आपण कितपत उपक्रमशील?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 06:59 AM2019-01-08T06:59:21+5:302019-01-08T07:01:06+5:30
नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा जागतिक निर्देशांक हा पॅरिस येथे असलेल्या कार्नेल विद्यापीठाने आणि जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना, जिनिव्हा यांनी तयार केला असून त्यात १२६ राष्ट्रांचा समावेश करण्यात आला आहे.
डॉ. एस. एस. मंठा
नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा जागतिक निर्देशांक हा पॅरिस येथे असलेल्या कार्नेल विद्यापीठाने आणि जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना, जिनिव्हा यांनी तयार केला असून त्यात १२६ राष्ट्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी ८० मानांकने निश्चित करण्यात आली आहेत. धोरणे निश्चित करण्यासाठी हे निर्देशांक उपयुक्त ठरतात. एखादे संशोधन किंवा एखादी कल्पना प्रत्यक्षात उतरून ती चांगली सेवा देऊ लागते तेव्हा तो नावीन्यपूर्ण उपक्रम ऊर्फ ‘इनोव्हेशन’ समजण्यात येतो.
नावीन्यपूर्ण उपक्रमात धोका पत्करण्याची तयारी असावी लागते. त्यातूनच क्रांतिकारी बदल घडवून आणू शकणारे उत्पादन निर्माण होत असते. असे नवे उत्पादन नवी बाजारपेठ मिळवून देत असते. याच्या उलट जे लोक नक्कल करून उत्पादन करतात त्यांना कमी धोका पत्करावा लागतो. कारण नावीन्यपूर्ण उपक्रमातून निर्माण झालेले उत्पादन त्यांना उपलब्ध झालेले असते. उदाहरणादाखल अॅपल कॉम्प्युटर आणि आयबीएमचा पीसी किंवा कॉम्पॅकचा स्वस्त पीसी आणि त्याचे आयबीएम आणि डेल कंपन्यांनी तयार केलेले आणखी स्वस्तातले प्रतिरूप, यांना पाहता येईल. नकली उत्पादने भारतात मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येतात आणि त्यांना स्थानिक बाजारपेठही मिळते. पण आपण एखादे नावीन्यपूर्ण उपकरण तयार केल्याचा अभिमान बाळगू शकतो का?
कोणत्याही उद्योगाच्या यशासाठी त्याच्या कर्मचाऱ्यांची उपक्रमशीलता महत्त्वाची असते. स्वत:चा उद्योग असणारे उद्योजक हे अधिक उपक्रमशील असतात. त्यांचे अधिकारी उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देतात आणि जे कर्मचारी उपक्रमशील असतात त्यांना कामात गुंतवून ठेवण्याचा मालकांचा प्रयत्न असतो. उपक्रमशीलतेमुळे एखाद्या कंपनीची भरभराट होते किंवा क्वचितप्रसंगी कंपनीचा जीव गुदमरूसुद्धा शकतो. उपक्रमशीलतेच्या जागतिक निर्देशांकाच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक ५७ वा आहे. २०१५ मध्ये हाच क्रमांक ८१ वा होता. तेव्हा त्यात नक्कीच सुधारणा झाली आहे. पण यात स्वित्झर्लंड प्रथम क्रमांकावर असून नेदरलँड हे दुसºया तर स्वीडन हे तिसºया क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी अमेरिका चौथ्या क्रमांकावर होते, पण यंदा ते घसरून सहाव्या क्रमांकावर पोचले आहे. गतवर्षी चीन २२ व्या क्रमांकावर होते. ते यंदा १७ व्या क्रमांकावर आले आहे. आपला क्रमांक वर येण्यासाठी काय करायला हवे? उपक्रमशील संस्था, तसेच त्यासाठी लागलेले मनुष्यबळ आणि पायाभूत सोयींची उपलब्धता यांच्या आधारे नवीन उपक्रमांची मोजदाद केली जाते. याशिवाय अत्याधुनिकता, व्यावसायिकता आणि बाजारपेठ या गोष्टीदेखील महत्त्वाच्या असतात.
व्यवसायात जे लोक आहेत त्यांच्यासोबत राहण्यास देशातील व्यावसायिक विद्यालये कमी पडली. अर्थात त्यांना अपवाद हे आहेतच. आपल्या व्यावसायिक विद्यालयातील प्रवेश प्रक्रिया अजूनही जुन्या पद्धतीची, नियमांवर आधारित, केवळ गुणांचा विचार करणारी असल्याने ती संशोधक वृत्तीला प्रोत्साहन देण्यास कमी पडते. उद्योजकतेसाठीदेखील जुनेच आदर्श वापरण्यात येतात. त्यातून उपक्रमशील विद्यार्थी निर्माण होत नाहीत. तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवून आणणारे नवीन तंत्रज्ञान त्यामुळे निर्माणच होत नाही. व्यावसायिक तत्त्वांचा उपयोग करून किमान परवडणारी उत्पादने तयार करताना धोका पत्करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या देशातील व्यावसायिक विद्यालयात कमी मुदतीचाच विचार केला जातो. परीक्षा देणे, निबंध लिहिणे आणि वर्गातील उपस्थिती यावरच अधिक भर दिला जातो. त्यातून कल्पकता आणि क्रियाशीलता निर्माणच होत नाही. या स्थितीत परिवर्तन घडवून आणता येईल का? परीक्षेत केवळ ग्रेड मिळविण्यासाठी विद्यालयात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारून ज्यांच्यात काहीतरी नवीन घडविण्याची ऊर्मी आहे, अशा विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी प्रयोग करण्याची आणि धोका पत्करण्याची तयारी ठेवायला हवी. तसे शैक्षणिक मॉडेल निर्माण करावे लागेल.
जपानच्या ओसाका इलेक्ट्रिक लाइट कंपनीत नियमित शिक्षण न घेतलेला एक विद्यार्थी एक नवीन कल्पना घेऊन दाखल झाला होता. पण त्या कंपनीच्या मालकाने त्या कल्पनेत रुची दाखवली नाही. तेव्हा त्या तरुणाने आपल्या घराच्या तळघरातच सुधारित लाइट सॉकेटची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यातूनच बॅटरीवर चालणारी सायकल त्याने तयार केली. त्याने मात्सुशिता या स्वत:च्या नावाची कंपनी काढून त्यात बॅटरीवर चालणाºया सायकलींचे उत्पादन सुरू केले. पुढे त्याने कंपनीचे नाव पॅनासोनिक असे बदलले. आज ती कंपनी ६६ बिलियन डॉलर्सचा उद्योग बनली आहे. आपल्या व्यावसायिक विद्यालयात कॉर्पोरेट जगतासाठी आवश्यक असलेले विद्यार्थीच तयार केले जातात. त्यातून उपक्रमशीलता विकसित होत नाही. स्टीव्ह वोजनीयाक आणि स्टीव्ह जॉब हे विद्यालयात नापास होणारे विद्यार्थी होते. पण त्यांनी रॉन वायनेसोबत अॅपल कंपनीची निर्मिती केली. हे लोक व्यवसाय कशा तºहेने करू लागले व त्यात त्यांनी यश कसे मिळविले याचा तरुणांनी अभ्यास करायला हवा.
( लेखक एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरूचे माजी चेअरमन )