ऐन पावसाळ्यात नालेसफाई होणार तरी कशी?
By admin | Published: June 5, 2017 03:37 AM2017-06-05T03:37:02+5:302017-06-05T03:37:02+5:30
पावसाचे स्वागत करण्यासाठी भिवंडी महानगरपालिका कधीच सज्ज झालेली दिसून येत नाही
पंढरीनाथ कुंभार
पावसाचे स्वागत करण्यासाठी भिवंडी महानगरपालिका कधीच सज्ज झालेली दिसून येत नाही. दरवर्षी पावसापूर्वीची कामे रखडल्याचे रडगाणे कमीअधिक प्रमाणात मनपात सुरू असते.
या वर्षी पावसाने मे महिन्याच्या अखेरीस हजेरी लावून झटका दिला. पहिल्याच पावसात शहराची दैना झाली. अलीकडेच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्याची धामधूम संपत असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने प्रशासनाला आम्ही निवडणुकीच्या रामरगाड्यात अडकलो असल्याने पावसाळी कामांची तयारी करायला वेळ मिळाला नाही, अशी सबब सांगण्याची संधी मिळाली. निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाने अत्यावश्यक नालेसफाईदेखील प्राधान्याने केली नाही. खरेतर, अशा नैमित्तिक कामाकरिता आचारसंहितेचा अडसर असत नाही. मात्र, भिवंडीतील सुस्त, बेशिस्त प्रशासन अशी कारणे नेहमीच शोधत असते. नालेसफाईसाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, निवडणूक निकाल लागल्यावर निविदा प्रक्रिया पार पाडून ही कामे करणे म्हणजे वरातीमागून घोडे घेऊन येण्यासारखे आहे.
नालेसफाईचा बोजवारा उडाला, त्याचे कारण असे की, निवडणुकीपूर्वी मागवलेल्या नालेसफाईच्या निविदेस ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने पुन्हा निविदा मागवण्यात आल्या. तोपर्यंत आचारसंहिता लागू झालेली असल्याने त्याची मंजुरी अडकली. परिणामी, ठेकेदारांना कार्यादेश देणे अशक्य झाले. आता कार्यादेश दिल्यानंतर ४५ दिवसांत ठेकेदारांनी नालेसफाई करायची म्हटल्यावर अर्धा पावसाळा नालेसफाईतच जाणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता ही ‘नालेसफाई की, तिजोरी की सफाई’ अशी होणारी चर्चा दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगणार आहे. गतवर्षी नालेसफाई योग्यरीत्या झाली नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी असल्याने मनपा प्रशासनाने त्या ठेकेदारांची बिले थांबवली. परंतु, ठेकेदार प्रशासनापेक्षा हुशार आहेत. या वर्षी त्यांनी नवीन संस्थांच्या नावाने ठेके घेतले आहेत. गेल्या १० वर्षांपासून काम घेतलेला ठेकेदार प्रत्यक्ष नालेसफाई न करता दुसऱ्याच ठेकेदाराकडून नालेसफाईचे काम करून घेतो. मात्र, प्रशासन याची चौकशी करून कारवाई करीत नाही.
नालेसफाई करणे, हे स्वच्छता विभागाचे काम असताना त्याचे ठेके मनपाच्या बांधकाम विभागामार्फत दिले जातात. त्यामागे कोणते अर्थकारण दडले आहे, ते बांधकाम विभागालाच ठाऊक. बांधकाम विभाग केवळ ठेका देऊन मोकळा होतो, तर नालेसफाई झाली की नाही, हे स्वच्छता विभाग पाहतो. दोन्ही विभाग परस्परांवर जबाबदारी ढकलत राहतात. गेल्या वर्षी वंजारपाटी येथील नाल्यातून जाणाऱ्या स्टेमच्या जलवाहिनीस अनेकांनी रबराच्या पाइपलाइन जोडून पाणी चोरण्याचे प्रकार केले. त्या पाइपमध्ये कचरा अडकून परिसरात पाणी साचले. लोकांच्या घराघरांत पाणी घुसले. स्थानिक नगरसेविकेच्या पतीने स्वत: नाल्यात उतरून त्याचा शोध घेतला. ते पाइप तोडून टाकले, तेव्हा स्टेमच्या पाणीचोरीचा प्रकार उघडकीस आला. शहरातील बहुतांश नाल्यांतून व मोठ्या गटारांतून मनपाच्या जलवाहिन्या, टेलिफोन केबल व विजेच्या केबल गेल्या आहेत. त्या केबलमध्ये पाणी अडकून पूरस्थिती निर्माण होते. हे माहीत असताना बांधकाम विभागाचे अभियंते त्यांच्यावर कारवाई करीत नाही किंवा या जलवाहिन्या व केबल रस्त्याच्या कडेला टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देत नाहीत.
या वर्षी सुमारे दीड कोटी रुपये नाले व गटारसफाईवर खर्च होणार आहेत. आता ऐन पावसाळ्यात ही सफाई कशी होईल, याची चिंता नागरिकांना लागली आहे.
>दरवर्षी भिवंडीत पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा बोजवारा उडालेला असतो. यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे नालेसफाईचा ठेकेदार नियुक्त करणे शक्य झाले नाही, असे कारण दिले गेले. आता पाऊस सुरू होताना ठेका दिल्यावर ऐन पावसाळ्यात नालेसफाई ती काय होणार? या कामाचे दीड कोटी रुपये खिशात घालण्याचाच हा प्रकार आहे.