चॅटबॉट्सना नेमके प्रश्न कसे विचारायचे? ते शिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2023 07:41 AM2023-06-09T07:41:13+5:302023-06-09T07:41:53+5:30

ज्यांना चॅटबॉट्सशी तर्कशुद्ध, मोजके बोलता येते, अशा व्यावसायिकांची जागतिक तंत्र उद्योगांना गरज लागणार, तीच नवी विद्याशाखा प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग!

how to ask chatbots the right questions learn it | चॅटबॉट्सना नेमके प्रश्न कसे विचारायचे? ते शिका!

चॅटबॉट्सना नेमके प्रश्न कसे विचारायचे? ते शिका!

googlenewsNext

डॉ. दीपक शिकारपूर, उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक

अनेक आघाड्यांवर प्रगती साधण्याचा एक हमखास उपाय म्हणजे उत्पादकता आणि उत्पादनक्षमता वाढवणे. उत्पादन (प्रॉडक्शन) आणि उत्पादकता (प्रॉडक्टिव्हिटी) यामध्ये विलक्षण फरक आहे. कमीत कमी खर्चात व ठरावीक वेळेत अधिकाधिक उत्पादन करणे आणि (स्पर्धेला तोंड देत) वाजवी किमतीला विकूनही नफा मिळवणे.... उत्पादकतेच्या या अंगांना विलक्षण महत्त्व आहे. इथेच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'ऑटोमेशन' आणि 'कृत्रिम बुद्धिमत्ता' त्यामुळेच आज सगळ्यात वेगाने वाढणारी क्षेत्रे होत चालली आहेत.

या शाखेतील प्रवाह मुख्यतः स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे. उदाहरणार्थ आपण स्मार्टफोनवर दिशादर्शक अॅप्स वापरतो. त्याला अचूक माहिती कशी मिळते? प्रत्यक्ष वेळी (रिअल टाइम) मिळालेल्या टेराबाइट्समधील अजस्त्र माहितीच्या अफाट महासागरातून तुम्हाला हवी ती माहिती देणे व आपल्या प्रश्नावरून थेट उत्तराबरोबरच संलग्न माहिती देणे त्याचबरोबर पृथक्करण व निष्कर्षीय बुद्धिमत्ता आता आधुनिक संगणकाला प्राप्त झाली आहे. त्याची व्याप्ती आगामी दशकात वाढतच जाणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा बोलबाला २०१८ पासून आहे; परंतु चॅटजीपीटी, बिंग आणि बार्डसारख्या चॅटबॉट्सच्या लोकप्रियतेमुळे त्यात रस वाढला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये, ओपन एआयने जगाला चॅटजीपीटीची ओळख करून दिली. हा नवीन चॅटबॉट पटकन पसरला आणि लोक त्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वापर करू लागले.

काही जण चॅटबॉटला निबंध आणि कविता लिहायला लावत होते, तर काही जण त्याला आशयाच्या कल्पना तयार करण्यास, लेख संपादित करण्यासाठी आणि काय काय कामे सांगत होते. चॅटबॉटला परीक्षांना देखील बसवले गेले. तो एमबीए आणि इतर विविध परीक्षा सहज उत्तीर्ण झाला.

या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सॉफ्टवेअर प्रोग्रामशी संवाद साधणे याला 'प्रॉम्प्ट' म्हणतात. प्रॉम्प्ट अभियांत्रिकी ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीसाठी प्रॉम्प्ट तयार करण्याची प्रक्रिया आहे. जनरेटिव्ह एआय (उदाहरणार्थ चॅट जीपीटी) शब्द एका क्रमानुसार समजते. प्रश्न कसे विचारायचे हीसुद्धा एक कला आहे. जर तुम्ही क्लिष्ट, असमान प्रश्न विचारत गेलात, तर तुम्हाला उत्तर पण तसेच क्लिष्ट मिळेल.

जागतिक तंत्र उद्योगांना अशा व्यावसायिकांची गरज असते जे यंत्राशी तर्कशुद्ध, मोजके बोलतील. त्याचबरोबर या क्षेत्रातील व्यावसायिक एआय चॅट बॉट्सना उत्तर कसे द्यायचे या विषयावर प्रशिक्षित करतील. अधिकाधिक जलद व तत्पर सेवा तयार करण्यासाठी आणि विद्यमान जनरेटिव्ह एआय साधनांमधून चांगले परिणाम मिळविण्यासाठी प्रॉम्प्ट अभियांत्रिकी आवश्यक आहे. जर आपण स्मार्ट वापरकर्ते झालात तर आपले आयुष्य अधिक सुखकर, परिणामकारक होईल.

दुर्दैवाने स्मार्ट संभाषण व संवाद (चॅट) साधणे ही एक कला आहे व अनेकांना हे अजिबात जमत नाही. त्यामुळेच त्यावर प्रशिक्षण हा एकमेव उपाय आहे. प्रगत देशात हे अनेक संस्थांनी अंतर्भूत केले आहे. लवकरच आपल्या देशातही होईल. येत्या दहा पंधरा वर्षांच्या काळात रोबो (यंत्रमानव) हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक बनेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सतत बदलत आहे. बदल समजून घेणे व आत्मसात करणे हे एक कठीण काम एकविसाव्या शतकात जन्मलेल्या पिढीला करावे लागणार आहे. deepak@deepakshikarpur.com
 

Web Title: how to ask chatbots the right questions learn it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.