... या थरारक रहस्यांचा उलगडा कसा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 09:22 AM2023-03-23T09:22:23+5:302023-03-23T09:22:55+5:30

गुप्तचर आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अमृतपाल सिंग फरार; डॉ. किरण पटेल या महाठकाने पंतप्रधान कार्यालयालाही पकडले पेचात!

... How will these thrilling mysteries be unraveled? | ... या थरारक रहस्यांचा उलगडा कसा होणार?

... या थरारक रहस्यांचा उलगडा कसा होणार?

googlenewsNext

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

हा मार्च महिना कधी नव्हे इतका रहस्यमय होत गेला खरा. पंजाबचा २९ वर्षीय स्वयंघोषित धर्मगुरू अमृतपाल सिंग अहोरात्र पहारा असताना पळून गेल्यामुळे पंजाब सरकार आणि सुरक्षा तसेच गुप्तचर यंत्रणा सुन्न झाल्या आहेत. अमृतपाल सिंग याचे कॅनडा, ब्रिटन आणि इतरत्र असलेल्या खलिस्तानी बंडखोरांशी तसेच ‘शीख फॉर जस्टिस’ आणि पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या अमेरिकेतील जॉर्जियास्थित शाखेशी संबंध आहेत, याविषयी रिसर्च ॲनॅलिसिस विंग तथा ‘रॉ’ने पंजाब सरकार तसेच मोदी सरकारला सावध केले होते. केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांनी ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेवर छापे मारण्याचे ठरवले. 

अमृतपाल सिंग हा या संघटनेचा प्रमुख. इंदिरा गांधींचे झाले ते तुमचे होईल अशी उघड धमकी अमृतपाल सिंगने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली. त्यानंतर बैसाखीपूर्वी छापे मारण्याचे ठरले. अमृतपाल इतक्या कडेकोट वेढ्यातून कसा निसटला हे अजूनही गूढ आहे. पंजाबचे ८० हजार पोलिस आणि केंद्रीय गुप्तचरांची करडी नजर त्याच्यावर होती. गेल्या काही वर्षांत सुमारे ५० च्या घरात दहशतवादी केंद्रांचा बुरखा फाडला गेला; तरी दहशतवादी गट पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानी चळवळ पुनरुज्जीवित करण्यात यशस्वी झाले. 

२०२२ च्या सप्टेंबरमध्ये अमृतपाल भारतात आला. त्यावेळी पाकिस्तान सीमेपलीकडून ड्रोनच्या मदतीने सीमोल्लंघनाचे अनेक प्रयत्न झाले होते. राज्यात शस्त्रांसंबंधीच्या घटना वेगाने वाढल्या होत्या. अमृतपालची आनंदपूर खालसा फौज ही संघटना शस्त्रास्त्रे जमवत आहे. सुवर्ण मंदिराचा ताबा घेण्यासाठी भिंद्रनवाले यांच्या मार्गाने ही संघटना चालली असल्याच्या बातम्या आहेत. पंजाब, दिल्ली आणि इतरत्रही काही गुरुद्वारांवर अमृतपालच्या साथीदारांनी ताबा मिळवला असल्याचे सांगतात. तो गायब होऊ शकला याचा सरळ अर्थ राज्य आणि केंद्रीय दलांच्या तो एक पाऊल पुढे आहे. वास्तविक, अमृतपाल सिंग याला अटक करण्यात आली आहे; परंतु डावपेचांचा भाग म्हणून ही बातमी अत्यंत गुप्त राखण्यात आली आहे, अशीही एक चर्चा आहेच. 

रहस्यपूर्ण महाठक 
पंतप्रधानांच्या कार्यालयातील धोरण आणि मोहिमा विभागाचे अतिरिक्त संचालक या नावाखाली डॉ. किरण जे. पटेल या गुजराती महाठकाने काश्मीरमध्ये जे प्रताप केले त्याचा तपशील धक्कादायक आहे. त्याला  झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, शिवाय सरकारी खर्चाने त्याने पंचतारांकित हॉटेल्समध्ये  पाहुणचार झोडला.  सुरक्षादृष्ट्या अत्यंत प्रतिबंधित अशा भागात त्याचा गेले कित्येक महिने वावर होता. या सगळ्या घटनाक्रमाचा पंतप्रधानांचे कार्यालय तसेच जम्मू आणि काश्मीर प्रशासनाला चांगलाच धक्का बसला आहे. 

अखेरीस, ३ मार्चला या महाठकाला अटक झाली, तेव्हा त्याचे भांडे फुटले. सुरक्षा यंत्रणेतील उणिवांचे मात्र यामुळे वाभाडे निघाले.  एका सनदी अधिकाऱ्याने या महाठकाची पंतप्रधानांच्या कार्यालयातील जम्मू-काश्मीरशी संबंधित अधिकारी म्हणून ओळख करून दिली होती, अशी सध्या चर्चा आहे. गुजरातमधल्या पाच ते सहा बड्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. केंद्रशासित प्रदेशात तो जमिनीसंबंधी काही व्यवहार करण्यास आला आहे, असे त्यांना वाटले. किरण पटेल २७ ऑक्टोबरला पहिल्यांदा  जम्मू-काश्मीरमध्ये आला आणि त्यानंतर सहा महिने तो तेथे राहिला. त्याला झेड दर्जाची सुरक्षा कशी दिली गेली याविषयी पंतप्रधानांच्या कार्यालयातील अधिकारी अजूनही गोंधळात आहेत. त्याच्या ओळखीची खातरजमा कुणीही न केल्याने पंचतारांकित हॉटेलमध्येही त्याने पाहुणचार घेतला. हा महाठक उद्योग आणि नोकरशाहीतील काही हितसंबंधितांसाठी काम करीत होता हेही आता उघड झाले असून, येत्या काही दिवसांत छापेमारी होण्याची शक्यता आहे.

महुआच्या डिलीट ट्वीटचे रहस्य
तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील अग्निशिखा खासदार महुआ मोईत्रा यांना त्यांनी केलेले एक ट्वीट सात तासांच्या आत डिलीट करावे लागले.  ममता बॅनर्जी मोदी सरकारशी दोन हात करायला तयार नाहीत, असा त्याचा अर्थ सध्या लावला जात आहे. सभापती ओम बिर्ला हे फक्त भाजपच्या मंत्र्यांना बोलण्याची अनुमती देतात, विरोधी खासदारांना बोलू देत नाहीत; परिणामी, लोकशाहीच धोक्यात आली आहे, असे ट्वीट महुआ मोइत्रा यांनी केले होते. या ट्वीटसाठी आपण तुरुंगात जायला तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले होते. परंतु हे कडक शब्दांतले ट्वीट सहा तासांच्या आत गायब झाले. ममता बॅनर्जी यांनी त्यांना ते मागे घ्यायला सांगितले, असे नंतर समजले. 
गमतीची गोष्ट अशी की तृणमूल काँग्रेस संसदेतील विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकांपासून दूर राहत आहे. त्यामुळे या पक्षाचा भाजपशी मूक समझोता झाला असल्याच्या शंकेला एका अर्थी दुजोराच मिळतो.

Web Title: ... How will these thrilling mysteries be unraveled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.