वृक्षवल्ली आम्हा सोयरे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:41 PM2019-06-21T13:41:39+5:302019-06-21T13:46:47+5:30
मिलिंद कुलकर्णी जागतिक पर्यावरण दिन साजरा करीत असताना आम्ही सगळ्यांनी जल, वायू प्रदुषणाची यंदा चर्चा केली. वृक्षारोपण करताना संवर्धनाचा ...
मिलिंद कुलकर्णी
जागतिक पर्यावरण दिन साजरा करीत असताना आम्ही सगळ्यांनी जल, वायू प्रदुषणाची यंदा चर्चा केली. वृक्षारोपण करताना संवर्धनाचा संकल्प सोडला. एका वृक्षाभोवती पाच-पंचवीस माणसे उभे राहून छायाचित्रे काढली गेली. सेल्फी काढली गेली. समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमांवर ती प्रसारीत झाली. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सार्वजनिक स्थळे अशा ठिकाणी वृक्षारोपणाचे सोहळे साजरे झाले. आकडेवारी नोंदवली गेली. फोटोंसह ‘वर’पाठविली गेली. आमची इतिकर्तव्यता संपली. प्रामाणिकपणे आपण स्वत:ला विचारुन बघूया, की या १५ दिवसात आपण लावलेल्या रोपाकडे आपण फिरकलो तरी का? किती दिवस आपण त्या रोपाला पाणी घातलं? पाणी घालणं शक्य नसलं तरी त्याला पाणी दिलं जातंय की नाही, हे आम्ही बघितले का? बहुसंख्य मंडळींचं उत्तर हे नाही, असेच येणार.
गंमत बघा, हे चित्र आपल्याला सर्वत्र दिसून येईल. कार्यालय, बाजारपेठ याठिकाणी एखाद्या मोठ्या कडूनिंब, वड, पिंपळ या झाडाच्या सावलीखाली बहुसंख्य वाहने लावलेली आढळून येतात. सावलीच्या आकारानुसार वाहने कोंबून लावली जातात. वाहनांच्या काळजीसाठी हे होत नाही, तर आपल्याला चटका बसू नये म्हणून सावलीत वाहने लावली जातात. अशी सावली देणारी झाडे किती आहेत, याचा विचार कधी केला का आम्ही? ज्याने कुणी हे झाड लावले असेल, जगवले असेल त्याचे नावसुध्दा आपल्याला ठाऊक नसेल. पण त्या सावलीचा लाभ आम्ही जन्मसिध्द अधिकार असल्याप्रमाणे घेत आहोत. प्रसंगी भांडत असतो दुसऱ्या वाहनधारकाशी. तुझे झाड आहे का? मालकी तुझी आहे का? अशी विचारणा करीत असतो. पुढच्या पिढ्यांसाठी आम्ही काय वारसा ठेवणार आहोत, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
काहींना पर्यावरणाची खरंच तळमळ, कळकळ असते. प्रयत्नपूर्वक ती झाडे लावतदेखील असतात. त्यासाठी पदरमोड करीत असतात. पण त्यांना असंख्य अडचणी, समस्यांना तोंड द्यावे लागते. सावली आम्हाला हवी असते, पण झाड आपल्या अंगणात नको. दाराशेजारी तर नकोच नको. त्यासाठी कारणांची मोठी जंत्री सादर केली झाले. झाड मोठे झाले की, मुळे आमच्या भिंतीला तडा पाडतील, जमिनीखालची टाकी फोडेल, अंगणातील फरशा उचकवेल, वर्षातून दोनदा पानगळती होईल, तर ती गळलेली पाने आवरण्याचा त्रास होईल, पक्षी येऊन बसतील आणि घाण करतील. एक ना अनेक कारणे सांगितली जातात. त्यात आपल्या प्रशासकीय यंत्रणेच्या कारभाराचा फटकादेखील वृक्षारोपण मोहिमेला बसत असतो. वृक्षारोपण करा, असे आवाहन तर केले जाते पण ते कुठे करायचे? संवर्धनातील अडचणींवर मार्ग कुणी काढायचा. ६ आणि ९ मीटरच्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावली तर गटारी उघड्या असल्याने मुळे जाऊन गटारी तुटतात आणि पाणी शेजारी प्लॉटमध्ये वा रस्त्यावर येते. म्हणून घरमालक आधी झाड लावायला अनुत्सुक असतो, आणि शक्य असेल तेव्हा मोठ्या झाड्यावर कुºहाड चालवितो. झाड मोठे झाडे की, वीज महामंडळांची माणसे फांद्या छाटून दरवर्षी त्याला बोडके करुन टाकतात. चारचाकीसाठी घरासमोर जागा हवी म्हणून झाड छाटले जाते. रस्ता रुंदीकरणात तर हमखास झाडाचा बळी जातो. खुल्या जागांमध्ये वृक्षारोपण होते, झाडे लावली जातात आणि नंतर या जागेत बांधकाम करताना त्याच झाडांवर कुºहाड चालवली जाते. भूमिगत गटारी, वीज आणि दूरध्वनी वाहिनीची व्यवस्था का होऊ शकत नाही, याचा विचार प्रशासकीय यंत्रणेने करायला हवा.
समाज आणि प्रशासकीय यंत्रणेद्वारे होणारे वृक्षारोपण आणि नैसर्गिक परागीकरणाने होणारे वृक्षारोपण यात फार काही अंतर असेल असे वाटत नाही. आम्ही दिखावा करतो, निसर्ग नित्यनेमाने त्याचे काम करीत असतो. तरीही आम्ही वृक्षवल्लींना ‘सोयरे’ म्हणत असू तर हा कृतघ्नपणा नाही का? एखाद्यावेळी ती वृक्षहल्ली आमचे ‘सोयरेपण’ नाकारेल, आणि तो दिवस फार दूर नसेल, हे लक्षात घ्यायला हवे.