निवडणुकीतून महत्त्वाचे विषय गायब कसे होतात?

By सुधीर महाजन | Published: April 13, 2019 04:57 PM2019-04-13T16:57:10+5:302019-04-13T16:58:32+5:30

अजून निवडणुकीचे वातावरण तापायचे आहे. दुष्काळात ते किती तापते हे पाहायचे.

How do the important topics disappear from the elections? | निवडणुकीतून महत्त्वाचे विषय गायब कसे होतात?

निवडणुकीतून महत्त्वाचे विषय गायब कसे होतात?

googlenewsNext

- सुधीर महाजन

उभ्या-आडव्या भारतात प्रचाराचा उडालेला गदारोळ, छप्परफाड आश्वासनांची खैरात आणि आरोप-प्रत्यारोपांची धुळवड ती इतकी की, तेथे तारतम्य, स्त्री दाक्षिण्य आदी ‘संस्कार’ गुंडाळून ठेवलेले. ज्याला मोहित करण्यासाठी या सगळ्या मोहिनी अस्त्रांचा वापर चालू असताना तो सामान्य भारतीय नागरिक म्हणजे औट घटकेचा ‘मतदारराजा’ नेमका यावर काय विचार करतो, हे धुंडाळण्यासाठी जालना जिल्ह्याची वाट धरली. जालना यासाठी की, दुष्काळाची सर्वात जास्त झळ औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्येच जाणवते. गेल्या चार वर्षांपासून वर्षागणिक पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने यावर्षीची ‘बखाडी’ (हो दुष्काळाचा हा खास मराठवाडी शब्द) जरा कठीणच आहे.

सगळे शिवार वैराण. नजर पोहोचेल तेथपर्यंत कुठेही हिरवे ठिगळ दिसत नाही. तापलेले ऊन, वैराण माळराण आणि वातावरणात एक प्रकारचा उदासपणा. हे उदासवाणेपण अख्ख्या गावावर उतरलेले. पारांवर, मंदिरांमध्ये शून्याकडे पाहत बसलेली मंडळी ना गप्पा रंगतात, ना काही करावेसे वाटते. रस्त्याच्या कडेला गाडी लावून ढवळेश्वराच्या शिवारात रणरणत्या उन्हात ढेकळे तुडवीत किलोमीटरभर अंतर तुडवून आले भानुदास तिडकेंचे शेत. एकरभर डाळिंब आणि एकरभर द्राक्षाची बाग. लिंबाच्या गार सावलीत थांबलो, तर भानुदासभाऊ मोटारसायकलवर आले. न थांबताच म्हणाले, ‘तेवढं पाण्याचं पाहतो, थांबा थोडं.’ सावलीत काही मजूर विसाव्याला बसलेले. त्यांच्याही डोळ्यात आश्चर्य, हे कोण लोक़ थोड्या वेळात भानुदासभाऊ येताच ओळखपाळख झाली. हवा-पाण्याच्या गप्पा करीत गाडी निवडणुकीवर येऊन पोहोचली. बाबासाहेब तिडके म्हणाले, ‘गेल्यावर्षीच्या गारपिटीचे ५८ हजार अजून मिळाले नाहीत; पण मोदींनी २ हजार खात्यात जमा केले. निवडणुकीच्या तोंडावर तांब्या-तांब्या पाणी टाकून बाग वाचवली; पण द्राक्षाला भाव नाही. तिसरे वर्ष तोट्यात गेले. कसली कर्जमाफी न् काय. सगळे नुसता तमाशा करतात. काहीही पिकवा. भाव पडलेलेच. शेती म्हणजे घाट्याचा धंदा. निवडणुका त्यांच्यासाठी. आपले कष्ट कुठे संपतात. 

कैलास हा तरुण पोरगा टॅक्ट्रर उभा करून आला. निवडणूक म्हणताच ‘पाकिस्तानला घरात घुसून हाणले एकदम बेस केलं!’ ही त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया. ‘असा धडा शिकवायलाच पाहिजे होता.’ पुढे रस्त्याने पीरपिंपळगावजवळ रसवंती चालविणारा रामेश्वर कोल्हे गप्पा मारत बसला. निवडणुका आल्या की, रस्त्याची कामे सुरू करतात. एरवी रस्ते खड्ड्यात. त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सगळा देखावा; पण मोदी सरकारने पाकिस्तानवर बदला घेतला. हे काम चांगले केले! काँग्रेस, राहुल गांधी यांची चर्चा निघाली. काँग्रेसही चांगला पक्ष आहे; पण आता भावना राहिली नाही! असे बोलत त्याने विषय बदलला. तो शेतमालाच्या भावावर; पण बेरोजगारी, दुष्काळ हे विषय त्याच्या गावीही नव्हते.

