आणखी किती बळी

By Admin | Published: September 2, 2016 02:53 AM2016-09-02T02:53:38+5:302016-09-02T02:53:38+5:30

हल्ली सररास कायदा मोडण्याची भाषा केली जाते. कायद्यातूनही पळवाटा काढता येतात, असे म्हणत कायद्याची लक्तरे अनेकदा वेशीवर टांगली जातात. असेच करता करता

How many more victims? | आणखी किती बळी

आणखी किती बळी

googlenewsNext

हल्ली सररास कायदा मोडण्याची भाषा केली जाते. कायद्यातूनही पळवाटा काढता येतात, असे म्हणत कायद्याची लक्तरे अनेकदा वेशीवर टांगली जातात. असेच करता करता एक दिवस ‘आपल्या’पैकीच एक जण पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. वरळीतल्या इवल्याशा पोलीस क्वाटर्समध्ये वास्तव्यास असलेले विलास शिंदे बुधवारच्या घटनेनंतर शहीद झालेही असतील. पण यापुढे असे किती पोलीस ‘आपण’ शहीद करणार आहोत; हा प्रश्न यानिमित्ताने मन सुन्न करणारा आहे. विलास शिंदे यांची चूक काय? तर त्यांनी केवळ हेल्मेट न घातलेल्या तरुणाला अडवले. आणि याचा राग मनात धरून तरुणाने आपल्या भावाच्या मदतीने शिंदे यांच्या डोक्यावर दांडा मारला. या हल्ल्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शिंदे यांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने शिंदे यांच्या कुटुंबीयांना देऊ केलेल्या २५ लाखांच्या मदतीने ही जखम नक्कीच भरून येणारी नाही. कारण यापूर्वी भिवंडी असो वा ठाणे; येथे वाहतूक पोलिसांना झालेल्या मारहाणीनंतरही राज्य सरकार यासंबंधात काहीच कार्यवाही करू शकलेले नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. विलास शिंदे यांच्यासारखे अनेक वाहतूक पोलीस आपल्याला विविध नाक्यांवर भेटतात. आणि जर हेल्मेट घातले नसेल तर आपण त्यांना चुकवण्यात कसे माहीर झालो आहोत? याचे दाखले अनेक जण देत असतात. मात्र शिंदे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष पोलीस कार्यरत आहेत, म्हणून आपण सुखासुखी झोपतो. दिवसाचे चोवीस तास ही माणसं वाहतूक नाक्यावर ताटकळत उभी असतात. ही माणसं ज्या घरात, ज्या इमारतीमध्ये वास्तव्य करतात तेथील बांधकामांना कधीच तडे गेलेले आहेत. कुठलीही पोलीस वसाहत असो. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. धड पगार नाही, धड घर नाही आणि निवृत्त झाल्यानंतरचे आयुष्य कसे असेल? याची शाश्वती नाही. तरीही कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस तुम्हा-आम्हाला दुचाकी चालवताना हेल्मेटची सक्ती करतात. कारण तुमचा जीव, तुमच्याच कुटुंबासाठी हवा आहे. मशीद बंदर आणि मोहम्मद अली रोडवर वाहतूक पोलीस असूनही नसल्यासारखे असतात. कारण येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करायची म्हटले, तरी वादाला सामोरे जावे लागते. जे. जे. फ्लायओव्हरबाबत फारसे काही निराळे नाही. ही माणसं तुम्हाला आम्हाला फार काही वेगळे सांगत नाहीत. नियमांचं पालन करा, एवढाच आग्रह ते धरत असतात. तथापि, हेल्मेट न घालणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम मोडण्यात पटाईत असलेल्या ‘पुणे’करांवर जोवर विनोद होत राहतील, तोवर
विलास शिंदे यांच्या शहीद होण्याला कोणताही अर्थ प्राप्त होणार नाही.

Web Title: How many more victims?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.