आधीचे ‘जादुई’ रेमडेसिवीर अचानक ‘निरूपयोगी’ कसे झाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 06:41 AM2020-10-20T06:41:13+5:302020-10-20T06:41:21+5:30
आज मात्र औषध कंपन्यांनी कोरोनाच्या आडून कोट्यवधीचा धंदा मांडला आहे. कोरोनाची महामारी सुरू झाली, त्या सुरुवातीच्या तीन महिन्यात कोरोनावरील औषधे म्हणून जी कोणती औषधे जगाने डोक्यावर घेतली ती सगळी पुढच्या तीन ते चार महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने कोणतेही ठोस कारण न देता बाद ठरवली. अत्यंत चीड आणणारी ही गोष्ट आहे.
अतुल कुलकर्णी । वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत
विल्यम राँजेन या शास्रज्ञाने एक्सरेचा शोध लावला. राँजेन हा एक्सरेचा जनक होता. त्यांनी त्याचे पेटंट घेतले असते तर ते आज बिलेनियर झाले असते. पण त्यांनी तसे केले नाही. ते म्हणाले होते, मानवी कल्याणासाठी याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे मी पेटंट घेणार नाही. हे वैद्यकीय क्षेत्रातलेच उदाहरण आहे.
आज मात्र औषध कंपन्यांनी कोरोनाच्या आडून कोट्यवधीचा धंदा मांडला आहे. कोरोनाची महामारी सुरू झाली, त्या सुरुवातीच्या तीन महिन्यात कोरोनावरील औषधे म्हणून जी कोणती औषधे जगाने डोक्यावर घेतली ती सगळी पुढच्या तीन ते चार महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने कोणतेही ठोस कारण न देता बाद ठरवली. अत्यंत चीड आणणारी ही गोष्ट आहे.
आता रेमडेसिवीरच्या बाबतीतही हेच सुरू आहे. हे कोरोनावरचे अधिकृत मान्यता मिळालेले औषध नाही. पण त्याचा फायदा रुग्णांना होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने हे औषधच निरूपयोगी असल्याचे म्हटले आहे. कोणत्या औषध कंपन्यांच्या दबावाखाली येऊन जागतिक आरोग्य संघटनेला अचानकच हा साक्षात्कार झाला म्हणायचे? हे औषध का वापरायचे नाही याची कारणे सांगण्याची हिंमत ही जागतिक संघटना का दाखवत नाही?
महाराष्ट्रपुरते बोलायचे तर सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.संजय ओक यांनी रेमडेसिवीरसाठी दिल्लीपर्यंत प्रचंड प्रयत्न केले. कोरोनाच्या रुग्णांना हे औषध देण्याची शिफारस टास्क फोर्सने राज्य सरकारला केली होती. त्यामागे त्यांचा अभ्यास होता, दिवसरात्र खपून केलेली निरीक्षणे होती. आता तेच औषध थेट डब्ल्यूएचओने नाकारले आहे. यासंदर्भात डॉ. ओक यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी नाही तर टास्क फोर्सच्या सर्व सदस्यांचे तसेच रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे की, रेमडेसिवीर योग्य रुग्णाला, योग्य प्रमाणात व योग्यवेळी वापरले तर ते अत्यंत परिणामकारक आहे. यामुळे आजाराची तीव्रता कमी होते, आजाराचे दिवस कमी होतात. हे औषध कोरोनाच्या विषाणूला मारण्यासाठी उपयुक्त ठरते. विषाणू मेल्यानंतर त्याचे असंख्य कण रुग्णाच्या शरिरात रहातात, त्यामुळे दहाव्या दिवसानंतर दुसºया किंवा तिसºया आठवड्यात रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते. पण त्यामुळे अन्य कोणाला संसर्ग होईल किंवा ज्यांना कोरोना नाही त्यांच्यामध्ये तो पसरू शकेल असे होत नाही. हे औषध खूप आधी देणे किंवा नऊ दहा दिवसानंतर देणे हे मात्र अत्यंत अप्रस्तूत आहे.’ - असे डॉ. ओक सांगतात.
प्रत्यक्षात मात्र वाट्टेल त्या वेळेला हे औषध दिले गेले, हेही डॉ. ओक निदर्शनास आणून देतात. योग्य वेळी डोस न देणे, अपुऱ्या प्रमाणात देणे, चुकीचे आहे. एखाद्या जनरल प्रॅक्टिशनरचे देण्याचे किंवा होम क्वॉरण्टाइन असणाऱ्यांना देण्यासाठीचे हे औषध नाही. मात्र याचा विचार न करता हे दिले गेल्याने या औषधाची अप्रतिष्ठा झाल्याची खंतही डॉ. ओक यांनी व्यक्त केली आहे.
याचा अर्थ सरळ आहे की ही सगळी बड्या औषध कंपन्यांची लढाई आहे. ‘जिलाद सायन्सेस’ या कंपनीचे रेमडेसिवीर हे औषध उपयोगी नाही अशी बातमी सुरुवातीच्या काळातही पसरली तेव्हा याच रेमडेसिवीरची व जिलादची डब्ल्यूएचओने वकिली केली होती. पुढे त्यांनीच या औषधाला मान्यताही दिली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर आणीबाणीचे अधिकार वापरून जिलाद कंपनीच्या याच औषधाला परवानगी दिली होती.
मुळात हे औषध एबोलाची साथ आली तेव्हा बनवले गेले. ते तेव्हा फार चालले नाही; पण आता ते कोरोनावर उपयोगी ठरत असताना ज्याची वकिली सुरुवातीच्या काळात डब्ल्यूएचओने केली तेच आता पुन्हा या औषधाला बाद ठरवत आहेत. असे का केले याची कारणे सांगण्याची जबाबदारी कंपनीची आणि डब्ल्यूएचओची आहे. याच जिलाद कंपनीने बर्ड फ्ल्यूची साथ आल्यावर टॅमी फ्ल्यू औषध उपलब्ध केले होते. जे जगभरात विकले गेले. २००५ साली टॅमी फ्ल्यूच्या एक कोटी गोळ्या भारताने विकत घेतल्या होत्या.
आता रेमडेसिवीर भारतात उपयोगी ठरत आहे, भारताची रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे हे लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याच्या विरोधात रान पेटवले जात आहे ते अत्यंत धोकादायक आणि मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्या प्रकारातले आहे.
कोरोनाची साथ अजूनही गंभीर रूप धारण करून आहे. आज डब्ल्यूएचओपासून कोणालाही या संसर्गावर प्रभावी औषध मिळालेले नाही. लस यायला आणि ती सर्वांपर्यंत पोहोचायला अजून काही वर्षे लागतील. तोपर्यंत अंतर राखून रहाणे, मास्क वापरणे या शिवाय दुसरे काही हातात नाही. अशा परिस्थितीत रेमडेसिवीर हे अंधारात चाचपडणाऱ्यास काठीचा आधार देण्याचे, पाण्यात बुडणाºयास ओंडक्याचा आधार देण्याचे काम करत आहे. त्यामुळे त्याचा सन्मान केलाच पाहिजे, अशा शब्दात डॉ. ओक जेव्हा वर्णन करतात, त्यातच सगळे काही आले.
अर्थात, या औषधाच्या वापराचे निर्णय रुग्णांनी देखील डॉक्टरांवर सोडले पाहिजेत. भलता आग्रह आणि नको तेथे वशिलेबाजी करून रुग्णाचा जीव तर जाईलच; पण करोडोंचा बाजार मांडून बसलेल्या कंपन्यांचेच त्यात भले होईल यापलीकडे यात दुसरे काहीही नाही.