खर्चाचे सर्व विक्रम मोडीत काढून संमेलन कसे चार कोटींच्या घरात पोहोचले आहे, इथपर्यंत त्यांनी चर्चा केली. संमेलनाच्या आयोजकांनी स्वागताध्यक्षपदाच्या निवडीबाबत स्वत:चे अधिकार वापरण्यासाठी मूठ सोडवून घेऊन आयोजकांनी किती स्वैराचार मांडला आहे, असा त्यांचा रोख होता. खरेतर संमेलन नाशिकला होणार म्हटल्यावर त्याच्या केंद्रस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ असणे स्वाभाविकच आहे. त्यानुसार नाशिकमधील आयोजकांनी स्वागताध्यपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. छगन भुजबळ नावानेच संमेलनाला ‘ग्लॅमर’ आले. ‘नाशिक फेस्टिव्हल’च काय, परंतु पक्षाची शिबिरेदेखील चित्तचक्षुचित्ताकर्षक इव्हेंटमध्ये परिवर्तीत करण्याची क्षमता भुजबळ यांच्याकडे आहे, हे जाणूनच तर त्यांच्याकडे स्वागताध्यक्षपद चालून आले.
कोरोनाची दुसरी लाट जवळपास संपुष्टात आल्यानंतर आता ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत साहित्य संमेलन होणार आहे. फरक फक्त एकच! पूर्वी हे साहित्य संमेलन नाशिक शहरातील कॉलेजरोडवरील प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगरीत होणार होते. मात्र, आता संमेलन शहराच्या जवळपास हद्दीबाहेर असलेल्या भुजबळ नॉलेज सिटीत होणार आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, ही मोबाईलवरील ध्वनीफित बहुधा आयोजकांच्या कानात अजूनही घुमत असावी, त्यामुळे ज्या ठिकाणी बघे आणि हौशे-गवशे सहज पोहोचणार नाहीत, अशी दुर्गम जागा बहुधा त्यांनी निवडली असावी. त्यातही पुन्हा साहित्य महामंडळाच्या पथकाने या जागेची पाहणी करून येथे संमेलन भरवण्यास अनुकूलता दर्शवल्याचे ‘जाहीर’ झाले नाही. बहुधा ही कार्यवाही गुपचूप झाली असावी अथवा औरंगाबाद येथून आभासी पध्दतीने स्थळ पाहणी झाली असावी. अशा ठिकाणी संमेलन भरवताना संयोजकांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यात सर्वात मोठे आव्हान संमेलनस्थळाच्या भोवती असलेल्या माळरानाचे आहे. संमेलन सुरू असताना या माळरानातून एखादा बिबट्या वा सर्प आलाच तर काय करायचे म्हणून तेथे सर्पमित्र नियुक्त करण्याचे आणि वनविभागाचे पिंजरे लावण्याचेही नियोजन सुरू आहे.
इतक्या आव्हानात्मक परिस्थितीत संयोजन करताना संमेलनाच्या गीताच्या वादाची ठिणगी पडली. संमेलनगीत रचणाऱ्याने शब्दांची गुंफण अशी काही केली की, त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्पष्ट उल्लेख न करता ‘स्वातंत्र्याचा सूर्य’ असा केला. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला. आधीच गीतकाराचे आडनाव ‘गांधी’, त्यात सावरकरांचा अवमान... मग काय... परंतु संयोजकांनीच जरा नमते घेत गीतात स्वातंत्र्यवीरांचा नामविस्तार केला. या वादाला फोडणी देणाऱ्यांनी आता आणखी एक मागणी केली आहे. ती म्हणजे संमेलनाचे उद्घाटक म्हणून गुलजार आणि जावेद अख्तर कशाला हवेत? त्यांचा मराठी साहित्याशी काय संबंध, असा आता वादाचा नवा मुद्दा आहे. संमेलनाच्या निमित्ताने असे वादामागे वाद सुरुच आहेत.
नाशिकमध्ये विनावादाचे आणखी एक समांतर संमेलन म्हणजेच विद्रोही साहित्य संमेलन याच कालावधीत होत आहे. त्यासाठी कोणत्याही आमदाराला निधी देण्याची सक्ती नाही की, हॉटेलवाल्यांच्या खेाल्यांचे आग्रही आरक्षण नाही. देणगीच्या निधीसाठी बँकांपुढे कोणाचा हात नाही. तळागळातील नागरिकांकडून मिळेल त्या मदतीतून त्यांचा साहित्य प्रपंच सुरू आहे. सर्वात गमतीचा भाग म्हणजे ज्या नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने १६ वर्षांपूर्वी प्रस्थापितांचे म्हटले जाणारे ७८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवले, त्याच आयोजकांनी आपल्या जागेत विद्रोहीला आसरा दिला आहे. विद्रोहीच्या आयोजकांनी महात्मा फुले यांच्या ग्रंथकार परिषदेच्या पत्राचा उल्लेख सातत्याने केला आहे. मात्र, त्याच महात्मा फुले यांचे अनुयायी म्हटले जाणारे सध्या अखिल भारतीय मराठी संमेलनातील कळीचे आयोजक आहेत. कालाय तस्मै नम:
(लेखक नाशिक लोकमतचे, वृत्तसंपादक आहेत)
sanjay.pathak@lokmat.com