हस्ताक्षर कसे असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:25 AM2017-07-20T04:25:47+5:302017-07-20T04:25:47+5:30
समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या एकोणिसाव्या दशकात लेखनक्रिया या प्रकरणात, हस्ताक्षर कसे असावे याचे सुंदर विवेचन केले आहे.
- डॉ. रामचंद्र देखणे
समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या एकोणिसाव्या दशकात लेखनक्रिया या प्रकरणात, हस्ताक्षर कसे असावे याचे सुंदर विवेचन केले आहे.
वाटोळे सरळे मोकळे।
वोतले मसीचे काळे।
कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळे।
मुक्तमाळा जैशा।। (दासबोध) काळीभोर मसी म्हणजे शाई करून अक्षर वाटोळे, सरळ व मोकळे लिहावे. एकसारख्या लिहिलेल्या ओळी जणू मोत्यांच्या माळा वाटाव्यात इतके हस्ताक्षर सुंदर असावे. सुधड, सरळ आणि ठसठशीत मोकळे अक्षर, काना, मात्रा वेलांट्यांच्या लेखनातील स्पष्टता, दोन ओळीतील पुरेसे अंतर, अक्षरांचे आणि ओळीतील अंतरांचे सर्वत्र सारखेपण, ओळीमधल्या आणि समासातल्या शोधांचा अभाव, कागद झडून गेल्यावर मजकुराला बाधा येऊ नये अशा दक्षतेने चारही बाजूंना सोडलेल्या कोऱ्या जागा या सर्वांचे सूक्ष्मतेने चिंतन करून समर्थांनी केवळ हस्ताक्षर आणि लेखनक्रिया या विषयी एक समास लिहिला आहे. शब्दांबरोबर अर्थ, अर्थाबरोबर भाव आणि भावाबरोबरच उच्चारांची शुद्धता येण्यासाठी लेखनक्रिया शुद्ध आणि स्वच्छ असायला हवी. आजही मातृभाषा मराठी असलेल्या आणि त्याच भाषेतून पदवी घेतलेल्या अनेकांना शुद्ध मराठी लिहिता येत नाही.
मराठी भाषेसारखेच मराठी हस्ताक्षरही ठसठशीत, स्पष्ट आणि सुंदर असायला हवे. हस्ताक्षराचा आणि लेखनक्रियेचा काही संबंध नाही, असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की हस्ताक्षर हाच अंतर्मनाचा आरसा आहे. असेही म्हणतात की, हस्ताक्षरावरून मन कळते, वळणदार अक्षर येण्यासाठी वळणदार मन असावे लागते. मनाला आणि अक्षरालाही संस्कारातूनच वळणदारपणा येत असतो. पूर्वीच्या काळी हस्ताक्षर सुधारण्यासाठी शाळेत गुरुजी खूप परिश्रम करून घेत असत. ज्ञानेश्वरीमध्येही माऊलींनी संदर्भ दिला आहे.
‘‘हे बहु असो पंडितु।
धरोनि बाळकाचा हातु।
वोळी लिही व्यक्तु। आपणची।।’’ (ज्ञानेश्वरी. १३-२०८) मुलाचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी पंतोजी म्हणजे शिक्षक मुलांचा हात धरून त्याच्याकडून सुंदर हस्ताक्षर लिहून घेत असत. पूर्वीच्या काळी हस्ताक्षर सुधारण्यासाठी बोरुने लिहिण्याची एक शुद्धलेखन पुस्तिका असायची. त्यात वरची ओळ छापलेली असायची आणि त्याप्रमाणे वळणदार पद्धतीने खालच्या ओळी या एकेका अक्षराला घटवून लिहिण्यासाठी जागा असायची. त्या पुस्तिकेच्या मागच्या पानावर म. गांधी काहीतरी लिहित आहेत, असे चित्र होते आणि त्या चित्राच्या खाली गांधीजींचे हस्ताक्षराविषयीचे विचार होते. त्यात त्यांनी लिहिले होते, शिक्षण, मन आणि हस्ताक्षर यांचा किती सुंदर समन्वय आहे, ते यावरून लक्षात येईल.