नियमांचा बाऊ किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 07:21 AM2018-06-01T07:21:30+5:302018-06-01T07:21:30+5:30
माणसांसाठी नियम आहेत की, नियमांसाठी माणूस आहे हा प्रश्न अनेकदा उद्भवतो.
- मिलिंद कुलकर्णी
माणसांसाठी नियम आहेत की, नियमांसाठी माणूस आहे हा प्रश्न अनेकदा उद्भवतो. नियमानुसार कार्यवाहीबाबत कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही, पण वस्तुस्थितीकडे कानाडोळा करीत नियमांचा बाऊ करणे कितपत योग्य आहे?
केंद्र सरकारच्या वनविभागाशी संबंधित कायद्यांविषयी असाच अनुभव सामान्यपणे येत असतो. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा या अवघ्या ८०० लोकसंख्या असलेल्या गावात अशीच परिस्थिती उद्भवली आहे. मार्च २०१८ मध्ये वाघाच्या हल्लयात एका शेतकऱ्याचा मृत्यू आणि नंतर एका वृध्द वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने डोलारखेडा पुन्हा एकदा प्रकाशात आले. मुक्ताई-भवानी संवर्धन राखीव क्षेत्रात हे गाव येते. विदर्भाच्या सीमेवरील या गावातील लोकांचा उपजिविकेचा व्यवसाय शेती हाच आहे. २०० कुटुंबापैकी केवळ १६ लोकांकडे शेती आहे; उर्वरित लोक शेतमजूर म्हणून या गावात आणि परिसरारतील नांदवेल, दुई, सुकळी या गावातील केळी बागांमध्ये काम करतात. या राखीव वनक्षेत्रात सुमारे ७-८ वाघ असल्याचा वनविभाग आणि ग्रामस्थांचा अंदाज आहे. डोलारखेड्यात वनविभागाची संरक्षक कुटी आहे; पण नादुरुस्त असल्याने वनरक्षक तेथे राहत नाही. ये-जा करुन असतात. मार्च महिन्याच्या सुरुवातील याच गावातील एका शेतकºयाचा वाघाच्या हल्लयात झालेला मृत्यू झाला. त्यापाठोपाठ वाघिणीचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांविषयी संशयाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असताना वस्तुस्थिती वेगळी होती. ती पाहून वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि वन्यजीव संरक्षक आणि अभ्यासक चकीत झाले. या गावात वाघ आणि ग्रामस्थ यांच्यात आपुलकी, जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले आहे. २०१३ मध्ये याच गावातील नाना नथ्थू चव्हाण या शेतकºयाच्या केळी बागेत वाघिणीने प्रसवकाळात तीन महिने मुक्काम ठोकला होता. नानाभाऊने वाघिणीला माहेरपणाची वागणूक देत केळीबागेत गरजेपुरताच वावर ठेवला. केळी घडांचे नुकसान सोसले. त्यांच्या या कार्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. आमच्यासमोर मोठ्या झालेल्या या वाघांना इजा पोहोचविण्याचा विचारही मनात येणार नाही. शेतकºयावर हल्ला आणि मृत्यू हा अपघात आहे, असे आम्ही मानतो, अशीच ग्रामस्थांची भावना आहे. वृध्द वाघिणीच्या मृत्यूनंतर तिचे अंतिमसंस्कार डोलारखेड्यात करण्याचा ग्रामस्थांचा आग्रह होता. माहेरवाशीणीप्रमाणे निरोप देण्यासाठी त्यांनी साडी खरेदी केली होती; परंतु वनविभागाच्या अधिकाºयांनी रात्रीतून वाघिणीचा मृतदेह चारठाणा या वनपरिक्षेत्र कार्यालय असलेल्या गावी हलविल्याने ग्रामस्थ नाराज झाले. वाघ आणि मानवाचे अनोखे नाते हे डोलारखेड्यात जपले गेले आहे. वाघ जर या जंगलात राहिला तर शेतीचे नुकसानीला कारणीभूत असलेले रानडुक्कर, चितळ, सांबर, हरीण हे प्राणी शेताकडे फिरकत नाही, असा त्यांचा अनुभव आहे.
६-७ वाघ या परिसरात असल्याने या क्षेत्राला अभयारण्य घोषित करावे, त्यासाठी आम्ही आमचे गाव आणि शेतीच्या पुनर्वसनासाठी तयार असल्याची भावना वन समिती सदस्य प्रतिभा महेंद्र गरुड, शेतकरी संपत गणपत महाले, प्रभाकर शांताराम पाटील, सुकदेव गोविंदा वालखळ यांनी पुढाकार घेऊन केली आहे. परंतु जोवर व्याघ्र अभयारण्य, राष्टÑीय उद्यान, व्याघ्रप्रकल्प यापैकी काहीतरी एक म्हणून या भागाची घोषणा होत नाही, तोवर या गावाचे पुनर्वसन होणार नाही, असा कायदा आहे. २००४ पासून हा पुनर्वसनाचा प्रस्ताव वनविभागाकडे प्रलंबित आहे.
पूर्णा नदीच्या काठावर शेती असल्याने रानडुक्कर, चितळ, सांबर, हरीण हे वन्यप्राणी रात्रीतून पिकांचे नुकसान करतात. अन्नसाखळीमुळे या प्राण्यांची शिकार करण्यासाठी वाघाचा मुक्त वावर असतो. वाघ शेतशिवारात असला की, शेतकरी आणि शेतमजूर तिकडे जायला घाबरतात. शेतीकामे खोळंबतात. अपेक्षित शेती उत्पन्न येत नाही. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, हा त्यांचा सवाल आहे. गेल्या १४ वर्षांपासून हे सुरु आहे. पण कायदा व नियमावर बोट ठेवून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. जगणे महाग आणि मरण स्वस्त अशी अवस्था डोलारखेडा ग्रामस्थांची झाली आहे. नियमाचा बाऊ किती करायचा हा खरा प्रश्न आहे.