ही आपली बुद्धिमत्ता, की आपला मूर्खपणा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 10:07 AM2023-11-13T10:07:06+5:302023-11-13T10:07:18+5:30
कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्याच बुद्धिमत्तेची निर्मिती आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणारे आपण किती मूर्ख आहोत याची काळजी आपल्याला वाटायला नको?
- डॉ. एस. एस. मंठा
चॅट जीपीटीच्या काळात आपल्या बुद्धिमत्तेला खरोखर काही महत्त्व उरले आहे काय? आपण शिकतो कसे हे आता पुन्हा नव्याने ठरवण्याची वेळ आली आहे काय? या उसन्या बुद्धिमत्तेचे गुलाम किंवा स्वयंचलित यंत्रे तर आपण होणार नाही? कृत्रिम बुद्धिमत्ता एक दिवस आपल्यावर राज्य तर करणार नाही...? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत यात शंका नाही. परंतु, या प्रश्नांना समर्पक उत्तरे आहेत काय?
एजर डिक्स्ट्रा या डच शास्त्रज्ञाने एकदा म्हटले होते ‘संगणक विचार करील की नाही हा प्रश्न पाणबुडी तरंगेल की नाही या प्रश्नापेक्षा जास्त रोचक ठरेल.’ हे लक्षात घेता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्ता यांच्यात मुळात फरक आहे तो त्यामागचा हेतू, परिवर्तनीयता, सर्जनशीलता, भावनिक क्षमता, माहितीची प्रक्रिया आणि समजून घेण्याची पद्धत यातला. कृत्रिम बुद्धिमत्तेने लक्षणीय आगेकूच केली असली तरीही काही बाबतीत ती मागे पडते. विशेषत: संदर्भानुसार समजून घेणे, सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता यात मानवी बुद्धिमत्ता पुढे आहे.
मानवी असो वा कृत्रिम, बुद्धिमत्ता म्हणजे काय? आपली बुद्धिमत्ता बहुआयामी, त्याचबरोबर गुंतागुंतीचीही असते. बोधाची क्षमता, त्याचबरोबर प्रश्न सोडवणे, निर्णय घेणे, अनुभवातून शिकणे, नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे, भाषेचे आकलन या सगळ्या बाबतीत ज्ञानाचे उपयोजन, आकलन प्रक्रिया आणि संपादन या सगळ्यांची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्ध्यांक हा एक आकडा असतो. व्यक्तीची बोधनक्षमता इतरांच्या तुलनेत किती आहे, हे हा आकडा सांगतो आणि त्यावर गुणसूत्रे, परिवेश, शिक्षण, व्यक्तिगत अनुभव या गोष्टींचा प्रभाव पडतो.
आपण मानवी बुद्धिमत्ता मोजतो कशी? तर त्याच्या विविध पद्धती आहेत. उदाहरणार्थ बोधन, शैक्षणिक कामगिरी, मन आणि बुद्धीचे व्यापार, तसेच एकंदर कामगिरीवर आधारित हे मोजमाप होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे असे मापन करता येईल काय? होय, करता येईल; परंतु, त्यासाठी गुण आणि संख्यात्मक मूल्यमापन करावे लागेल. अचूकता, नेमकेपणा, वर्गवारी, प्रतिगमनात्मक काम, आशयधारणेचे प्रमाण, लागणारा वेळ, लक्षात राहणे या बाबींचा विचार त्यात होईल. नैतिक तसेच सामाजिक परिणाम लक्षात घेणे, खासगीपणाचा भंग होईल काय? पूर्वग्रह वाढीस लागतील काय? नोकऱ्या जातील किंवा कसे हेही मापनाचे महत्त्वाचे निकष आहेत. विशिष्ट हेतू आणि कामांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली गेली असली तरी बऱ्याचदा ती मर्यादित लक्ष्य समोर ठेवून वापरली जाते.
आकलनाच्या स्तरावर ती बरीच मानवी बुद्धिमत्तेला समांतर जाते. आपण ज्या सर्जनशीलतेने, लवचिकतेने पुष्कळ वेळा काम करतो तेवढ्या पातळीवर जाऊन कृत्रिम बुद्धिमत्ता काम करेल काय? यावर ठाम असे होकारार्थी उत्तर येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता काही प्रमाणात सर्जनशीलता दाखवील. माहितीचे विश्लेषण, नमुने ओळखणे अशा प्रकारे सर्जनशीलता वापरून प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत ती उपयोगी पडेल. कृत्रिम बुद्धिमत्तेत अल्गोरिदम्स वापरली जातात, संगीत रचना इतकेच नव्हे, तर काव्यनिर्मितीसाठीही तिचा वापर झाला आहे; परंतु अशी निर्मिती ही केवळ अस्तित्वात असलेली उदाहरणे आणि माहिती याच्या आधारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची निष्पत्ती असते. त्यात स्वतंत्र, मूलगामी असा विचार नसतो. येथे मानवी बुद्धिमत्तेचे महत्त्व लक्षात येईल.
कृत्रिम बुद्धिमत्ता खूप मोठ्या प्रमाणावर माहितीचे विश्लेषण अगदी झटपट करू शकेल. परंतु, तेवढेच ती करील. जसा मानवी बुद्धिमत्तेचा गैरवापर करता येऊ शकतो, तसाच कृत्रिम बुद्धिमत्तेचाही करता येईल. मात्र, त्यात नुकसान पोहोचवण्याची क्षमता पुष्कळ जास्त असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेने खोटी परीक्षणे करवून घेता येतील. सार्वजनिक संवादात कारस्थाने रचून चुकीची माहिती पसरविली जाईल. स्वयंचलित शस्त्रांमध्ये तसेच ड्रोन्समध्ये ही बुद्धिमत्ता वापरून हाहाकार माजवता येईल. त्यातील विरोधाभासाची गोष्ट ही की कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्याच बुद्धिमत्तेची निर्मिती आहे. आपली बुद्धिमत्ता बाजूला ठेवा; कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करणारे आपण किती मूर्ख आहोत याची काळजी आपल्याला वाटायला नको?