किती विश्वासार्ह?
By admin | Published: February 9, 2016 03:43 AM2016-02-09T03:43:29+5:302016-02-09T03:43:29+5:30
भारतात घुसून दहशत माजविणाऱ्या अतिरेक्यांना पाकिस्तानात जे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये, शक्य तो प्राणार्पण करा पण ‘शत्रू’च्या हाती जिवंत सापडू नका आणि चुकून सापडलात
भारतात घुसून दहशत माजविणाऱ्या अतिरेक्यांना पाकिस्तानात जे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये, शक्य तो प्राणार्पण करा पण ‘शत्रू’च्या हाती जिवंत सापडू नका आणि चुकून सापडलात व चौकशांना सामोरे जावे लागले तर तपासी यंत्रणा गोधळून जाईल अशीच उलटसुलट माहिती द्या, असेही शिकविले जाते असे सांगतात. हे खरे असल्याची प्रचिती केवळ भारतालाच नव्हे तर ज्या ज्या देशाना दहशतवादाचा धोका आहे त्या साऱ्याच देशाना एकदा नव्हे अनेकदा आली आहे. अशा स्थितीत आताचा डेव्हीड कोलमन हेडली आणि पूर्वाश्रमीचा दाऊद गिलानी याचा जबाब कितपत विश्वासार्ह मानायचा हा एक प्रश्नच आहे. आज तो अमेरिकन सरकारच्या ताब्यात असला तरी मुंबई शहरावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी तो एक असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारा सोमवारी न्यायालयाच्या समक्ष त्याचा जबाब नोंदविण्यात आला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे कार्य केले आणि सोमवारच्या त्याच्या जबाबाबाबत आपण समाधानी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरीदेखील शंकेला वाव राहतो व त्यामागेही कारण आहे. सामान्यत: गुन्हेगार कोणताही असो, त्याची पहिली प्रतिक्रिया गुन्हा नाकारण्याचीच असते. पण हेडलीबाबत तसे काहीच घडलेले नाही. त्याला विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नाचे त्याने अगदी पाठ केल्यागत धडाधड उत्तर दिल्याचे याबाबत प्रसृत वार्तांवरुन लक्षात येते. त्याला जे सूचक प्रश्न विचारले त्यांची उत्तरेही त्याने होकारार्थी दिली. झकी ऊर रहमान लख्वी आणि हाफीझ सईद यांना आपण भेटलो, काही प्रशिक्षण शिबिरांना भेटी दिल्या, काश्मीरात जाऊन आपण तेथील भारतीय लष्कराशी थेट लढू इच्छित होतो पण लख्वीने आपल्याला त्यासाठी योग्य मानले नाही वगैरे वगैरे अनेक बाबी हेडलीने सांगितल्या. इतकेच नव्हे तर मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचा सहभाग असल्याचेही त्याने जबाबात सांगितले. पण त्यातून काय निष्पन्न निघणार, हा खरा प्रश्न आहे. केवळ मुंबईवरीलच नव्हे तर भारतात आजवर जे जे म्हणून अतिरेकी हल्ले झाले त्यांच्यामागे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांचा सहभाग असल्याचे सज्जड पुरावे भारताने गोळा करुन पाकिस्तानला सादर केले पण त्या सरकारने ते चक्क नाकारण्याचीच भूमिका आजवर घेतली आहे. साहजिकच हेडली जे सांगतो आहे आणि यानंतरही सांगणार आहे त्यावर पाकिस्तान विश्वास ठेवील असे मानणे म्हणजे फारच भोळसटपणा झाला. मुंबई हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांच्या ताब्यात सापडलेला एकमात्र जिवंत अतिरेकी अजमल आमीर कसाब स्वत: आपण पकिस्तानी असल्याचे सांगत होता, तसे पुरावेही भारतीय यंत्रणांच्या हाती लागले होते पण तरीही पाकिस्तानने अखेरपर्यंत त्याला नाकारण्याचीच भूमिका घेतली होती. अशा स्थितीत हेडलीचे कथन पाक स्वीकारेल आणि लख्वी-हाफीझ यांना जेरबंद करील अशी आशा बाळगणे म्हणजे दुर्दम्य आशावादाचा कटेलोटच म्हणायचा.