शिक्षक कसा असावा..?
By Admin | Published: September 5, 2014 01:19 PM2014-09-05T13:19:24+5:302014-09-05T13:21:25+5:30
देशाची समृद्धी आणि श्रीमंती त्या देशातील बुद्धीसंपत्ती किती आहे? कशी आहे? आणि कशी वापरली जाते, यावरही मोजावयास हवी.
>
- द. ता. भोसले, निवृत्त प्राचार्य
देशाची समृद्धी आणि श्रीमंती त्या देशातील जलसंपत्ती, वनसंपत्ती, खनिजसंपत्ती, धान्यसंपत्ती आणि धनसंपदा यातून जशी मोजली जाते, तशीच ती बुद्धीसंपत्ती किती आहे? कशी आहे? आणि कशी वापरली जाते, यावरही मोजावयास हवी. त्या देशातील नागरिकांनी समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आपल्या बुद्धीचा वापर करून, किती उंची गाठली यावर मोजावयास हवी आणि त्यासाठी त्याला मिळणारे आणि मिळालेले शिक्षण याचे मोजमाप वापरावयास हवे. अनुभव आणि निरीक्षण असो, की व्यक्तीचा सर्वांगीण विकास, राष्ट्राची चौफेर प्रगती, समाजाचा सर्वांगीण अभ्युदय, सुप्त गुणांचा उत्तम विकास आणि भविष्याला आकार देणारी संस्कार संपन्न नि कर्तव्यनिष्ठ पिढी तयार करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही चिरस्थायी उपाय नाही. यासाठी कायदा फारसा उपयोगी पडत नाही. कारण, कायदा माणसावर सक्ती करतो आणि सक्तीतून आसक्ती आणि आसक्तीतून विकृती निर्माण होते आणि ही विकृती कायद्याला मोडीत काढते. म्हणून चिरस्थायी अभ्युदयासाठी कायदा उपयोगी पडत नाही. हा आपला अनुभव आहे. एकेकाळी राजकारणी नेत्यांचे आचार-विचार आणि चारित्र्य देशाच्या अभ्युदयाला उपयोगी पडत होते. एकेका शाश्वत मूल्याचं प्रतीक म्हणून ही माणसे राजकारणात वावरली. त्यामुळेच त्यांच्या शब्दाला सार्मथ्य प्राप्त झालेले आपण पाहिले. प्रखर देशप्रेम, तत्त्वाधिष्ठित राजकारण, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व, जातिवंत कळवळा, सर्मपित सेवाभाव यासारख्या गुणवैशिष्ट्यांनी या थोर पुरुषांनी राजकारणाला सेवेची जोड दिली. सर्मपणाची जोड दिली म्हणून तर लो. टिळक, सावरकर, म. गांधी, लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या घोषणा जनतेने आपल्या काळजावर कोरल्या. म. गांधींनी ‘चले जाव’ म्हणताच हजारो युवकांनी राजकारणाच्या यज्ञकुंडात स्वेच्छेने उड्या घेतल्या. त्यात ते होरपळून निघाले. आजच्या कोणत्या राजकारण्याच्या ओठावर ही घोषणा शोभून दिसेल? सर्वार्थाने बदनाम झालेले आजचे राजकारण आणि राजकारणी देशाच्या सर्वस्पश्री आणि शाश्वत विकासाला प्रेरक ठरू शकत नाहीत. उपयोगी ठरू शकत नाहीत. देश आणि समाज, वर्तमान आणि भविष्य, वास्तव आणि स्वप्न यांना आकार देण्याचे खरे सार्मथ्य आहे शिक्षणामध्ये आणि ज्ञाननिष्ठ, जननिष्ठ नि चारित्र्यनिष्ठ अशा आदर्श शिक्षकांमुळे.
देशाच्या सर्वांगीण अभ्युदयासाठी शिक्षणच आवश्यक का? याचाही जरा विचार करावा लागेल आणि त्यासाठी अध्यापनाला धर्म मानणार्या शिक्षकाचीही अटळता आपल्या लक्षात येऊ शकेल. शस्त्राने प्रदेश जिंकता येतो; पण मन जिंकता येत नाही. सत्तेने प्रशासन साधता येते; पण माणूस ‘उभा’ करता येत नाही. पैशाने माणूस विकत घेता येतो; पण माणूस माणसाशी जोडता येत नाही. त्याची निष्ठा विकत घेता येत नाही. पण, या सार्या गोष्टी शिक्षणाने साध्य होतात. शिक्षक त्याला मूर्त रूप देऊ शकतो. शिक्षण हे माणसाला अधिक उन्नत करते. परिपूर्ण करते. त्याच्या वर्तनात परिवर्तन घडविते. जगणं अधिक समृद्ध करते. माणसाला पायापासून क्षितिजापर्यंत बघायला शिकविते. शिक्षण माणसाच्या कौशल्याचा - गुणांचा विकासही करते आणि आपली जीवन जाणीव अधिक समंजसही करते. समाजातल्या सार्या विकृतीवरील एकमेव आणि अंतिम उपाय म्हणजे संस्कारसंपन्न शिक्षण हाच आहे. स्वामी विवेकानंदांनीही व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, चारित्र्याची बांधणी, कौशल्याचा विकास, मातृभूमीवर प्रेम आणि मतांची श्रीमंती-समृद्धी ज्यामुळे घडते ते खरे शिक्षण होय असे म्हटलेले आहे. म्हणूनच जपान, र्जमनी, स्वीडन यासारखी राष्ट्रे सर्वाधिक खर्च शिक्षणावर करतात. शिक्षण आणि संशोधनावर करतात. आपल्याकडे सातव्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीला प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागे फक्त बारा रुपये खर्च होतो. पुन्हा-पुन्हा पाठपुरावा केल्यावर आता कुठे आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या साडे-तीन टक्के एवढा खर्च शिक्षणावर खर्च करतो आहे. तो वाढायला हवा.
