कशी सर्वेनं थट्टा मांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:44 AM2018-03-03T04:44:48+5:302018-03-03T04:44:48+5:30
छे. छे. छे. शक्यच नाही. कदापिही शक्य नाही. नोव्हेंबर २०१७चा कोणता तरी एक सर्वे येतो आणि म्हणतो की आमच्या महाराष्टÑापेक्षा आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचे विद्यार्थी सरस आहेत.
- सुमंत अयाचित
छे. छे. छे. शक्यच नाही. कदापिही शक्य नाही. नोव्हेंबर २०१७चा कोणता तरी एक सर्वे येतो आणि म्हणतो की आमच्या महाराष्टÑापेक्षा आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचे विद्यार्थी सरस आहेत. अहो, कसा विश्वास ठेवावा यावर? गोविंदाग्रजांनी मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्टÑ देशा या महाराष्टÑ गीतात पुढे काय म्हणून ठेवलं आहे, लक्षात आहे ना. भावभक्तीच्या आणिक बुद्धीच्या देशा, हे त्यांनी म्हटलेलं फार फार म्हणजे फारच महत्त्वाचं आहे. अहो, त्यांच्यासारख्या प्रतिभावान लेखक, कवीनं म्हटलं म्हणजे बरोबरच असणार. कारण या गीतात वर्णन केल्याप्रमाणे महाराष्टÑातील नागरिक कणखर आहेत, नाजूक आहेत, कोमल तर आहेतच आणि शिवाय बुद्धिवानही आहेत. असे असताना इथली भावी पिढी अभ्यासात मागे राहीलच कशी?
तिसरी, पाचवी व आठवीतील गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासून महाराष्टÑ अभ्यासात पिछाडीवर गेला, असा धक्कादायक निष्कर्ष काढण्याचं धारिष्ट्य झालं तरी कसं या सर्वेकारांचं. महाराष्टÑ म्हणजे काय साधा-सुधा आहे का? संपूर्ण देशात वेगवेगळ्या क्षेत्रात नंबर एकवर असलेला हा प्रदेश आहे आणि तो अभ्यासात असा कसा पिछाडीवर जाईल? गणितात आमचे चिल्ले-पिल्ले मागे कसे राहतील? गणित त्यांच्या किती आवडीचा विषय आहे, हे तर आपल्याला माहीत आहेच. त्यांचे पालक ज्याकाळी दहावीला असायचे त्यावेळी गणित-इंग्रजीला माय-बाप विषय म्हणायचे. तेव्हा एखाद्याने दहावीत गोची खाल्ली तर त्याला सर्रास विचारले जायचे की, माय-बापाने दगा दिला का? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे उत्तर होकारार्थी देण्यात त्यालाही काही गैर वाटायचे नाही. आता त्यांची पोरे झाली म्हणून काय ती तशीच राहणार आहेत? आडातच नाही तर पोहºयात कुठून येणार, असेही कुणी कुत्सितपणे म्हणतील. पण सांप्रत काळी किती बदल झाला, तो तरी लक्षात घ्या. मोबाईल, कॅलक्युलेटर, कॉम्प्युटर यामुळे गणित, आकडेमोड करणं कितीतरी सोप्पं झालं. त्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असल्या क्षुल्लक गोष्टींत आपली पोरं वेळ वाया घालवत नाहीत. तीच गत इंग्रजीची. हे वाघिणीचे दूध तर आम्ही एवढे पचवून आहोत की मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरतो की इंग्रजी बोलताना मधे-मधे मराठी तोंडी लावतो, तेच कळत नाही. पण ते महत्त्वाचं नाही.
आमच्या पोरांचं सामाजिक शास्त्रही कच्चं कसं राहील हो? हा प्रदेश म्हणजे सामाजिक घुसळणीचं मोठं केंद्र पूर्वी होतं, आजही आहे आणि भविष्यातही राहील. त्यात आमच्या शिक्षण संस्थांच्या टोलेजंग इमारती तर पाहा. त्यात शिकणारी मुलं एवढी कच्ची कशी राहतील? एवढे लाखो रुपये फी भरून आम्ही त्यांना तेथे पाठवतो, त्याशिवाय त्याच्यापेक्षा दुप्पट फी भरून ट्यूशन लावतो. तरीही पोरं कच्चीच? याही पलीकडे विचार करण्याची गोष्ट म्हणजे आमचे विद्यार्थी, शिक्षकांना काय कमी कामं आहेत का? सतराशे साठ निवडणुका, पायलीचे पन्नास सर्वे, जनगणना, योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षकांचं. त्यातून त्यांना वेळ मिळाला तर विद्यार्थ्यांना मोबाईल, टीव्ही, क्रिकेट यातून सवड कुठंय. एवढ्या व्यापातून ते अभ्यास करणार कसा? तेव्हा या सर्वेतच गडबड असणार. आमचे पोरं मात्र हुश्शारच. नक्कीच.