बस्स् कर यारऽऽ अब कितना रुलायेगा ?
By सचिन जवळकोटे | Published: November 23, 2017 12:05 AM2017-11-23T00:05:19+5:302017-11-23T00:06:08+5:30
एकदा अमेरिकन शेतकरी, चिनी शेतकरी अन् मराठी शेतकरी एकत्र आले.
एकदा अमेरिकन शेतकरी, चिनी शेतकरी अन् मराठी शेतकरी एकत्र आले. अमेरिकन शेतकरी बढाया मारू लागला, ‘मी एकाच दिवसात अवाढव्य यंत्रानं ५०० एकर शेत नांगरतो. पेरतो.’ तेव्हा चिनी शेतकरी म्हणाला, ‘माझं फार्महाऊस तर टोटल रिमोट कंट्रोलवर. तिकडं सॅटेलाईट थ्रू अॅटोमॅटिक पेरणी सुरू असताना मी इकडं चायना मेड मोबाईलवर व्हिड’ओ गेम खेळतो.’ मराठी शेतकरी उत्तरला, ‘मी आभाळाकडं बघत एकाच महिन्यात तीन-तीन वेळा शेत पेरतो; तरीही पाऊस पडला नाही तर पुन्हा चौथ्यांदा तयारीला लागतो.’
मराठी माणसाची जिद्द पाहून अचंबित झालेल्या अमेरिकन शेतकºयानं विषय बदलला, ‘माझ्या फॅमिलीचा डाटा मी लॅपटॉपमध्येच सेव्ह केलाय.’ चिनी शेतकरी म्हणाला, ‘मी तर प्रत्येकाचीच मायक्रोचीप बनविलीय.’ मराठी शेतकरी उत्तरला, ‘केवळ माझ्याच घरातल्या नव्हे तर माझे काका, मामा, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा अन् त्यांच्या आजीची पणजी यांचीही माहिती मी आॅनलाईन भरलीय. कुणाच्या पायाला तीळ इथंपासून कुणाच्या नातवानं गावच्या यात्रेत इवलीशी कार विकत घेतली, याचीही खडान्खडा माहिती मी त्यात टाकलीय.’ हे ऐकताच समोरचे दोघे अवाक् झाले. अमेरिकन शेतकरी शेवटचं बोलला, ‘मी शेतात तीन-तीन तास उभारतो. अॅटोमॅटिक स्पे्र करताना कधीच थकत नाही.’ लगेच चिनी म्हणाला, ‘मीही माझ्या डुप्लिकेट कोंबड्या थेट कुरिअरनं जगभरात पाठवतो. खरं-खोटं कळू देत नाही.’ मराठी शेतकरी मात्र शांतपणे सांगू लागला, ‘मी सलग १५ दिवस रोज दहा तास आॅनलाईन फॉर्म भरायला रांगेत उभारतो. बाजारात दर नाही म्हणून शेतातलं उभं पीकही स्वत:च्याच हातानं जमीनदोस्त करतो. विषारी औषधाला न घाबरता फवारतो; कारण निराशेत ते औषध पिऊन-पिऊन म्हणे आम्ही आमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवितो.’
बोलता-बोलता मराठी शेतकरी निघाला, ‘चला, मला जाऊ द्या. कर्जमाफी फॉर्म भरण्याच्या नादात माझा अख्खा दीड महिना वाया गेला. कामधंदे सोडून बँकेत हेलपाटे मारत बसल्यामुळं यंदाचं पीकही वाया गेलं. आता पुन्हा कर्ज काढण्यासाठी नवीन बँक हुडकू द्या !’ हे ऐकताच मात्र समोरच्या दोघांनी त्याच्या पायावर डोकं ठेवत एकच वाक्य उच्चारलं ‘बस्स्ऽऽ कर यार.. अब कितना रुलायेगा?’