निर्मळ आणि उदात्त प्रेम जिहाद कसे असू शकेल? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 05:48 AM2021-01-27T05:48:44+5:302021-01-27T05:49:18+5:30

सर्व धर्म हे साध्या जीवनपद्धतीचा पुरस्कार करतात, इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करतात आणि सर्वांवर प्रेम करण्याची प्रेरणा देतात.

How can pure and noble love be jihad? | निर्मळ आणि उदात्त प्रेम जिहाद कसे असू शकेल? 

निर्मळ आणि उदात्त प्रेम जिहाद कसे असू शकेल? 

googlenewsNext

एस.एस.मंठा, विचारवंत व प्राॅक्टर ॲण्ड गॅम्बल इंडियाचे माजी सीईओ

आपण सगळे जन्मत: एकसमान असतो. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा आपल्या सर्वांना बांधणारा समान धागा असायला हवा, कारण आपले पालक, धर्म व धार्मिक अस्मिता जन्मत:च निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नसते.  पण अशी अस्मिता किंवा ओळख का असायला हवी?  केवळ इतरांच्या मन आणि शरीरावर ताबा मिळवून आपली मतप्रणाली त्यांच्यावर लादण्यासाठी? आपल्या पूर्वजांनी भटकंतीचे जीवन सोडून कृषीकर्माकडे वळण्याचे ठरवले तेव्हा त्यांना शेतात कसण्यासाठी माणसे मिळत नव्हती. त्यातून इतरांवर नियंत्रण मिळवण्याची कल्पना पुढे आली.  तत्कालीन आव्हानांना तोंड देताना सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात धर्म आणि ‘देव’ या संकल्पनेवरली श्रद्धा चपखल बसली असावी.  मग ही श्रद्धा इतरांच्या गळी उतरवायची असेल तर त्यांचे धर्मांतर करणे ओघानेच आले.  जरी प्रेम कधीच जिहाद असू शकत नसले तर ‘लव्ह जिहाद’ हीदेखील अशाच कल्पनेची उत्पत्ती आहे.

आपल्याकडे धर्मांतरे रोखण्यासाठी राज्य पातळीवर १९४० पासून धर्मस्वातंत्र्यविषयक कायदे केलेले आहेत.  आजमितीस २९ पैकी अरुणाचल प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि उत्तराखंडात असे कायदे आहेत. मध्य प्रदेशने तर १९६८चा जुना कायदा मोडीत काढत नवा कायदा केला आहे. हे सर्व कायदे मसुद्याच्या बाबतीत एकसमान आहेत आणि ते सक्तीच्या, तसेच आमिष वा प्रलोभन दाखवून केलेल्या फसव‌णुकीच्या धर्मांतरास प्रतिबंध करतात. आता उत्तर प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटकाने केलेल्या कायद्यांद्वारे लग्नाच्या माध्यमातून होत असलेल्या सक्तीच्या धर्मांतरास मनाई केलेली आहे.  प्रलोभने दाखवून, खोट्या प्रेमाची बतावणी करून, फसवून, अपहरण करून आणि लग्नाच्या जाळ्यात गुंतवून धर्मांतरे केली जात आहेत, ही गंभीर बाब आहे. केवळ एखाद्या धर्माच्या प्रसारार्थ धर्मांतर करणे हा अधमपणा नव्हे का? अर्थात, एका चांगल्या उद्देशाला हरताळ फासत उपरोक्त कायद्यांचा गैरफायदा घेण्याचे प्रकारही चालले आहेत, हेही मान्य करावे लागेल.  

आपल्या जीवनात धर्मांचे नेमके स्थान काय?  विचार करणारी प्रजाती म्हणून माणूस आपल्या जीवनाचे प्रयोजन शोधतच असतो. आपण जेव्हा चुकतो तेव्हा अंतरातला एक आवाज आपल्याला नित्य सावध करत असतो. या आवाजाचे रहस्य शोधण्याचा यत्न आपण किती वेळा केला आहे?  किंवा आपल्या इतरांबरोबरच्या वर्तनाशी या अंतरात्म्याच्या आवाजाचा काही संबंध आहे का, याचा शोध आपण घेतला आहे? आस्तिक, नास्तिक आणि त्यांच्या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक पडावावरल्या लोकांवरही याबाबतीत धर्माचा काही प्रभाव असतो का?  परमार्थ निष्ठा किंवा संघटित धर्म नेहमीच आपल्या नैतिकतेचे दिशादर्शन करत असतात का? आपला धर्म आपला सांस्कृतिक आकृतिबंध व आपले सत्तासंधान अधोरेखित करतो का?

