उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस ही भूमिका कशी कळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 06:41 AM2024-02-09T06:41:21+5:302024-02-09T06:41:53+5:30
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांना ‘विद्रोही’च्या तंबूतून बाहेर काढल्याच्या बातम्या आल्या. विद्रोही साहित्य संमेलनात नेमके काय झाले?
प्रा. डॉ. लीलाधर पाटील
अमळनेर येथे १८वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन ३ व ४ फेब्रुवारी रोजी साहित्यिक आणि रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांना ‘विद्रोही’च्या तंबूतून बाहेर काढल्याचे, धक्काबुक्की केल्याचे किंवा हाकलून दिल्याचे वृत्त प्रसारित झाले. त्या पार्श्वभूमीवर नेमके काय घडले, हे जाणून घेतले पाहिजे.
मानवी प्रतिकृतीच्या तोंडाला लावलेली पट्टी व पेनाला लावलेली साखळी तोडून विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांनी मुख्य मानली जाणारी साहित्याची विचारधारा कशी ब्राह्मणी, पुरुषसत्ताक आणि भांडवली आहे, याचे स्वरूप आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले. ‘भुरा’ या प्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांनी केलेली विद्रोहाची मांडणी, ‘बोलीभाषा, अभिव्यक्ती सौंदर्य आणि विद्रोह’ या परिसंवादात विविध भाषांची चर्चा, ‘अघोषित आणीबाणीच्या घेऱ्यात जीव गुदमरत असताना शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू,’ हा परिसंवाद असे कार्यक्रम रंगले. श्रोत्यांची गर्दी होती. विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष दिवंगत जयंत पवार यांच्या कथांचे अभिवाचन, नाट्यरूपांतर, त्यानंतर काव्यसंमेलन झाले.
तंबूतन हाकलणे : नक्की काय घडले?
रवींद्र शोभणे आले, त्यापूर्वी सभामंडपात तेरा विषयांवरील गटचर्चांचा सारांश मांडला जात होता. त्याआधी जे मान्यवर आले, त्यांनी येताना मंडपाच्या उजव्या बाजूला असलेल्या लॉबीचा वापर केला. आयोजकांनीदेखील अत्यंत सन्मानाने त्यांची व्यवस्था केली. रवींद्र शोभणे यांनी मात्र एखाद्या राजकीय नेत्याला शोभावी अशी एंट्री घेतली आणि ते सभामंडपाच्या मध्यभागातून वीस-पंचवीस लोकांचा घोळका घेऊन आजूबाजूच्यांना हात करीत चालत आले. वासुदेव मुलाटे यांच्यापर्यंत पोहोचले. मुलाटे यांनी त्यांच्याशी गळाभेट घेतली. विचारपीठावर एकदम गर्दी झाली म्हणून मी म्हटले की, ‘मागे खुर्च्या रिकाम्या नाहीत, तिथे बसलेल्या लोकांना व्यत्यय येतो आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी समोरून बाजूला व्हा!’ विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांनीही सगळ्यांना बाजूला होण्याची विनंती केली. मंडपातून हाकलण्याची नाही! ‘चला चला, येथून बाजूला व्हा,’ असे सांगत बाहेर आलेल्या शोभणे यांना नंतर बळीराजा अन्नशिवारात नेऊन निमंत्रक रणजित शिंदे यांनी मिठाई खाऊ घातली.
यापूर्वीही, वर्धा येथील साहित्य संमेलनाच्या वेळी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात आले होते. मुख्य संयोजकांशी रीतसर संपर्क साधून त्यांची येण्याची पद्धत एखाद्या वरिष्ठ, सभ्य साहित्यिकाला शोभावी अशी होती. त्यांचा विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंडपात सन्मानच झाला. याच प्रकाराची ‘कॉपी’ करत रवींद्र शोभणे विद्रोहीच्या मंडपात आले खरे; पण त्यांची पद्धत मात्र अशोभनीय होती. ज्या वैचारिक पायावर विद्रोही मराठी साहित्य संमेलन उभे आहे, त्या महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेल्या एका पत्रात ‘उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस व मोठमोठ्या सभास्थानी आगंतुक भाषण करणाऱ्यांस ही भूमिका कोठून कळणार?’ हा सवाल उपस्थित केला होता, तो आजही लागू होतो.
नंतर काय घडले?
या गोंधळानंतरही कार्यक्रम सुरूच राहिले. निरंजन टकले यांच्या ‘असत्याबद्दल सत्यकथा’ या विशेष व्याख्यानावेळी अनेक श्रोत्यांना खुर्ची मिळाली नाही, इतकी गर्दी होती. ‘धर्मसंस्कृतीचे समतावादी प्रवाह’ आणि ‘कोण जात्यात, कोण सुपात?’ या दोन महत्त्वाच्या चर्चांनंतर विचारपीठावरून तीन ‘रॅप साँग्ज’ सादर झाली. आठ विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विचार मांडले. गझलगायन, मंटोच्या कथांचे सादरीकरण झाले. समारोपात ‘सत्यशोधक मार्गाने जाण्याची गरज’ मांडणारे प्रवीण गायकवाड, अभिनेते किरण माने यांनी महत्त्वाची मांडणी केली.
- हा तपशील का सांगितला? विद्रोही संमेलनात विविध विषयांवर झालेल्या गंभीर चर्चा, सशक्त अभिव्यक्तीकडे दुर्लक्ष करत, केवळ शोभणे यांना हाकलून लावल्याची विपर्यस्त मांडणी माध्यमांनी केली म्हणून!
या गोंधळापूर्वी अखिल भारतीय साहित्य संमेलनातील रिकाम्या खुर्च्या, कंटाळवाणी भाषणे आणि पुस्तकांची न झालेली विक्री यांवरच चर्चा सुरू होती. हे अपयश लपविण्यासाठी केलेला हा ‘स्क्रिप्टेड ड्रामा’ होता की काय, अशी शंका यायला पुरेसा वाव आहे.
(लेखक विद्रोही मराठी साहित्य संमेलन, अमळनेरचे मुख्य संयोजक, आहेत)