४६ वर्षात पुण्यातील ‘या’ रस्त्यावर एकही खड्डा कसा नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:03 AM2022-07-26T10:03:55+5:302022-07-26T10:04:39+5:30

मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा नुकतीच केली. पण, त्यांना खड्डेमुक्त रस्त्याचे हे खास पुणेरी रहस्य ठाऊक नसेल!

How come there is no pothole on this road in 46 years of pune? | ४६ वर्षात पुण्यातील ‘या’ रस्त्यावर एकही खड्डा कसा नाही?

४६ वर्षात पुण्यातील ‘या’ रस्त्यावर एकही खड्डा कसा नाही?

Next

संजय आवटे

‘रस्ता तयार केल्यानंतर दहा वर्षांत त्यावर एकही खड्डा पडला, तर आम्ही तो विनामूल्य दुरुस्त करून देऊ’, अशी गॅरंटीच मिळाली होती. पण, ती गॅरंटी देताना, रस्ता बांधणाऱ्या कंपनीनं अटीही घातल्या होत्या. टक्केवारी वगैरे भानगडीपोटी कोणत्याही नगरसेवकानं वा राजकीय नेत्यानं यात लुडबूड करायची नाही. दुसरं म्हणजे, कोणत्याही कारणासाठी रस्ता खोदायचा नाही. सगळे अगदी निर्विघ्न पार पडले आणि असा रस्ता तयार झाला की विचारायलाच नको. या रस्त्यानं आजवर एक ना दोन, ४६ पावसाळे पाहिले. पण, हा रस्ता वाकला नाही, थकला नाही. या रस्त्यावर एकही खड्डा आजवर कधी कोणी पाहिला नाही. पाच दशकांत या रस्त्याने अपार पाऊस झेलला, ऊन-वाऱ्याचा, प्रचंड वाहतुकीचा मुकाबला केला. पण, या रस्त्यावर एकही खड्डा मात्र पडला नाही. 

- हाच तो पुण्यातला प्रख्यात जंगली महाराज रस्ता! स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक असा हा रस्ता. अंतर सुमारे दोन किलोमीटर. सद्गुरू जंगली महाराजांची समाधी इथे असल्याने त्यांचेच नाव या रस्त्याला मिळाले आणि योग्याचा वारसा सांगणारा हा रस्ता त्याच ताठ कण्यानं अविचल, पण अव्याहत धावता राहिला. पुण्यात १९व्या शतकात तेव्हाच्या भांबुर्डा आणि आताच्या शिवाजीनगर भागात सद्गुरू जंगली महाराज यांचे वास्तव्य होते. सुफी, वारकरी, दत्त संप्रदाय आणि सत्यशोधक विचारांशी ते जोडले गेले होते. अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि जातीभेद यांचे ते कट्टर विरोधक. त्यांचे नाव सांगणारा हा रस्ता. 

या रस्त्याची कथाही ऐतिहासिक. १९७२च्या दुष्काळानंतर १९७३-७४ला राज्यात सर्वत्र प्रचंड पाऊस झाला. या पावसात पुण्यातील सर्वच भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. श्रीकांत शिरोळे हे तत्कालीन स्थायी समितीचे सभापती. पावसाने शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण केल्यावर नागरिक आणि नगरसेवकांनीही महापालिकेकडे तक्रारी सुरू केल्या. अर्थात पालिकेने नेहमीप्रमाणे खड्ड्यांचे खापर पावसावर फोडले.
१९७३मध्ये ‘रस्ते’ या विषयावर शहरभर गदारोळ होत असे. माध्यमंही तेव्हा रस्त्यांच्या बातम्या देत असत. ‘सूत्र’ नावाचे प्रकरण अद्याप जन्माला यायचे होते. गुवाहाटीतल्या झाडी, डोंगारपेक्षा आपल्या शहरातले रस्ते महत्त्वाचे, याचे भान होते. एकूण, चित्र बरेच वेगळे होते. अशावेळी पुण्यातल्या रस्त्यांची चाळण असा मुद्दा चर्चेचा होता. बऱ्याच चर्चेनंतर, रस्ते बनविणाऱ्या ‘रेकॉन्डो’ या पारशी बंधूंच्या कंपनीला नमुना म्हणून ‘सद्गुरू जंगली महाराज मंदिर ते डेक्कन’ असा दोन किलोमीटरचा रस्ता बनविण्याचे १५ लाखांचे कंत्राट तेव्हा दिले गेले. तशी नोंद महापालिकेच्या दफ्तरात आहे. १ जानेवारी १९७६ला जंगली महाराज रस्त्याचे काम, हस्तांतरण वगैरे पूर्ण झाले. ३१ डिसेंबर १९८५पर्यंत कंपनीने या रस्त्याच्या मजबुतीची हमी घेतली होती. पण १० वर्षे सोडाच, गेली ४६ वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही! 

