हे बृजभूषण इतके महत्त्वाचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2023 07:50 AM2023-06-08T07:50:48+5:302023-06-08T07:51:37+5:30
एरवी ‘अशा’ लोकांना बाहेरचा रस्ता दाखवायला न कचरणारे पक्षनेतृत्व या माणसाच्या बाबतीत इतके हात बांधून का असावे?
- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
सहा वेळा लोकसभेचे सदस्य झालेले खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी भाजपमधील मोठ्या गटाला बुचकळ्यात टाकले आहे. सर्वसाधारणपणे ‘अशा’ लोकांना बाहेरचा रस्ता दाखवायला भाजपचे नेतृत्व कचरत नाही. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर वादळात सापडले, तेव्हा त्यांना तत्काळ राजीनामा देण्यास सांगण्यात आले. इतरही काही प्रकरणात सत्वर कारवाई केली गेली. असे असताना बृजभूषण शरण सिंह यांच्याभोवती असे कोणते अदृश्य कवच असावे? गेल्या जानेवारी महिन्यात कुस्तीपटूंनी कॅनॉट प्लेसमधील पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली, तेव्हा बृजभूषण यांच्याविरुद्ध साधा एफआयआर दाखल करायलाही दिल्ली पोलिसांनी नकार दिला. शेवटी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खटखटवावे लागले.
दिल्लीत सत्तेच्या वर्तुळात काही कुजबुज कानी येते... उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध उघडपणे पंगा घेणारे बृजभूषण सिंह हे भाजपचे एकमेव खासदार! एवढे होऊनही योगी यांनी मात्र त्यांच्याविरुद्ध काहीही केलेले नाही, हे विशेष! यामुळेच या बाहुबलीला भाजपश्रेष्ठींकडून पाठिंबा मिळत असावा, असे म्हणतात.
बृजभूषण यांच्या अनेक कथित बेकायदा बांधकामांकडे योगी यांनी कानाडोळा केला आहे, म्हणजे पाहा! या बृजभूषण यांचा किमान अर्धा डझन लोकसभा मतदारसंघात दबदबा आहे. शिवाय, अयोध्येच्या राममंदिर अभियानात ते अग्रस्थानी होतेच! बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलनाला बसलेले कुस्तीपटू अखेरीस गृहमंत्री अमित शाह यांना भेटले असता ‘आंदोलन काहीकाळ स्थगित करा,’ असे त्यांना सांगण्यात आले.
दिल्ली पोलिसांनी लैंगिक छळप्रकरणी आधी आरोपपत्र दाखल करावे; मग न्यायालायात प्रकरण जाईल आणि कायदा जे काही करायचे ते करील, पुढील कारवाई न्यायालयाकडूनच होईल, असे त्यामागचे धोरण आहे. पोलिस कारवाईला उशीर झाल्यामुळे एका अल्पवयीन कुस्तीपटूने बृजभूषण सिंह यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेतली. मात्र, दंडाधिकाऱ्यांसमोर तिने आपली जबानी पुन्हा बदलली. अर्थात यात नुकसान व्हायचे, ते झालेच! बृजभूषण यांचे काय होईल? - तुम्ही अंदाज करू शकता!
सुनील बन्सल परतल्याने योगी बेचैन
मागच्या ऑगस्टमध्ये संघटनात्मक बदल होऊन ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणाचे प्रभारी सरचिटणीस म्हणून सुनील बन्सल यांना पाठवण्यात आले होते. त्यांना पुन्हा उत्तर प्रदेशात आणण्यात आले आहे. २०१७ साली उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यापासून राज्यात बन्सल यांचीच वट चालत आली. भाजप पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा असल्याने योगी आदित्यनाथ यांच्याशी ते कायम पंगा घेत आले. सरकारी यंत्रणाही त्यांच्या कह्यात होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे त्यांना उत्तर प्रदेशच्या बाहेर पाठवण्यात आले. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षसंघटना बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. आश्चर्य म्हणजे बन्सल यांना माघारी बोलावण्यात आले असून, मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीबद्दल महिनाभर चालणाऱ्या संपर्क मोहिमेची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे.
- उत्तर प्रदेशात ते यापुढेही महत्त्वाची भूमिका बजावतील, असा अनेकांचा होरा आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बन्सल अमित शाह यांच्या संपर्कात आले. त्यावेळी ते उत्तर प्रदेशचे सरचिटणीस होते आणि ८० पैकी ७१ जागा पक्षाने जिंकल्या होत्या. आता पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणात लोकसभेच्या ८० पैकी ५० ते ५५ जागा जिंकून आणण्याची जबाबदारी बन्सल यांच्यावर टाकण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप यातल्या केवळ ३० जागा जिंकू शकला होता.
वसुंधरा पुन्हा परतल्या
कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाल्याचे परिणाम पक्षश्रेष्ठींवर स्पष्ट दिसत आहेत. मोठा जनाधार असलेल्या नेत्यांना बाजूला सारले तर आहे त्या जागा राखणेही पक्षाला कठीण जाते हे श्रेष्ठींच्या लक्षात आले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यात नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये याचवर्षी निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी भूमिका पूर्णत: बदललेली दिसते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना जीवदान देण्यात आले, तर राजस्थानातही पक्षश्रेष्ठींनी तशीच काहीशी भूमिका घेतली. गेल्या चार वर्षांपासून माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे या ‘नकोशा’ होत्या; परंतु, ३१ मे रोजी अजमेरमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत वसुंधराराजे मोदींच्या शेजारी बसल्या होत्या आणि त्यांच्याशी बोलतानाही दिसल्या. याआधी नाथद्वारा, दौसा आणि भीलवाडासह राजस्थानात अनेकदा पंतप्रधानांचा दौरा झाला; परंतु, त्यावेळी वसुंधरा त्यांच्या आसपासही दिसल्या नव्हत्या.
मात्र, अजमेरची स्थिती वेगळी होती. वसुंधरा या प्रदेशाध्यक्ष नाहीत किंवा विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याही नाहीत. तरीही वसुंधरा यांना व्यासपीठावर मोदी यांच्याशेजारी आसन देण्यात आले. राजस्थानात त्यांना पुन्हा महत्त्व येईल, हे आता गृहीत धरले जात आहे. वसुंधराराजे यांच्याशिवाय काँग्रेसचा पराभव करणे शक्य नाही हे श्रेष्ठींना आता कळून चुकले आहे.
- याचा एक अर्थ असाही निघतो की, सचिन पायलट यांना भाजपची दारे बंद झाली आहेत. आता राजस्थानमधील पक्ष मुख्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेले बॅनर्स आणि पोस्टर्सवर मोदी, नड्डा, अमित शाह, सी. पी. जोशी आणि राठोड यांच्या शेजारी वसुंधराराजे यांची छायाचित्रे झळकू लागली आहेत.