पालथ्या घड्यावर पाणी कसे पडते?

By किरण अग्रवाल | Published: October 30, 2022 11:41 AM2022-10-30T11:41:08+5:302022-10-30T11:41:44+5:30

Social Problem : मातेलाच म्हातारपणी वाऱ्यावर सोडण्याची अमानवीयता निपजतेच कशी?

How does water fall on the pot? | पालथ्या घड्यावर पाणी कसे पडते?

पालथ्या घड्यावर पाणी कसे पडते?

googlenewsNext

- किरण अग्रवाल 

दीपोत्सवाचे दीप उजळत आनंद, मांगल्याचे वातावरण सर्वत्र ओसंडत असताना मातेलाच म्हातारपणी रस्त्यावर सोडून देण्याचा निर्दयी प्रकार घडून आला. भलेही आर्थिक विपन्नावस्थेतून हा प्रकार घडला असेल, पण त्यातून कमजोर पडलेल्या संवेदनांची भयावहता उघड होऊन गेली म्हणायचे.

 

एकीकडे दिवाळीत वंचितांच्या वस्तीवर जाऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न दिसून येत असताना, दुसरीकडे याचदरम्यान प्रकृती बरी नसलेल्या वयोवृद्ध मातेला रस्त्यावर बेवारस सोडून देण्याची मानसिकताही समोर येते तेव्हा बोथट होत चाललेल्या संवेदना व अमानवीयतेचा क्रूर चेहरा अस्वस्थ करून गेल्याखेरीज राहत नाही.

 

कोरोनाचे भय ओसरत असले तरी लम्पीने जनावरे दगावत आहेत. हाताशी आलेली पिके परतीच्या पावसाने जमीनदोस्त केल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आहे, तरी संकटावर मात करून व जगण्याची नवी उमेद घेऊन दिवाळीच्या दीपोत्सवाने यंदा सारे आकाश उजळून निघाले. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक जाणिवा अधिक गहिऱ्या होताना दिसत आहेत. आदिवासी, वंचित, शोषित वर्गातील मुलांचीही दिवाळी आनंदमयी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्था व व्यक्तींमध्ये प्रतिवर्षी भरच पडत आहे, हे अधिक आनंददायी आहे. यंदाही अनेकांनी हे सामाजिक भान जपले. परपीडेबद्दलचा कळवळा यातून दिसून आला; पण एकीकडे हे होत असतानाच दुसरीकडे काही घटना मात्र अशा घडून येतात की मनावर ओरखडा उमटून जाणे स्वाभाविक ठरते.

 

आपण सारे दिवाळी साजरी करत असताना पातूर तालुक्यातील एका रस्त्यावर ७२ वर्षीय वयोवृद्ध महिलेस आजारी अवस्थेत बेवारस सोडून देण्यात आल्याची घटना समोर आली. ज्या मातेने आपल्या लेकरांसाठी काबाडकष्ट केले, आयुष्य झिजविले; तिच्याच वाट्याला उतारवयात हे भोग यावेत हे वेदनादायी आहे. मातेचे ते हृदय आहे, त्यामुळे अधिक बोलत नसले तरी तिच्या जगण्यातील कारुण्य भळभळून वाहत असल्याचे स्पष्ट व्हावे. वृद्धांच्या सांभाळ, संगोपनासाठी कायदे आहेत; पण लोकलज्जेतून व समाजाची भीती बाळगत त्या कायद्यांचा कोणी आधार घेत नाही म्हणून काहीजण असेही निपजतात जे नात्यांना नख लावतात. अशांची मानसिकता कशी बदलावी हाच समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांपुढील व कायद्यापुढील प्रश्न आहे.

 

मागे अकोल्यातच माजी नगरसेविका राहिलेल्या एका वृद्ध महिलेला मुले व सुना सांभाळत नाहीत म्हणून पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली होती. बाळापूरमध्येही एका वृद्ध भगिनीला तहसीलदारांकडे तक्रार नोंदविण्याची व खावटी मिळवून घेण्याची वेळ आली होती, तर माना पोलीस स्टेशन हद्दीत मुलाच्या दुर्दैवी निधनाचे दुःख सहन करून जगणाऱ्या मातेला सुनेने घराबाहेर हाकलून दिल्याचे प्रकरण घडले होते. अर्थात, या झाल्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेल्या घटना; परंतु घरात राहून अवहेलना सहन कराव्या लागणाऱ्या वृद्धांचे प्रमाण कमी नाही. बोलताही येत नाही व सहनही होत नाही, असे हे दुःख आहे; पण इलाज नाही म्हणून सारे सहन करून आयुष्य ओढले जाते. जगण्याचे असे ओढणे झाले की त्यात 'राम' उरत नाही, आणि त्यातून आणखी वेगळ्या घटना घडून येतात.

 

मुद्दा असा की, आपण लाख सोशल झालो, शिकलो- सावरलो; मोठी प्रगती झाली, पण मानसिकता का बदलली नाही? अलीकडे अध्यात्माकडे अनेकांचा ओढा वाढलेला दिसतो. मंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. कथाकार, प्रवचनकारांचे मंडप गर्दीने ओसंडून वाहताना दिसतात. नाही म्हटले तरी त्यातून संस्कारांचे, माणुसकीचे उपदेश घडून येतात. तरी पालथ्या घड्यावर पाणी पडण्यासारखी स्थिती का बघावयास मिळते? जन्मदेत्या मातेलाच वाऱ्यावर सोडण्यासारखी किंवा पोटच्या मुलीला नकोशी म्हणून कचराकुंडीत टाकून देण्यासारखी अमानवीयता, निर्दयता येते कुठून? दारिद्र्य हे अशा अनेक गोष्टीमागचे कारण ठरते हेही खरेच; पण म्हणून रक्ताच्या नात्याचीच कसोटी लागावी? तसे नसेल तर समाजाचे व कायद्याचेही भय उरले नाही म्हणून हे असे होते का? याचा यानिमित्ताने विचार करण्याची वेळ आली आहे.

 

सारांशात, वृद्ध मातेला बेवारसपणे सोडून देण्याच्या पातूरमधील घटनेतून पराकोटीला गेलेल्या संवेदनाहीनतेचा मुद्दा समोर येऊन गेला आहे. समाजजीवनातील ही भेसुरता दूर करायची तर मानवतेसोबतच संवेदनांचेही दीप उजळण्याची गरज आहे.

Web Title: How does water fall on the pot?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.