अरविंद केजरीवाल यांचे हे ‘असे’ कसे झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:10 AM2022-03-04T08:10:31+5:302022-03-04T08:12:26+5:30

ते आधी म्हणाले, मला पदाचा मोह नाही! ... मग मुख्यमंत्री झाले! लोकप्रतिनिधीने साध्या घरात राहावे, असा त्यांचा आग्रह होता. हल्ली त्यांना दोन बंगले पुरत नाहीत!

How did this happen to Arvind Kejriwal? | अरविंद केजरीवाल यांचे हे ‘असे’ कसे झाले?

अरविंद केजरीवाल यांचे हे ‘असे’ कसे झाले?

googlenewsNext

- कपिल सिबल

पंजाब निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्रीपदाची दुसरी कारकीर्द संपत आली असताना अमरिंदर सिंग यांनी काॅंग्रेस पक्षाची साथ सोडून भाजपशी हातमिळवणी केली. आजचे राजकारण हा विचारसरणीला कोणतेही स्थान नसलेला धंदा झाला आहे, दुसरे काय?

अमरिंदर भाजपकडे जाताच त्या पक्षाने त्यांचे स्वागतच केले. अमरिंदर यांच्या पैशातून भाजप आघाडी चालवेल, अधिक जागा लढवेल, हे उघडच होते. अकाली दूर गेले नसते तर भाजपने हे कधीही केले नसते. दुसरीकडे अकाली दल बसपाला बरोबर घेऊन अनुसूचित जातींची मते मिळविण्याच्या मागे लागले... आणि सर्वात शेवटी ‘आप’चे अरविंद केजरीवाल! त्यांच्याकडे पंजाबात गमवावे असे काहीच नाही!

केजरीवाल यांची एकूणच वर्तन-शैली हा भारतीय राजकारणातील अनैतिकतेचा नजारा आहे. आपण सत्तेचे भुकेले नाही, प्रामाणिक सरकार देऊ, भ्रष्टाचार संपविण्याची शपथ आपण घेतली आहे, असे सांगत केजरीवाल पंजाबभर फिरले. ऑगस्ट २०११ ते ऑगस्ट २०१२ या कालखंडात हेच केजरीवाल ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ अभियानात आघाडीवर होते. अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना स्वत:चा पाया रचायचा होता. आपण लोकांचे राजकारण करायला आलो आहोत, असे ते सांगत आले. आयुष्यात कधीही निवडणूक लढवणार नाही, कोणतेही पद घेणार नाही, आपल्याला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, असे ते पूर्वी सांगत. तरीही  नोव्हेंबर २०१२मध्ये त्यांनी ‘आप’ची स्थापना केली. पाठोपाठ निवडणूक लढवून मुख्यमंत्री झाले. यातूनच केजरीवाल, त्यांचे राजकारण खरे कसे आहे ते कळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध त्यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्यावर २०१५मध्ये त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आणि ते लागोपाठ दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. खरंतर केजरीवाल यांच्यासाठी भ्रष्टाचार हा विषय आता मागे पडला आहे. तसे होणे स्वाभाविक होते, कारण ‘आप’च्या ६२पैकी ३८ आमदारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत. आपचे ७३ टक्के आमदार करोडपती आहेत. अन्य राजकीय पक्षांवर त्यांनी पुराव्यांशिवाय आरोप केले आणि दावे दाखल होण्याच्या भीतीने नंतर माफी मागितली.

२०१३च्या डिसेंबर महिन्यात केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून आपली सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची विनंती केली. ‘परमेश्वर मला सांभाळेल’, असे सांगितले. २०१८ साली सत्तेवर येताच बहुधा त्यांचा देवावर विश्वास राहिला नसावा. कारण मुख्यमंत्र्याला सुरक्षा देण्यात केंद्र कुचराई करत आहे, असा ठपका ठेवणारा ठराव त्यांनी विधानसभेत संमत करून घेतला. हा दुतोंडीपणा नव्हे तर काय?

अलीकडेच पंजाबात केजरीवाल म्हणाले, ‘आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्याकडे पैसे नाहीत. मान अत्यंत प्रामाणिक आहेत. माणूस आमदार झाला की, त्याच्याकडे मोठ्या गाड्या, बंगले दिसू लागतात. मान सात वर्ष खासदार आहेत पण भाड्याच्या घरात राहतात.’

२०१३ साली विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल म्हणाले होते, ‘आप हा पक्ष व्हीआयपी संस्कृतीच्या विरोधात असून, मी मुख्यमंत्री झालो तर साध्या घरात राहीन,  सरकारी गाडी वापरणार नाही. लोकप्रतिनिधींनी प्रशस्त बंगल्याऐवजी वन बेडरूम सदनिकेत राहिले पाहिजे. सुरक्षा कवच त्यांनी घेऊच नये.’ 

याच केजरीवाल यांनी शपथ घेतल्यावर दोनच दिवसात  शेजारी-शेजारी असलेले पाच खोल्यांचे दोन बंगले मागितले. सध्या केजरीवाल सिव्हिल लाईन्समधल्या सरकारी बंगल्यात राहतात आणि बंगल्याच्या नूतनीकरणासाठी ८.६१ कोटी रुपयांची निविदा नुकतीच काढण्यात आली आहे. आणि हेच केजरीवाल पंजाबातल्या मतदारांना ‘हे फुकट, ते फुकट’ असे सांगत सुटले आहेत... अर्थात त्यांच्या पक्षाचे सरकार आले तर!

या देशातल्या राजकारणाबद्दल बोलावे तेवढे थोडे आहे. आपले नेते भूतकाळात रमतात आणि दुतोंडी बोलतात. जे बोलतात ते त्यांना कधीच अभिप्रेत  नसते. आघाड्या बदलणे, विचारप्रणालीच नसणे, निव्वळ संधीसाधूपणा आणि जातींचे राजकारण असाच सगळा मामला चालतो. सामान्य लोकांशी त्यांना देणे-घेणे उरलेले नाही!
 

Web Title: How did this happen to Arvind Kejriwal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.