असा हा विस्कटलेला वर्तमान आणि झाकाळून गेलेला भविष्यकाळ यांना आकार देण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण देणारा शिक्षक कसा असावा, याचा विचार करणे अनाठायी होणार नाही. शिक्षणाचे सार्मथ्य, त्याचे सर्वस्पर्शित्व आणि त्याची माणूस घडविण्याची क्षमता ओळखणारा शिक्षक असेल तरच शिक्षणाची सफलता आपणाला जाणवेल. अध्यापन हा पोटार्थी धंदा नसून तो धर्म आहे. अध्यापन ही सर्मपित भावनेने करावयाची उपासना आहे. ते केवळ उपजीविकेचे साधन नाही, तर देश उत्थानाचा ऐतिहासिक प्रयोग आहे. ती केवळ अक्षर ओळख करून देणारी आणि चार गणिते, दोन कविता शिकविणारी शाळा नव्हे तर कर्तबगार नवी पिढी घडविणारी प्रयोगशाळा आहे, अशी भूमिका घेऊन काम करणारा तो साधक असायला हवा. केवळ शिक्षक नको. कारण, साधक हा हाती घेतलेल्या कर्माला आत्मा अर्पण करतो. तो नफा-तोट्याचा विचार करीत नसतो. तो जीवनाच्या अंतिम साध्यावर लक्ष ठेवून तो निष्ठापूर्वक उपासना करतो. अशी भूमिका घेतली तरच तो मुलांचा शिल्पकार ठरेल. विनोबांनी शिक्षणावर भाष्य करताना फार मार्मिक सूत्र सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा. विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे आणि समाज समतानिष्ठ असावा.’’ शिक्षक जर विद्यार्थीनिष्ठ असेल तर कळ्यांचे फुलांत रूपांतर करू शकतो. पाठय़पुस्तकाबरोबर उघड्या जगाचे पुस्तकही शिकवतो. चांगला विद्यार्थीनिष्ठ शिक्षक हा सहवासातून, संवादातून, आचरणातून, चारित्र्यातून मनाची श्रीमंती असलेला कर्तबगार विद्यार्थी घडवू शकेल. घडवू शकतो आणि तो आपल्या पंचेंद्रियांना ज्ञानसन्मुख करून जीवनाला समृद्ध करणार्या संस्कारांचीही तो पेरणी करू शकतो. खरे तर त्यातूनच साक्षर मतदार निर्माण करीत नाही, तर तो कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण करतो. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की दुसर्या कोणत्याही उपायांनी नागरिक निर्माण करता येत नाही आणि ज्या समाजात ‘मतदारा’पेक्षा नागरिकांची संख्या अधिक असते, तो देश अजिंक्य ठरतो. इतरांसाठी आदर्श देश बनतो. असे सजग आणि सेवाभावी नागरिक केवळ उत्कृष्ट असणारा शिक्षक निर्माण करू शकतो, हे विसरता कामा नये. एवढेच नव्हे तर संस्कार संपन्न जीवनसृष्टी हीदेखील शिक्षणातूनच प्राप्त होत असते आणि आज समाजातली भीषण विषमता, भीषण विकृती पाहिली तर ती संस्कारशून्य शिक्षणाची परिणती आहे, असे वाटायला लागते. मला तर असे नेहमी वाटते, की शिक्षणाचं सौंदर्य शिक्षकात लपलेलं असतं. शिक्षकांचं सौंदर्य त्याच्या चारित्र्यात लपलेलं असतं, चारित्र्याचे सौंदर्य त्याच्या संस्कारात लपलेलं असतं. संस्कारांचे सौंदर्य आचरणात लपलेलं असतं आणि आचरणातील सौंदर्य समाजजीवनातून प्रकट होत असतं, म्हणून आपला शिक्षक घाणीने माखलेल्या चिंधीसारखा असता कामा नये.
शिक्षणाकडे आणि शिक्षकांकडे पाहण्याचा शासन आणि समाजाचा दृष्टिकोन फारसा गंभीर नसला तरी व्रतस्थ भावनेने-ईश्वराची पूजा समजून आणि सामाजिक ऋणाची परतफेड करण्याच्या भूमिकेने आमच्या शिक्षकाने ‘मिशन’ म्हणून आपल्या सेवेकडे बघावे. नाहीतरी हाताखालून शिकून पुढे थोरपदाला गेलेला प्रत्येक माणूस प्रथम आठवण करतो - तो आपल्या शिक्षकाची, जीवनात उभे करणार्या गुरुजनांची, त्याच्या काळजावर शिक्षकाचे नाव कोरलेले असते, ही काही सामान्य बाब नाही.