'एनटीए'ने एवढ्या मोठ्या घोडचुका कशा केल्या? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 05:47 AM2024-06-26T05:47:28+5:302024-06-26T05:49:24+5:30

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अनेक चुका केल्या. त्याची उत्तरे त्यांच्याकडे आहेत का? त्यामुळे 'एनटीए'ची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

How did NTA make such big mistakes | 'एनटीए'ने एवढ्या मोठ्या घोडचुका कशा केल्या? 

'एनटीए'ने एवढ्या मोठ्या घोडचुका कशा केल्या? 

हरीश बुटले, संस्थापक, 'डिपर' आणि संपादक, 'तुम्ही आम्ही पालक'

पेपरफुटीचे प्रकरण किंवा सॉल्व्हर गँगचे कृत्य हे समाजकंटक आणि नतद्रष्ट वृत्तीच्या लोकांचे काम आहे आणि तो प्रश्न नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अखत्यारीबाहेरचा आहे असे जरी गृहीत धरले तरी ज्या बाबतीत 'एनटीए'ची स्वतःची जबाबदारी होती त्या ठिकाणी त्यांनी एवढ्या घोडचुका कशा केल्या? ही चुकांची मालिका न संपणारी असल्याने एनटीएची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. NEET UG बाबतचा संपूर्ण घटनाक्रम बघता पुढील प्रश्नांची कोणती उत्तरे एनटीए देऊ शकेल याबाबत शंकाच आहे.

१. ऑक्टोबर महिन्यामध्ये अचानकपणे २२ ते २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला. अभ्यासक्रम कमी झाल्याने विद्यार्थ्यांना पेपर सोपे जातील आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर गुण मिळतील याची जाणीव असतानादेखील अंतिम पेपर साधारण का काढला? हे नेमकं का आणि कशासाठी केलेलं होतं याचं कोणतंही कारण दिलेलं नाही.
२. एनटीएने फॉर्म भरून घेताना एक महिन्याची मुदत संपून गेल्यानंतरही दोन दिवसासाठी (एप्रिल ९ व १०) पोर्टल पुन्हा सुरू करण्यामागे काय उद्देश होता? ते कोणाच्या परवानगीने आणि कशासाठी सुरू करण्यात आले? दुसऱ्या टप्प्यात नेमक्या किती विद्याथ्यर्थ्यांची नोंदणी झाली आणि या वाढलेल्या गुणांमध्ये यापैकी किती विद्यार्थी समाविष्ट आहेत याची कोणतीही आकडेवारी जाहीर केली नाही.
३. परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करताना केवळ विद्यार्थ्यांचे नाव, ज्यामध्ये त्याच्या आई-वडिलांचा कोणताही उल्लेख नसलेले फॉर्म्स एनटीएने स्वीकारले तरी कसे ? त्या दोन दिवसांत भरलेल्या फॉर्म्समधील काही विद्यार्थ्यांना एकच केंद्र कसे व का देण्यात आले? त्या त्या राज्यात केंद्र असताना विद्यार्थ्यांना इतर राज्यातून परीक्षा देण्याची मुभा का देण्यात आली? असे नियम ठेवण्यामागे नेमका उद्देश काय होता?
४. एनटीएने कोणतीही पूर्व सूचना न देता १४ जूनला लागणारा निकाल ४ जूनला सायंकाळी जाहीर केला. दहा दिवस शिल्लक असताना एवढी घाई करण्याचे कारण काय? त्याच दिवशी लोकसभेचे निकाल जाहीर होत होते. एकाच केंद्रावरील आठ विद्यार्थी, ज्यापैकी सहा विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले आणि त्यामुळेच शंका निर्माण झाली, त्या शंकेचं निरसन त्यांनी सुरुवातीलाच का केलं नाही? दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७१८ आणि ७१९ गुण मिळाले. NEET च्या प्रक्रियेत असे गुण मिळूच शकत नाहीत हे माहीत असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून निकाल का जाहीर केला?

५. निकाल जाहीर करताना असे गुण विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत ते 'ग्रेस' गुण दिल्यामुळे मिळालेले आहेत, ते निकाल जाहीर करताना का सांगितले नाही? ग्रेस मार्क्स देण्यासाठी जे सूत्र वापरले, ते सूत्र CLAT परीक्षेच्या वेळी २०१८ सालचे होते. मात्र ती परीक्षा ऑनलाइन होती आणि NEET परीक्षा ऑफलाइन ! त्याचप्रमाणे ते सूत्र मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसाठी वापरायचे नाही असे निर्देश असताना ते वापरले ही सर्वांत मोठी घोडचूक होती. ती का करण्यात आली?
६. ग्रेस मार्क्स केवळ १५६३ विद्यार्थ्यांनाच दिले आहेत, हे कोणत्या आधारावर सूचित केले? ७२० ते ६२० या गुणांच्या दरम्यानचा फुगवटा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसा निर्माण झाला आणि तोच ६२० ते ५२० या १०० माकांच्या दरम्यान त्या प्रमाणात का नाही या विषयी कोणतेही समाधानकारक विश्लेषण का दिले नाही?

या आणि अशा अनेक प्रश्नांची एनटीएकडे समाधानकारक उत्तरेच नाही. याशिवाय पेपर फुटी आणि केंद्र पातळीवर विद्यार्थ्यांना पेपर सोडवून देणाऱ्यांच्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्यावर वचक निर्माण करणे हादेखील एक महत्त्वाचा विषय आहे. त्यातच भरीस भर म्हणजे थेट डार्क वेबवर पेपर उपलब्ध झाल्याने UGC-NET आणि त्यापुढील दोनच दिवसांत NEET-PG देखील कॅन्सल करावी लागल्याने एनटीएची पुरती नामुष्की झाली आहे. एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार यांची तडकाफडकी उचलबांगडी करून नवीन कमान कर्नाटक कॅडरचे प्रदीप सिंग खरोला यांच्याकडे सोपवली आहे. मात्र NEET-UG चा आक्रोश बघता RE-NEET घेण्यावाचून कोणताही पर्याय दिसत नाही.            

Web Title: How did NTA make such big mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.