किती वर्ष मिरवणार विज्ञानाचे एकच नोबेल अवॉर्ड?
By Admin | Published: February 28, 2017 12:16 AM2017-02-28T00:16:32+5:302017-02-28T00:16:32+5:30
डॉ. सी.व्ही. रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाशकिरणांच्या मार्गात येणाऱ्या रेणूंमुळे त्यांचे विचलन होऊन तरंगलांबी (वेव्हलेंग्थ)मध्ये बदल होतो
डॉ. सी.व्ही. रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाशकिरणांच्या मार्गात येणाऱ्या रेणूंमुळे त्यांचे विचलन होऊन तरंगलांबी (वेव्हलेंग्थ)मध्ये बदल होतो, असा सिद्धांत मांडला. १९३० या शोधासाठी भारतातील वैज्ञानिक-प्राध्यापक डॉ. सी.व्ही. रामन यांच्या शोधनिबंधास नोबेल पारितोषिक मिळाले. या निमित्ताने १९८७ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. मात्र १९३०च्या नोबेल पारितोषिकानंतर ८६ वर्षं झाली तरीदेखील भारताला विज्ञानाचे एकही नवीन ‘नोबेल प्राइझ’ मिळालेले नाही.
१९३०मध्ये मिळालेल्या विज्ञानाच्या एकमेव नोबेल अवॉर्डला आपण अजून किती वर्षे मिरविणार आहोत आणि स्वत:चीच पाठ थोपटून घेणार आहोत हा प्रश्न आज उपस्थित होणे गरजेचे आहे, तरच आपण विज्ञानाच्या नवीन नोबेल पारितोषिक मिळविण्याच्या ध्येयाकडे प्रवास सुरू करू शकू. अन्यथा विज्ञान दिनानिमित्त साजरे होणारे कार्यक्रम म्हणजे केवळ औपचारिक मलमपट्टी ठरेल. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि मानवी जीवन अधिकाधिक सुकर बनावे यासाठी प्रयत्न वाढीस लागावे म्हणून समाज प्रवृत्त व्हावा, हाच विज्ञान दिनाचा उद्देश होय. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांच्या जोखडामध्ये अडकून न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा संकल्प विज्ञान दिनाच्या निमित्ताने करणे अपेक्षित आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन म्हणजे नेमके काय याची जाणीव करून देण्याची जबाबदारी आजच्या सर्व शिक्षकांवर व विद्यार्थ्यांवर आली आहे आदि अनेक छान छान गोष्टी विज्ञान दिनानिमित्त वाचण्यात येतात. या गुळमुळीत गोष्टींचे आणि आयोजित प्रदर्शनाचे स्तोम मांडले जाते, मोठा खर्चही केला जातो. विज्ञान हा सोपा विषय मुळीच नाही. केवळ प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून हुशार विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा हा विषय अजिबात नाही. आपल्या मनात आलेल्या कल्पनांना किंवा योजनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सारासार विचार करणारा दृष्टिकोन म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होय आणि आज तो आवश्यक आवश्यक आहे.
भारताला का मिळत नाही आणखीन नोबेल अवॉर्ड? आधुनिक मानवी जीवनाचा ज्ञान हा मूलभूत पाया आहे. माहितीच्या महापुरात आणि महाजालात माहितीच्या साठ्याचे विश्लेषण करून ज्ञान प्राप्त करण्याच्या हेतूने वैज्ञानिक संशोधनाकडे पाहणे गरजेचे आहे. विज्ञानाच्या साहाय्याने मनुष्य कुठल्याही गोष्टीच्या तळापर्यंत पोहचू शकतो. मात्र हे करत असताना उद्देश महत्त्वाचा ही गोष्ट विसरता काम नये. या उद्देशाचे मोजमाप करण्याचे मूर्त प्रमाण किंवा मोजपट्टी म्हणजे नोबेल अवॉर्ड होय. आपल्याला मिळालेले नोबेल अवॉर्ड ब्रिटिश राजवटीत मिळाले होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या विकसित अथवा विकसनशील वातावरणात एकही नोबेल अवॉर्ड आपण मिळवू शकलेलो नाही हे कटुसत्य आपण स्वीकारले पाहिजे. एवढेच नव्हे, तर नोबेल अवॉर्ड मिळविण्यासाठी आवश्यक प्रयत्नदेखील करायला हवा. हे प्रयत्न म्हणजे एक दिवस किंवा आठवडा ‘ओपन डे’ किंवा ‘ओपन वीक’ साजरा करून होणार नाही. नोबेल अवॉर्ड फक्त त्याच शोधासाठी दिला जातो ज्या शोधाने मानवी जीवनावर दूरगामी चांगले परिणाम घडून येतात किंवा असा शोध जो, मानवी जीवनाला विस्ताराने प्रभावित करतो आणि एक नवी दिशा, नवा आयाम देतो. भारत नेमका याच गोष्टीत कमी पडतो व नोबेल अवॉर्डपासून कोसो दूर राहतो. वानगी दाखल आपण काही नावाजलेल्या संस्थानचा कारभार पाहिला तरी भारतातील चित्र किती निराशाजनक आहे याची कल्पना येते.
आपल्याकडे बंगलोर येथील ‘इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन’ (इस्त्रो) ही संस्था प्रसिद्ध आहे, जी एकावेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडू शकते; पण तंत्रज्ञानाच्या या कार्यासाठी नोबेल अवॉर्ड मिळू शकत नाही. आपल्याकडे अनेक ‘री-सर्च’ करणाऱ्या संशोधन संस्था आहेत, ज्या विविध विषयांवर शोधनिबंध प्रकाशित करतात मात्र त्यात अभावानेच नावीन्य आढळते. नावीन्य आढळले तरी मानवी जीवनावर दूरगामी परिणाम घडेल असे शोध भारतात किती लागतात या प्रश्नातच आपल्याला नोबेल का मिळत नाही याचे उत्तर दडलेले आहे. ‘आयसर’ म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट्स आॅफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च अशा शिक्षण आणि संशोधनाला वाहिलेल्या संस्था नव्याने उदयास आल्या मात्र त्यांचे चित्रदेखील फारसे आशादायी नाही. हवामान संशोधन केंद्र - दिल्ली आणि पुणे येथे हवामान संशोधन केंद्र म्हणजे ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटिओरिओलॉजी’ ही संस्था आहे. देशातील शेतकऱ्यांना आणि भारतीय हवामान संस्था अचूक हवामान अंदाज मिळावे यासाठी ही संस्था कार्यरत असणे अपेक्षित आहे, मात्र तसे घडत नाही.
भारतीय प्राथमिक शिक्षणापासून ते आयआयटी वगैरे शैक्षणिक संस्थातून जोपर्यंत आपण आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत नोबेल अवॉर्डचे स्वप्न पाहणेदेखील दिवास्वप्न पाहण्यासारखे आहे. मात्र हे चित्र बदलणे शक्य आहे. गरज आहे ती मानसिकता बदलण्यासाठी आपली विचार पद्धती आणि आचरण बदलण्याची. मग एकापेक्षा जास्त नोबेल अवॉर्ड भारताला सहज शक्य होईल.
- किरणकुमार जोहरे
(लेखक भौतिकशास्त्रज्ञ आहेत)