आजचा अग्रलेख - पैल थडी कसी पावे सहजे !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 12:47 AM2021-05-04T00:47:20+5:302021-05-04T00:47:40+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रसारमाध्यमांनी आपल्या व्यवस्थेचे जाहीर वाभाडे काढले, याचा परिणाम आमच्या महासत्तेकडे वाटचाल करणारा देश या प्रतिमेवर झाला
निवडणुकांचा राष्ट्रीय शिमगा संपला; परंतु देशभर पेटलेल्या सरणांची होळी विझण्याची चिन्हे नाहीत. गेला महिनाभर देशभरात कोरोनाने हाहाकार उडविला, बेवारस कुत्र्यासारखी माणसं मेली. ऑक्सिजनसाठी जीव गेले. रुग्णांच्या आप्तस्वकीयांचे प्राण कंठाशी आले तरी निवडणुकांच्या या उन्मादात देशभरातील हा विलाप सरकारच्या कानावर गेला नाही, कारण ‘दी ओ दी’च्या कर्णकर्कश आरोळ्यांमुळे सरकारचे कान बधिर झाले होते. शेवटी न्यायसंस्थेला याबद्दल यंत्रणेला सज्जड दम देणारे इंजेक्शन टोचावे लागले; परंतु तोपर्यंत देशभरातील स्मशानं धडाडून पेटली होती. परिस्थिती हाताबाहेर गेली होती, सामान्य माणूस आणि यंत्रणा हे दोघेही हतबल झाले होते. या अवस्थेतून आजही हे दोघे सावरलेले नाहीत. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. जगात कोरोनाचे सर्वांत जास्त रुग्ण भारतात आहेत. लसीची टंचाई, औषधी आणि प्राणवायू यांचीही टंचाई, अपुरी वैद्यकीय व्यवस्था, मनुष्यबळ अशी सगळीकडूनच कोंडी झालेली आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढते आहे. एका अर्थाने देशात आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती आहे. दुसरीकडे स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे परिस्थितीचा सामना कसा करावा याचे नियोजन नाही. पहिली लाट भारताने थोपविली ही फुशारकीसुद्धा फोल ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरांवरील प्रसारमाध्यमांनी आपल्या व्यवस्थेचे जाहीर वाभाडे काढले, याचा परिणाम आमच्या महासत्तेकडे वाटचाल करणारा देश या प्रतिमेवर झाला आणि आपली रवानगी पुन्हा एकदा विकसनशील देशांच्या रांगेत झाली. निवडणूक हा साऱ्या भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. या एकाच राष्ट्रीय कार्यक्रमात भारतीय माणूस अगदी मनापासून सहभागी झालेला असतो. भलेही त्याचा त्या राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नसला तरी मतप्रदर्शन, वादविवाद यात तो हिरिरीने भाग घेताना दिसतो. आत्ता परवाच्या पाचही राज्यांतील झालेल्या निवडणुकांशी इतर राज्यांतील लोकांचा थेट संबंध नव्हता. तरीही देशभर हा निवडणूक ज्वर पसरला होता. आपण इतके ढोंगी की, कोरोनाचे संकट समोर ढळढळीत दिसत असताना सर्वांनीच डोळ्यांवर कातडे ओढून घेतले होते. निवडणुकांच्या हव्यासापोटी आपण काणाडोळा केला, त्याची जबर किंमत आता रोज मोजत आहोत. त्यावेळी एकाही पक्षाने अशा परिस्थितीत निवडणुका घेऊ नका हा आग्रह धरला नाही. कुंभमेळ्याला आक्षेप घेतला नाही. हे झाले राष्ट्रीय स्तरावरील चित्र. खाली जिल्हा आणि तालुका पातळीवरही तेथील नेते लॉकडाऊनला विरोध करीत होते, तर विरोधकांनी मोर्चे काढण्याची तयारी केली होती. परिस्थिती गंभीर बनल्यानंतर जनतेचे लॉकडाऊनसाठी मन वळवावे म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्याचे उदाहरण नाही. अशावेळी त्यांचे मन वळविणे, प्रबोधन करणे हे लोकप्रतिनिधींचे काम असते, याचा सोईस्कर विसर सर्वांनाच पडलेला आहे. आज संपूर्ण देश कडेलोटाच्या काठावर उभा आहे. हे संकट या देशाचे आहे. कोरोनाने केवळ आरोग्याचाच प्रश्न निर्माण केला नाही, तर परस्पर संबंधांचे ताणेबाणे सैल झाले आहेत. दीड वर्षांपासूनच्या भीतीमुळे समाज ही भावना विस्कळीत होऊन माणूस एकटा पडला. आर्थिक नुकसान ते वेगळेच.
रोजगार बुडाले, उद्योग, व्यापाराची पीछेहाट झाली आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुतला. त्याहीपेक्षा सर्वांचेच भावनिक नुकसान फार मोठे झाले. मुलांचे बालपण हरवले, तरुणांचे चैतन्य कोमेजले. याची किंमत भविष्यात मोजावी लागणार आहे. समाजातील सर्वच वयोगटांवर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून गंभीर परिणाम झाले असून, त्याचे दीर्घकालीन परिणाम समाजावर दिसून येतील. आता याची जबाबदारी फक्त सरकारवर टाकून चालणार नाही. त्यासाठी सर्वसामान्यांसहित सर्वांनीच पुढे आले पाहिजे. परकीय आक्रमणांचा मुकाबला करण्यासाठी आपण वेळोवेळी एक राष्ट्र म्हणून उभे राहिलो होतो. गतकाळात अशी उदाहरणे असली तरी आज तशा एकजुटीची गरज आहे. विचार, जाती, पंथ हे सर्व भेदाभेद विसरून एक भारतीय म्हणून आपल्याला उभे राहायचे आहे. सरकारने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन संकट व्यवस्थापन म्हणून सर्व राजकीय पक्षांना सामावून घेऊन एक यंत्रणा उभी केली पाहिजे. एक भारत म्हणून आपण जगाला संकटाचा सामना करताना दिसलो पाहिजे, तरच यातून आपण वर उठू शकू. संत तुकाराम सांगून गेलेत...
फोडुनि सांगाडी बांधली माजासि
पैल थडी कसी पावे सहजे.