मुंबईत घड्याळ चालणार कसे?

By admin | Published: June 20, 2016 03:00 AM2016-06-20T03:00:00+5:302016-06-20T03:00:00+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचा १७ वा वर्धापनदिन मुंबईत साजरा झाला. स्वत:च्या पंच्याहत्तरीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षात जान आणण्याचे जोरदार प्रयत्न केले.

How to watch the clock in Mumbai? | मुंबईत घड्याळ चालणार कसे?

मुंबईत घड्याळ चालणार कसे?

Next

राष्ट्रवादी काँग्रेसचा १७ वा वर्धापनदिन मुंबईत साजरा झाला. स्वत:च्या पंच्याहत्तरीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षात जान आणण्याचे जोरदार प्रयत्न केले. ‘सोळावे वर्ष धोक्याचे’ होते, ते आता सरले असून पक्षापुढे कोणतेही धोके उरले नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केले. नेहमीप्रमाणे पवारांच्या बोलण्याचे अनेक अर्थ काढले जातात, तसे या विधानाचेही झाले. जलसंपदा विभागाच्या घोटाळ्यात अजित पवार, सुनील तटकरे अडकले आहेत. याच घोटाळ्यामुळे राज्यातली सत्ता गमावण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली होती. शिवाय छगन भुजबळांचे वाढत चाललेले ओबीसी राजकारण, शिवाय त्यांच्या घोटाळ्यांनी पक्षाच्या वाट्याला आलेला वाईटपणा यावरही मात करणे गरजेचे होते. या सगळ्यात अजित पवार आणि तटकरेंच्या बदल्यात भुजबळांवर कारवाई होणे पक्षहिताचे वाटले. भाजपालाही सत्तेत आल्यानंतर भुजबळांसारखा वजनदार नेता तुरुंगात घातल्याचे समाधान मिळाले आणि अजित पवार, तटकरे यांचा मार्ग मोकळा करून घेण्यात पवारांची मुत्सद्देगिरीही कामी आली. या अर्थानेच धोक्याचे सोळावे वर्ष सरल्याचे पवार बोलले, असा अर्थ त्यातून काढला गेला.
ही राजकीय गोळाबेरीज नेत्यांना तारून किंवा मारून जाईलही; पण स्थानिक पातळीवर पक्ष कसा आणि कोणी वाढवायचा असा सवाल कार्यकर्ते करत आहेत. भाजपाने खूप काही चांगले केले, म्हणून लोकानी त्यांना सत्ता दिली असे म्हणणे धाडसाचे होईल. काँग्रेस, राष्ट्रवादीने शेवटच्या काळात खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांची उणीदुणी काढली. राज्यात नकारात्मक वातावरण तयार केले. त्यामुळे हे दोघेही नको, असे चित्र त्यातून उभे राहिले. त्यामुळे भाजपाच्या सत्ता सोपानाचा मार्ग खुला झाला ही वस्तुस्थिती आहे. आपल्याच अशा वागण्याने आपल्यावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे, याचे पुरते भान सत्ता जाऊन पावणेदोन वर्षे झाली, तरीही दोन्ही काँग्रेसना आल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादीने गेल्या पावणेदोन वर्षांत लक्षात राहील, असे एकही राज्यव्यापी आंदोलन केले नाही. दुष्काळावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याच्या पलीकडे एकाही विषयावर सरकारला सळो की पळो केले नाही. प्रबळ विरोधी पक्ष कसा असावा, याचे कोणतेही चित्र राष्ट्रवादीने या काळात जनतेसमोर उभे केले नाही. आपण खूपच आक्रमक झालो, तर आपल्याही फाईली उघडल्या जातील, ही भीती त्यामागे आहे की काय कोणास ठाऊक! पण विरोधक म्हणून प्रभावीपणा काही केल्या राष्ट्रवादीला मांडता आलेला नाही. धनंजय मुंडे यांचा विधान परिषदेतला आक्रमकपणा सोडता पक्षाने गावपातळीपासून मुंबईपर्यंत स्वत:चे कोणतेही प्रखर आंदोलन करून सरकारला झुकण्याचे श्रेय घेतलेले नाही.
शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये होता होईल, तेवढी भांडणे लावायची आणि त्यातून त्यांचे बिनसलेच तर शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याची संधी निर्माण करायची, यापेक्षा वेगळे राजकारण करण्याची आज तरी राष्ट्रवादीची तयारी दिसत नाही.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचा बिगुल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वाजलेला पाहायला मिळेल, असे मुंबईत पक्षाची पाळेमुळे टिकवून ठेवलेल्या कार्यकर्त्यांना वाटत होते पण तसेही काही या कार्यक्रमातून घडले नाही. आपण ज्या भागात राहतो, त्या भागातील वॉर्ड सांभाळले आणि तेथे पक्षाला विजय मिळवून दिला तरी खूप झाले, अशी बोलकी प्रतिक्रिया पक्षाचा वाढदिवस साजरा होत असताना मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी बोलून दाखवली. यातच सगळे काही आले.
पक्षाचे जाळे नाही म्हटले तरी राज्यभर आहे, शैक्षणिक व सहकाराच्या संस्थात्मक उभारणीमुळे पक्षाकडे ग्रामीण भागात चांगले बळ आहे. पण जोपर्यंत मुंबईत पक्ष वाढत नाही, तोपर्यंत त्याला म्हणावा तसा चेहरा येत नाही. ही वस्तुस्थिती असताना मुंबई पक्ष कसा वाढवायचा याचा विचार आजतरी कोणी करताना दिसत नाही. गेल्या दोन वर्षांत मुंबईत झालेल्या पक्षाच्या एकाही कार्यक्रमाला अजित पवार यांनी उत्साही उपस्थिती दाखवलेली नाही. हा एवढा एकच दाखला पक्ष मुंबईकडे कशा पध्दतीने पाहतो हे सांगण्यास पुरेसा ठरावा...
- अतुल कुलकर्णी

Web Title: How to watch the clock in Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.