अर्थात, सर्वसामान्य माणसांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची. आपण पुणेकर आहोत, तर पुणे ही आपली जबाबदारी आहे, हे भान तेव्हा होते. त्यामुळेच, पुढची १० वर्षे महापालिकेने मांडव वा खोदकामाला परवानगीच दिली नाही. पण, कोणी त्याविषयी तक्रार केली नाही. गणपतीचे मांडव ड्रममध्ये वाळू ठेवून, त्यात बांबू रोवून उभे केले गेले. पण, रस्त्यावर साधा खिळाही ठोकायचा नाही, हे पथ्य पाळले गेले. हा खड्डेमुक्त रस्ता त्यामुळेच आज जादुई भासतो! रस्ते बांधणी क्षेत्रातील काही जाणकारांनी सांगितले की, याची कारणे रस्त्याच्या बांधणीत आहेत. रस्ता तयार करताना तो प्रथम खोदावा लागतो. तो किती खोलवर खोदायचा, त्यावर कोणत्या आकाराच्या खडीचे किती थर द्यायचे, कोणत्या क्रमाने द्यायचे याचे तंत्र आहे. त्या पद्धतीने काम केले तर रस्त्याची मजबुती कायम राहते. रस्ता, त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांचे प्रकार, वापर किती वेळ आणि कसा होतो यावर खोदाई, खडीकरण, त्यावर दबाव, मग डांबर, मग पुन्हा चर (अगदी बारीक खडी), मग खडीची जवळपास पांढरी पावडर याची गणिते केली जातात. निविदेत तसे स्पष्ट नमूद केले जाते. जंगली महाराज रस्त्याच्या संदर्भात या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन केले गेले. ठरवून ‘हॉटमिक्स’ पद्धत वापरून हा रस्ता तयार झाला, असे अभ्यासक सांगतात. 

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतले सगळे रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. नव्या मुख्यमंत्र्यांना ‘समृद्धी’चे गुपित ठाऊक आहे. पण, त्यांना पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्याचे हे रहस्य ठाऊक नसेल! या डांबरीकरणावरून एक गंमत आठवली. १९३८च्या दरम्यान आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेत असताना (तेव्हा महानगरपलिका अद्याप व्हायची होती!) त्यांनी शहरातील ‘भांबुर्डा’ भागाचे शिवाजीनगर आणि ‘रे मार्केट’चे महात्मा फुले मंडई असे नामकरण केले. शहरात पीएमटी सुरू केली आणि महत्त्वाचे म्हणजे स्थायी समितीचे पुण्याचे पहिले अध्यक्ष म्हणून पुण्यातील रस्त्यांचे डांबरीकरण केले. त्यावेळी त्याला विरोध करताना एक नगरसेवक म्हणाले होते, ‘आधीच पुण्याच्या रस्त्यांमध्ये गुडघागुडघा चिखल. त्यात आता डांबर ओतल्यावर चालणाऱ्या माणसाचा पायच वर निघणार नाही.’ नंतर शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण झाले. त्याचे श्रेय जाते, आचार्य अत्रे यांच्याकडे! ‘डांबरी रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडत नसतात, हे मी त्यावेळी पालिकेला ठणकावून सांगितले होते’, असे श्रीकांत शिरोळे आजही सांगत असतात. जंगली महाराज रस्त्याच्या निमित्ताने त्यांनी याचा पुरावाच दिला. हा रस्ता साधा नाही. सत्यशोधक विचारांवर चर्चा करण्यासाठी महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकर या रस्त्यावरील जंगली महाराजांच्या मठात येत असत. पुण्यातील सामाजिक ऐक्य जोपासण्यातही जंगली महाराज रस्त्याचा वाटा मोठा आहे. मग सांगा, या रस्त्यावर खड्डे कसे पडतील?

(लेखक लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक आहेत)

sanjay.awate@lokmat.com

Web Title: How come there is no pothole on this road in 46 years of pune?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.