डॉक्टरांवरील हल्ले आणि रुग्णांची परवड कशी थांबविणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 04:21 AM2020-08-14T04:21:16+5:302020-08-14T04:24:14+5:30
रुग्णांच्या नातेवाइकांनी कायदा हातात न घेता कायद्यानेच न्याय मागितला पाहिजे. हल्ले करून समाज सुदृढ ठेवता येत नाही, याचे भान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी कोरोनाच्या निमित्ताने ठेवायला हवे.
- धनाजी कांबळे, वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, पुणे
भारतीय समाज हा धार्मिक आणि उत्सवी आहे. तसाच तो भावनिक आहे. त्यातही देव ही अत्यंत श्रद्धेची संकल्पना आहे. ज्याला वाटेल त्याने त्याची उपासना करावी. ‘डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांच्यात देव आहे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. त्याआधी संतांनी हेच वारंवार सांगितले आहे. तरीही मानसिकता बदलेली नाही. मात्र, कोरोना महामारीत डॉक्टरच देव आहेत, असा दृष्टांत अनेकांना झाला असेल. विज्ञानाने लावलेल्या शोधामुळे, यंत्रामुळे, तंत्रामुळे डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते. प्रयत्नांची पराकाष्टा करून रुग्णाला वाचविणे इतकेच त्यांचे लक्ष्य असते. मात्र, गेल्या दशकात परिस्थिती बदलली आहे.
समाजभान सुटल्याप्रमाणे देवासमान समजल्या गेलेल्या डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. जे डॉक्टर मृत्यूच्या दाढेतून एखाद्याला बाहेर काढतात, जीवनदान देतात, त्या डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून सहा-सहा तास पीपीई किट घालून अनेकांचे प्राण वाचविले. कोविड सेंटरमध्ये काम करताना घोटभर पाणी पिण्याची उसंत नसलेल्या डॉक्टरांवर हल्ले झाल्याच्या घटना पुणे, पिंपरी-चिंचवड, लातूरमध्ये नुकत्याच घडल्या. याआधीही डॉक्टरांवर हल्ले झालेच आहेत. किंबहुना दरवर्षी कुठे ना कुठे हल्ले होतच असतात. परंतु, कोरोनाच्या काळात होत असलेले हल्ले माणसं निर्दयी आणि हिंसक झाल्याचे निदर्शक आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, तर त्याला बहिष्कृत करण्यापर्यंत मजल गेलेल्या समाजात डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार जिवावर उदार होऊन सेवा करीत आहेत. मात्र, डॉक्टरांवर हल्ला झाल्यावर तात्पुरती चर्चा होते. निषेध होतो. दीर्घकालीन उपाययोजना होत नाहीत. आता डॉक्टरांना कायद्यानेही संरक्षण दिले आहे, तरी हल्ले थांबलेले नाहीत.
डॉक्टर व रुग्णालयांवर होणारे हल्ले समाजातील अप्प्रवृत्ती जिवंत असल्याचे उदाहरण म्हणायला हवे. इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या एका अभ्यासानुसार, भारतातील ७५ टक्के डॉक्टरांना कधी ना कधी हिंसेला सामोरे जावे लागले आहे. अतिदक्षता विभाग, अपघात विभाग आणि शस्त्रक्रियेनंतरच्या विभागात हिंसा घडलेली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. अपुऱ्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी डॉक्टरांना जबाबदार ठरविण्याची प्रवृत्ती, आरोग्य सुविधांचा वाढलेला खर्च, डॉक्टर आणि नातेवाईक यांच्यातील संवादाचा अभाव अशी काही कारणे यामागे असल्याचे यात पुढे आले होते.
मार्च २०१८ मध्ये पिंपरीतील डी. वाय. पाटील वैद्यकीय विद्यापीठात हल्ला झाला होता. त्याचवेळी मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की झाली होती. जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत मुंबईत ४४ घटना घडल्या होत्या. २०१६ मध्ये १९८ प्रकरणे राज्यात घडली. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये १९ देशांमध्ये ६०० डॉक्टरांवर हल्ले झाले होते.
डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी सरकारने विशेष कायदा केला आहे. केंद्र सरकारनेही साथरोग कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. तीन महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात आहे, तसेच ५० हजार ते दोन लाखांपर्यंत दंडही केला जाईल, असे म्हटले आहे. कायद्याद्वारे हल्लेखोरांना चाप लावला तरीही हल्ले थांबलेले नाहीत. अनेकवेळा रुग्णाला घरी सोडताना बिलावरून डॉक्टर आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यात गैरसमज होतो. विविध प्रकारचे खर्च अपेक्षित धरलेले नसतात. या वास्तवाकडेही डोळेझाक करावे,
अशी परिस्थिती नाही. आपल्याकडील आरोग्य व्यवस्था ही केवळ धनिकांसाठी असल्याप्रमाणे खासगी रुग्णालयांमधील तपासणींच्या दरांवरून दिसते. मागे उत्तर प्रदेशातील रुग्णालयात ऑक्सिजनविना शेकडो बालकांचा मृत्यू झाला होता.
अहमदाबादमधील खासगी रुग्णालयात आग लागून आठ कोरोना रुग्ण होरपळले. असाच प्रकार विजयवाडा येथील कोविड सेंटरमध्ये घडला, याला जबाबदार कोण? असेही अनुत्तरित प्रश्न आरोग्य व्यवस्थेबद्दल आहेत. सरकारी रुग्णालयांची परिस्थितीही वेगळी नाही. मात्र, अलीकडे त्यात सुधारणा झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ला करणाºया प्रवृत्तींना कठोर शासन झाले पाहिजे. मात्र, जे डॉक्टर एखाद्या रुग्णाची पैशासाठी अडवणूक करीत असतील, तर त्यालाही पायबंद घातला पाहिजे. रुग्णांच्या नातेवाइकांनी कायदा हातात न घेता कायद्यानेच न्याय मागितला पाहिजे. हल्ले करून समाज सुदृढ ठेवता येत नाही, याचे भान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी कोरोनाच्या निमित्ताने ठेवायला हवे.