विद्यापीठातून होणारी विद्यार्थ्यांची आंदोलने कितपत समर्थनीय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:56 AM2018-04-12T00:56:18+5:302018-04-12T00:56:18+5:30
विद्यापीठ हे असे वंदनीय ठिकाण आहे जेथे विद्यार्थ्यांचे भविष्य लिहिण्यात येत असते. विद्यापीठाच्या आभायुक्त इमारतीत ज्ञानाची निर्मिती, ज्ञानदान आणि ज्ञानाचा अर्थ लावण्याचे, एकूणच ज्ञानाशी संबंधित सर्व त-हेची कामे होत असतात.
- डॉ. एस.एस. मंठा
विद्यापीठ हे असे वंदनीय ठिकाण आहे जेथे विद्यार्थ्यांचे भविष्य लिहिण्यात येत असते. विद्यापीठाच्या आभायुक्त इमारतीत ज्ञानाची निर्मिती, ज्ञानदान आणि ज्ञानाचा अर्थ लावण्याचे, एकूणच ज्ञानाशी संबंधित सर्व त-हेची कामे होत असतात. मानवता, चिंतन, कल्पनांची देवाणघेवाण आणि सत्याचा शोध घेण्याचे कामदेखील येथेच होत असते. उच्च उद्दिष्टांकडे मानव समूहाची वाटचाल येथूनच सुरू होते. पण देशातील काही उत्कृष्ट विद्यापीठात घडलेल्या घटना या गोष्टींच्या अगदी विपरीत होत्या. त्या विद्यापीठातील विद्यार्थी या मूलभूत संकल्पनांना डावलून निषेध मोर्चे काढण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पहावयास मिळाले. हे विद्यार्थी का निषेध करीत होते? किंवा त्यांना निषेध का करावा लागला? वास्तविक ज्ञानाचे संपादन करण्यासाठी आणि उत्तम नागरिक बनण्यासाठी ते विद्यापीठात प्रवेश घेत असतात.
आजची पिढी ही कष्टाळू आहे, निष्ठावान आहे आणि पूर्वीच्या पिढीप्रमाणेच गुणवानही आहे. फरक एवढाच आहे की पूर्वीच्या पिढीची रचनाच अशी होती की ती मिळेल त्याविषयी खूष होती मग ते शिक्षण असो किंवा त्यानंतर मिळणारी नोकरी असो. आजच्या पिढीसमोर मात्र सतत कोणती ना कोणती आव्हाने उभी ठाकलेली असतात. त्यातही सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचे फार मोठे आव्हान या पिढीसमोर उभे असते आणि मीडियातूनही ज्याकडे लक्ष वेधण्यात येत असते ते म्हणजे शिक्षणाचा दर्जा खालावणे, बेरोजगारी असणे, नेतृत्वाचा अभाव असणे, चांगले अध्यापक नसणे, साधन संपत्तीचा अभाव असणे, संस्थांनी विश्वसनीयता गमावणे, जागतिक मूल्यांकनात संस्थांना कमी दर्जा मिळणे आणि सरतेशेवटी विद्यापीठाचे राजकारण!
सध्याची शिक्षण व्यवस्था अपेक्षांची पूर्तता करू शकत नाही आणि त्यातून कौशल्य विकसित होत नसल्याने कौशल्याची तूट निर्माण झाली आहे. रोजगाराच्या संधी दिवसेन्दिवस कमी कमी होत आहेत. कौशल्याची अधिक अपेक्षा करण्यात येत आहे. आॅटोमेशनमध्ये वाढ आणि साध्या साध्या गोष्टीसाठी तंत्रज्ञानाचा वापर ही त्याची कारणे देण्यात येतात. सामाजिक सुरक्षितता पूर्णपणे हरवली असून त्यामुळे मानवी यातना वाढल्या आहेत. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत होणाऱ्या भ्रष्टाचारामुळेही संकटे वाढली आहेत. रोजगार मिळण्यात अडचणी येत असून दरवर्षी रोजगारात घट होत आहे. नवे रोजगार निर्माण होत नाहीत आणि जे आहेत तेथे करारावर नेमणुका करण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील असंतोषाने कमाल पातळी गाठली आहे. त्यामुळे बेशिस्तही वाढली आहे.
शिक्षण संस्थात दाखल होणारे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबातून आलेले असतात. शिक्षणाच्या आणि अन्य फीमध्ये वाढ झाली असून कुटुंबाचे उत्पन्न त्यांना तोंड देण्यास कमी पडते आहे. बँकांकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळत असल्या तरी त्या व्यवहारात सुधारणांना वाव आहे. परिणामी १०० पैकी ७८ विद्यार्थी हे कॉलेजपर्यंत पोचतच नाहीत. जे उरलेले २२ विद्यार्थी महाविद्यालये किंवा विद्यापीठात जातात, त्यापैकी ८० टक्के हे आर्थिक टंचाईचा सामना करीत असतात. त्यामुळे आर्थिक कारणांसाठी विद्यार्थी आंदोलनाचा अवलंब करीत असतात.