असलम बेगला तर सर्वांना घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष असावा, असे वाटते. या सरकारने भेदभाव वाढवला. सत्तेवर येईपर्यंत आश्वासन देतात आणि नंतर विसरून जातात. पाच वर्षांपूर्वीची सगळीच आश्वासने लोकांना आठवतात. १५ लाख खात्यात हे सगळ्यांच्या लक्षात आहे. समाजाची स्मृती अल्पकालीन असते; पण हे पंधरा लाखांचे आश्वासन सर्वांनाच लक्षात आहे. रसवंतीवर हळूहळू लोक गोळा व्हायला लागले. कल्याण पाटील हा शेतकरी, काँग्रसने नेहमी गरिबांचा विचार केला. भाजपची पाच वर्षे पोपटपंची चालू होती. प्रत्यक्षात काहीच केले नाही; पण काही न करता, नुसता गाजावाजा केला की, लोकांना भुरळ पडते, असे जनतेचे झाले आहे.

ग्रामीण भागातील चर्चा यापलीकडे जात नव्हती. दुष्काळ, बेरोजगारी शेतमालाचे भाव, हे प्रश्न पुलवामापेक्षा कमी महत्त्वाचे वाटत होते. या प्रश्नावर कोणी फारसे हिरीरीने बोलताना दिसत नव्हते. एव्हाना ऊन कलले होते, म्हणून जालना शहराकडे मोर्चा वळवला. जालना ही व्यापारीपेठ-उद्योगनगरी. गेल्या काही वर्षांपासून भाजपची सत्ता असलेला जिल्हा. महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाकडे गेल्या ४०-४५ वर्षांपासून चिकित्सक नजरेने पाहणारे प्रा. बी.वाय. कुलकर्णी यांची भेट घेतली. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आणि राजकीय अभ्यासक. निवडणुकीचा प्रचार भलत्याच दिशेने फिरतो ही त्यांची चिंता. ‘नॉन इश्यू’ हे इश्यू होतात, म्हणजे दुष्काळ, पाणी, बेरोजगारी, महाग होत जाणारे शिक्षण, औद्योगिक उत्पादनात होणारी घट, अर्थव्यवस्थेची स्थिती, परराष्ट्रसंबंध, हे महत्त्वाचे विषय निवडणुकीतून गायब कसे होऊ शकतात, ही सरांची चिंता. या विषयावर सत्ताधारी अजिबात बोलत नाहीत. चौकीदाराचा विषय निघतो. ‘चौकीदार’ हा श्रीमंताचे रक्षण करणार असतो. हे आपण विसरलो. गरिबांना चौकीदाराची कधी गरज पडत नाही. असे असतानाही ‘चौकीदार’ हा निवडणुकीचा राष्ट्रीय विषय ठरतो, हे आश्चर्यच आहे. या देशाचे परराष्ट्र धोरण, रोजगारवाढीचा कार्यक्रम, संरक्षण या विषयांऐवजी जात-पात धर्माचे राजकारण वरचढ ठरते आहे.

काँग्रेसने जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचा मुद्दा मांडून मोठी चूक केली आहे. जाहीरनामा तयार करण्यासाठी बुद्धिवंत, अनुभवी मंडळी असताना, असे वादग्रस्त आश्वासन कसे दिले जाते, याचेच त्यांना आश्चर्य वाटत होते. निवडणुकांमुळे समाजात दुही निर्माण होते. सामाजिक स्वास्थ्य बिघडते, याचे भान कोणी ठेवत नाही. गेल्या पंचवीस वर्षांच्या राजकारणाने या पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक वीण उधडून टाकली गेली, हे पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांना कसे कळले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीची चर्चा दिवसभर चालली; पण ती मी सुरू ठेवली म्हणून; परंतु प्रत्यक्षात ग्रामीण किंवा शहरी भागात कुठेही निवडणुकीचे वातावरण नव्हते. चर्चेचे फड रंगताना दिसत नव्हते. दोन-दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री येऊन गेले; पण त्याचीही चर्चा नव्हती. अजून वातावरण तापायचे आहे. दुष्काळात ते किती तापते हे पाहायचे.

Web Title: How do the important topics disappear from the elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.