वादाचा प्रतिवाद हा असतोच. श्रद्धावान असतात तसे अश्रद्धही असतात. ईश्वरनिष्ठा म्हणजे काय, हे सांगल्याशिवाय आपण निरीश्वरवाद कसा उलगडून सांगणार?  फ्रेंच राज्यक्रातीमुळे विवेकवादाने धर्मावर कुरघोडी करता येते हे दाखवून दिले. त्यामागे विज्ञानाची प्रेरणा होती, पण विज्ञानालाही कशाने तरी प्रेरित केले असेलच की!  तुलनेने अज्ञेयवाद ही अधिक प्रमाणात विकसित कल्पना आहे. देव आहे की नाही यावर ती खल करत नाही तर मानवी विचारशक्तीची मर्यादा देव  व त्याच ओघात विश्वाची उत्पत्ती, मृत्यूपश्चातचे जीवन आदी संकल्पनांना प्रसवत असल्याचे प्रतिपादन करते. ही एका प्रकारे द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञानाची सुधारित आवृत्तीच नाही का?

जगभरातले एकूण एक धर्म आपल्यासाठी एकच संदेश देत असतात; आपणच त्या संदेशांची तत्त्वज्ञान, मतप्रणाली किंवा जीवनपद्धती अशाप्रकारे वर्गवारी करत असतो. आपल्या धारणा काहीही असल्या तरी सर्व धर्म हे साध्या जीवनपद्धतीचा पुरस्कार करतात, इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करतात आणि सर्वांवर प्रेम करण्याची प्रेरणा देतात.  मात्र आपली मते इतरांवर लादण्यासाठीची धडपडही मानवता निरंतर पाहत आलेली आहे. आपण  धार्मिक आणि आध्यात्मिक वर्चस्व दाखवण्याची आवश्यकता आहे का?

वेद किंवा गीतेत आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहांवर भाष्य नसले तरी समाजात खोलवर रुजलेली जातिव्यवस्था आंतरजातीय आणि आंतर-गोत्र विवाहांना नकार देते; यात आंतरधर्मीय विवाहांना विरोधही ओघानेच आला. शहरी भागात आता काही प्रमाणात शैथिल्य दिसत असले तरी ग्रामीण भागात या विचारांचा पगडा अजूनही आहे. ‘ऑनर किलिंग’चे प्रकार रोज घडताहेत. सुन्नी इस्लाम धर्मांत विवाहातून होणारे मूल मुस्लिमच असेल असे मानून विवाहाआधी धर्मांतर अनिवार्य मानतात, म्हणजे विवाह आंतरधर्मीय ठरत नाही. अशा वेगवेगळ्या धारणा असल्यामुळे एकमत होणे कठीणच. आंतरधर्मीय विवाह हा चांगला नव्हे यावर मात्र सगळ्याच धर्मांचे एकमत असते. लग्नामुळे माणसे आणि मने जोडणे अपेक्षित असते. तसे होत नसेल तर मग आंतरधर्मीयच किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या लग्नाचे प्रयोजनच काय?  किंवा कायद्याचे प्रयोजन काय? आकडेवारी सांगते की जगातली ६१% आंतरधार्मिक लग्ने काडीमोड घेऊन संपुष्टात येतात. अशा लग्नांतून उत्पन्न झालेली संतती बव्हंशी आईकडेच वाढते, वडिलांकडे नव्हे. यातून जगभरातले धर्म काही बोध घेणार का? एक परिपक्व प्रजात या नात्याने आपण धर्माचे कारण देत लग्नाला नकार देणे योग्य ठरेल का? काही झाले तरी जिहाद ही जीवनपद्धती असूच शकत नाही!

Web Title: How can pure and noble love be jihad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.