कॉलेजची स्थिती आणखी भयानक आहे. एकेका वर्गात इतके विद्यार्थी कोंबण्यात येत असतात की सर्वांकडे अध्यापकांना व्यक्तिगत लक्ष पुरविता येत नाही किंवा कुणाकडेच लक्ष पुरविले जात नाही. विद्यार्थी व अध्यापक यांच्या व्यस्त प्रमाणामुळे विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गाचा आसरा घ्यावा लागतो. ज्यांना शिकवणी वर्गात जाणे परवडत नाही ते मग विनाकारणच आंदोलनात ओढले जातात. अध्यापक विद्यार्थ्यांवर हुकूमत गाजवू शकत नाहीत कारण त्यांचे व्यक्तिमत्व त्या तोडीचे नसते. त्यामुळे ते तरुण मनांवर प्रभाव पाडू शकत नाहीत. अनेक संस्थांमध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वाचनालये, अध्यापक यांचा अभाव असतो. साहजिकच विद्यार्थ्यांत बेशिस्तपणा वाढतो.
शिक्षण संस्थांमधील अनेक अध्यापक नोकरी करायची म्हणून अध्यापन करतात. पण ते स्वत: ज्ञानार्जनाकडे लक्ष पुरवीत नाहीत. त्यामुळे ते वर्गावर जाण्यास टाळाटाळ करीत असतात. त्यामुळे असे अध्यापक विद्यार्थ्यांसमोर कोणताच आदर्श ठेवू शकत नाहीत. उलट त्यांचा विद्यार्थ्यांवर पडणारा प्रभाव हा नकारात्मक असतो. ते स्वत:विषयी कमीपणा बाळगत असतात, त्यामुळे ते राजकारण आणि कटकारस्थानात रस घेऊ लागतात. त्यांची शिकवण्याची पद्धत प्रभावी नसते. त्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्सुकता निर्माण करण्यास अपयशी ठरतात. कर्तव्याचा भाग म्हणून ते परीक्षा घेतात आणि विद्यार्थीसुद्धा गैरमार्गाचा अवलंब करून परीक्षेला बसतात. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जात सतत घसरण होताना दिसते.
कुटुंब लहान झाल्याने पालकांचा विद्यार्थ्यांवर वचक नसतो त्यामुळे ते चुकीच्या प्रभावाखाली जातात. त्यातून काही गुन्हेगारीकडे वळताना दिसतात. वास्तविक विद्यार्थ्यांवर त्याच्या पालकांची देखरेख असणे गरजेचे आहे. कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे नेते असतात. पण स्थिती अशी आहे की विद्यार्थी नेते हे विद्यार्थी संघटनातून घडताना दिसत नाहीत. काही वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका या संसदेच्या निवडणुकींची लहान प्रतिकृती याप्रकारे होत. त्यात पैसा आणि बळ यांचा मुक्त वापर होत असे. विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थांची मोफत कूपन्स वाटली जात. क्वचित सिनेमाच्या तिकिटाही दिल्या जात.
तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त जे.एम. लिंगडोह यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांच्या समितीने विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकात होणाºया गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारला अहवाल सादर केला पण विद्यार्थी संघटनांना लोकशाही पद्धतीने काम करू दिले जात नाही असा त्यांनी आरोप केला. त्यानंतर अनेक विद्यापीठांनी विद्यार्थी संघटनांना कायम केले.
वास्तविक शिक्षण हे डिग्री किंवा डिप्लोमा देण्यापुरते मर्यादित नसते. शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित असते. खेळ, स्पर्धा, नाटके, संगीत, मासिके, सामाजिक सेवा यासारख्या गोष्टी सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतात. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांना तोंड कशाप्रकारे द्यायचे ही मोठीच समस्या आहे. वास्तविक विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी मिळायला हवी असे मला वाटते. अध्यापकांनी आपल्या हस्तीदंती मनोºयातून खाली उतरून विद्यार्थ्यांशी संवाद साधणे गरजेचे झाले आहे. किती विद्यापीठांचे कुलगुरू विद्यार्थ्यांसोबत बसून त्यांच्या समस्या जाणून घेतात? पण विद्यापीठांचे व्यवस्थापन हे विद्यार्थ्यांपासून दूर चालले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांशी व्यक्तिगत पातळीवर चर्चा करायला हवी. थायलंडच्या जनतेने त्यांचे पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रौ यांना संसद विसर्जित करण्यास भाग पाडले, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास आपले पद जाऊ शकते असे कुलगुरूंना वाटेल तेव्हाच ते त्यांच्याकडे लक्ष पुरवू शकतील.
(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू)