मराठी टिकवायची कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:11 AM2017-12-01T05:11:41+5:302017-12-01T05:12:09+5:30
मुंबई आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेषत: उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचा मराठी संस्कृतीचा मिलाप हा सांस्कृतिक उंची वाढविणारा आहे, असे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने तमाम परप्रांतीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेषत: उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचा मराठी संस्कृतीचा मिलाप हा सांस्कृतिक उंची वाढविणारा आहे, असे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने तमाम परप्रांतीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. गेल्या काही दिवसांत फेरीवाले आणि मनसे यांच्यात झटापट पाहायला मिळाली. काँग्रेसने उघडउघड फेरीवाल्यांची बाजू घेतली अधिकृत फेरीवाल्यांच्या बाजूने आपणही असल्याचा देखावा शिवसेनेला निर्माण करावा लागला. या सगळ्या घडामोडींचे मूळ अर्थातच मराठी विरुद्ध परप्रांतीय असे असल्याने मराठी भाषकांच्या अस्मितेचा वादही पेटला. मुंबई परिसरात मराठी भाषकांचे प्रमाण कमी होताना दिसते. त्यावर फार कोणी विचार करताना दिसत नाही. केवळ मुंबई महाराष्टÑाची म्हणून मराठी असल्याचे जे बनावट चित्र निर्माण केले जाते, त्यावर चर्चा होण्याची गरज आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवरच मराठीप्रेमी पालकांचे महासंमेलनही मुंबईत भरणार आहे. यात प्रामुख्याने बंद पडणाºया मराठी शाळांचा विचार होणार आहे. तसेच त्यात सरकारी धोरणातील धरसोड वृत्ती आणि मातृभाषेतून शिक्षणाबाबतचा पालकांच्या दृष्टीकोनावरही चर्चा अपेक्षित आहे. राजभाषा असलेली मराठी ज्ञानभाषा म्हणून पुरेशी नसल्याचा ग्रह बदलत नाही आणि मराठीतून शिक्षणाबद्दल पालकांना विश्वास वाटत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. मराठीचा विचार हा फक्त शालेय शिक्षणापुरता मर्यादित नाही; तर मातृभाषेतून होणारे व्यवहार; बोलणे, वाचणे, लिखाण करणे, त्या भाषेतून तयार होणारे साहित्य, त्याचा दर्जा, पारिभाषिक शब्द, नव्या शब्दांची निर्मिती, तिचा वापर, अन्य भाषक शब्द स्वीकारण्याबाबतची मानसिकता या साºयाचा ऊहापोह होण्याची गरज आहे. मराठीतून शिक्षणातच पुढचा मराठी वाचक, लेखक दडलेला आहे; ती केवळ संवादभाषा नाही, याचे भान आल्याखेरीज या प्रश्नांची चर्चा सफळ संपूर्ण होणारी नाही. केवळ सरकारी धोरणांना दोष देण्याचा उपचार पार पाडून हा प्रश्न सुटणारा नाही. मातृभाषा म्हणून आपल्याला मराठीबद्दल आत्मीयता वाटते का? नसेल, तर त्याची कारणे काय? याचेही आत्मपरीक्षण एकदा करायला हवे. त्यातच भाषाव्यवहाराच्या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. मराठी साहित्य व्यवहारासाठी सरकार देत असलेल्या रकमेची कानडीशी तुलना केल्यावर ती तुटपुंजी आहे हे जसे समोर आले; तसेच मिळालेल्या रकमेचा वापर करून जे संमेलन पार पडते त्यातील खुजेपणाचे आत्मपरीक्षण करण्याचे धारिष्ट्य आपण दाखवत नाही. आपल्या या परस्परविरोधी भूमिका हेही मराठीचे दुखणे आहे. त्यामुळेच त्यावरील इलाज कठीण आहे.