शांघायची स्वप्नं पडणा-या मुंबईत मरण एवढं स्वस्त कसं झालं...?
By अतुल कुलकर्णी | Published: September 2, 2017 08:57 AM2017-09-02T08:57:59+5:302017-09-02T09:30:12+5:30
साधा जीव वाचवून या शहरातल्या रस्त्यावर चालता देखील येत नसेल तर कसल्या शांघायच्या गप्पा मारता...
मुंबईत घराबाहेर पडणारी व्यक्ती घरी सुखरुप परत येईल की नाही याची कोणतीही खात्री देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे हे शहर देत नाही. साधा जीव वाचवून या शहरातल्या रस्त्यावर चालता देखील येत नसेल तर कसल्या शांघायच्या गप्पा मारता...
देशभरात ख्याती असलेले पोटविकार तज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा एलफिन्स्टन येथे रस्त्यावर असणाऱ्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला आणि मुंबई शहरात पावलापावलावर कसा मृत्यू दबा धरुन बसला आहे याची प्रचिती आली. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना जी माहिती मिळाली ती त्यांनी आम्हाला सांगितली. ती सांगताना ते देखील अस्वस्थ होत होते. तेथे असणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीकडून त्यांच्यापर्यंत आलेली ही कहाणी अंगाचा थरकाप उडविणारी आहे.
डॉ. अमरापूरकर यांनी त्यांच्या पत्नीला फोन करुन मी घरी येतोय असे सांगितले. बराचवेळ झाला तरी डॉक्टर येत नाहीत हे पाहून त्यांच्या पत्नी त्यांना शोधण्यासाठी त्यांनी जो मार्ग सांगितला त्यामार्गाने निघाल्या. वाटेत एका दुकानाजवळ एक छत्री लटकवून ठेवलेली दिसली. त्याच्या जवळ एक इसम उभा होता. सौ. अंजली त्या छत्रीकडे धावल्या. त्यांनी छत्री ताब्यात घेताच त्याच्या जवळ उभा इसम त्यांना छत्री घेऊ देईना. त्यांनी ही छत्री माझ्या पतीची आहे. मी त्यांनाच शोधत आलीय... असे सांगताच त्या इसमाने त्यांचे पाय धरले, आणि म्हणाला, माफ करा, मी नाही वाचवू शकलो त्यांना... ते छत्री घेऊन रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जात होते. अचानक त्यांचा पाय मॅनहोलमध्ये गेला, मी जवळच होतो, ते आत जात असताना मी छत्री धरली... त्यांच्या हाती छत्रीचे एक टोक होते, मी छत्री खेचण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा वेग एवढा होता की ते मॅनहोलमधून वाहून गेले... कोणीतरी येईल, ही छत्री ओळखेल म्हणून मी येथे थांबलोय... असेही तो इसम म्हणाला... आणि
हे सगळे प्रचंड अस्वस्थ करणारे आणि मन सुन्न करणारे आहे. साधा नियम आहे, जेथे मॅनहोल उघडे केले जातात, तेथे लाल रंगाचा कपडा, मिळेल त्या काठीला, झाडाच्या फांदीला लावून तेथे ठेवला जातो. जेणे करुन कोणी त्यात पडणार नाही. मुंबईत हे नवे नाही. पण दिवसेंदिवस सगळ्यांचीच सार्वजनिक कामाविषयीची अनास्था एवढी पराकोटीची वाढली आहे की अशा उघड्या मॅनहोलजवळ लाल कपडा लावण्याचे सौजन्यही कोणाला दाखवावे वाटले नाही. हा फक्त माणुसकीचा भाग नाही तर ही वॉर्ड ऑफिसर आणि मॅनहोलची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचा भाग आहे. ज्यांनी कोणी स्वत:च्या कामात दुर्लक्ष केले आणि बेफिकीरी दाखवली त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल केला पाहिजे. मरण एवढं कसं काय स्वस्त होऊ शकतं...
हे असे घडल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना झोपा तरी कशा येऊ शकतात. आपल्या एका अत्यंत भिकारड्या चुकीमुळे देशभरात नावाजलेल्या एका डॉक्टराचा नाहक जीव गेल्याची महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला लाजही वाटली नाही. मुंबई पालिकेचे कर्मचारी अधिकारी असे कसे बेदरकार वागू शकतात. हे घडून गेल्यानंतर आजपर्यंत किमान त्या भागातल्या वॉर्डऑफीसरला कारणे दाखवा नोटीस द्यायला हवी होती. ज्यांच्याकडे हे मॅनहोल देखभालीची जबाबदारी होती त्याला नोकरीवरुन हाकलून द्यायला हवे होते पण असे काहीही घडले नाही.
अखेर त्यासाठी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका घेऊन फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन यांना उच्च न्यायालयात जावे लागले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशीही विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
पेव्हर ब्लॉक असोत की मॅनहोल, प्रत्येक गोष्टीत पैसे खाण्याची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतोखर वागण्यावर कोणाचाही अंकूश नाही. शिवसेना पक्षाच्या ताब्यात गेली अनेक वर्षे मुंबई महापालिका आहे. प्रत्येक गोष्ट स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीच जाऊन पहायला हवी असे नाही पण त्यांच्या आणि शिवसेनेच्या जीवावर निवडून आलेले नगरसेवक काय करतात. त्यांना याचे काहीच वाटत नाही का? एवढ्या वर्षानंतरही आम्ही मॅनहोल, कचरा, रस्त्यावरचे खड्डे हेच विषय आम्ही बोलायचे का? मुंबईचे शांघाय सोडून द्या, पण निदान मुलभूत गरजा तरी देण्यास आम्ही बांधील आहोत की नाही? कोणाकडे तरी याचा विचार आहे की नाही... अस्वस्थ प्रश्न आणि जीवाची घालमेल वाढविणाºया या घटना आहेत....