हुच्च स्वामी आणि संशयित थरुर
By admin | Published: January 13, 2015 02:06 AM2015-01-13T02:06:39+5:302015-01-13T02:40:30+5:30
स्वत:च्या कर्तृत्वाने मोठे होणे जमले नाही की काही माणसे त्यासाठी परनिंदेची कास धरतात. तेवढ्याखातर यशस्वी व प्रसिद्ध व्यक्तींचे दोष दाखविण्याची व त्यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी मग ते सोडत नाहीत
स्वत:च्या कर्तृत्वाने मोठे होणे जमले नाही की काही माणसे त्यासाठी परनिंदेची कास धरतात. तेवढ्याखातर यशस्वी व प्रसिद्ध व्यक्तींचे दोष दाखविण्याची व त्यांचा पाणउतारा करण्याची एकही संधी मग ते सोडत नाहीत. अशा संधीबाज इसमात सुब्रमण्यम स्वामी या बोलभांड इसमाचा क्रमांक फार वर लागणारा आहे. अर्थशास्त्राचा महातज्ज्ञ म्हणून रा.स्व. संघाने एकेकाळी गौरविलेले हे स्वामी प्रथम जनसंघात व पुढे भारतीय जनता पक्षात त्यांना हवे ते स्थान न मिळाल्यामुळे अस्वस्थ बनले आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर उखडले. सर्वमान्य होऊ पाहणाऱ्या त्या नेत्यात इतरांना न दिसणारे दोष मग ते दाखवू लागले. १९७७ मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाईंच्या जनता सरकारात वाजपेयी व अडवाणी मंत्री बनले तेव्हा विदर्भात भरलेल्या जनता पक्षाच्या एका मोठ्या मेळाव्यात ‘मोरारजींचे मंत्रिमंडळ दारुड्यांनी भरले असल्याचे’ जाहीर करून या स्वामींनी त्या मेळाव्याला मिळणारी सारी प्रसिद्धी स्वत:कडे ओढवून घेतली. नंतरच्या काळात कधी इंदिरा गांधी, कधी मोरारजी देसाई, कधी चंद्रशेखर आणि ते नच सापडले तर पुन्हा वाजपेयी अशांवर ते आग पाखडत राहिले. संसदेतले त्यांचे स्थान गेले तेव्हा त्यांनी जयललितांना धरले आणि करुणानिधींच्या पक्षावर आग ओकणे सुरू केले. पुढे जयललितांशी तुटले तेव्हा त्यांनाही या स्वामींनी आपल्या टीकेचे लक्ष्य बनविले. कोणतेही विधायक काम नाही, कामाची कसलीही जबाबदारी नाही आणि कोणतीही जोखीम पत्करायची तयारी नाही. एकटे रहायचे, एकट्याचाच पक्ष काढायचा, मग आपणच अध्यक्ष, आपणच सचिव आणि आपणच त्याचे प्रवक्ते होऊन दिसेल त्याच्यावर टीकास्त्र सोडत रहायचे. या एकाच उद्योगात या स्वामींनी गेली चाळीस वर्षे घालविली. आज ते भाजपात आहेत पण त्या पक्षात त्यांना कोणी फारसे विचारताना वा विश्वासात घेताना दिसत नाही. अशी माणसे मग दुबळी व निराधार लक्ष्ये शोधतात. स्वामींचे आताचे लक्ष्य शशी थरुर हे आहे. शशी थरुर हे एकेकाळी युनोत होते. त्याच्या महासचिवपदाची निवडणूक लढविण्यापर्यंतची मजल त्यांनी गाठली होती. भाषा व लेखन यांच्या बळावर चाहत्यांचा एक वर्गही त्यांनी जमविला होता. पण ते करताना ‘प्ले बॉय’ ही आपली प्रतिमाही त्यांनी जोपासली होती. अशी माणसे राजकारणात फार लवकर ‘लक्ष्य’ बनतात आणि स्वामीसारख्या रिकाम्या शिकाऱ्याला ती अलगद सापडतात. थरुर हे थिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार आहेत आणि खासदार असताना त्यांनी सुनंदा पुष्कर या बहुचर्चित व देखण्या स्त्रीशी दुसरा विवाह केला आहे. (सुनंदा पुष्करचे वर्णन खुद्द मोदींनीही सहा कोटींची बायको असा एकदा केला आहे). सुनंदाचेही हे दुसरे लग्न आहे. लग्नानंतरचा काही काळ त्या दोघांची सर्वत्र बागडणारी छायाचित्रे वृत्तपत्रांनी प्रकाशीतही केली आणि अचानक एक दिवस सुनंदाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले व त्या भोवती पहिल्या दिवसापासून एक संशयाचे गूढ उभे राहिले. चौकशा झाल्या, यंत्रणा कामी लागल्या पण बरेच दिवस त्यातून काही निष्पन्न झाले नाही आणि आता काँग्रेसच्या या खासदाराभोवतीचे गूढ आणखी गडद व संशयास्पद करायला सुब्रमण्यम स्वामी पुढे सरसावले आहेत. ‘सुनंदाचा खून झाला आहे, शशी थरुरांनी तो केला नसला तरी खून करणारा कोण ते थरुरांना ठाऊक आहे’ असे पोलीस यंत्रणेलाही पार चक्रावून टाकणारे विधान त्यांनी जाहीरपणे केले आहे. परिणामी सुनंदा उजेडात, थरुर संशयाच्या अंधारात आणि स्वामी पुन्हा प्रकाशाच्या झोतात आले आहेत. सुनंदा पुष्कर ही तिच्या मृत्यूआधी दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलात बराच काळ नृत्य करीत होती असा वृत्तांत शोभा डे या स्तंभलेखिकेने नुकताच प्रकाशीत केला. त्यामुळे सुनंदाने आत्महत्या केली, तिचा खून झाला की आकस्मिक मृत्यू याविषयीचे कोडे अधिकच पेचदार झाले आहे. तिच्या देहाच्या, व्हिसेराच्या तपासण्या देशात आणि विदेशात सुरू आहेत. मात्र स्वामी याही तपासात साऱ्यात पुढे आहेत. पोलीस बोलत नाहीत, तपासण्या करणारे गप्प आहेत, सरकार काही बोलायला तयार नाही आणि स्वामींच्या जिभेला मात्र आवर नाही. सुनंदाचा खून झाला हे पक्केपणी जर त्यांना ठाऊक असेल तर त्याविषयीची सप्रमाण माहिती त्यांनी पोलिसांना दिली पाहिजे. तिचा खून कोणी केला हे थरुरांना ठाऊक आहे असे ते म्हणत असतील तर त्याचेही स्पष्टीकरण त्यांनी चौकशी यंत्रणांजवळ दिले पाहिजे. यातले काहीही न करता केवळ प्रसिद्धीमाध्यमांजवळ आपल्या मनातील शंका प्रमाणित सत्यासारख्या बोलून दाखविण्याचा त्यांचा उपक्रम त्यांच्या आजवरच्या इतिहासाशी ताडून पाहता येणारा व प्रसिद्धीसाठी हा इसम काहीही करू शकतो हे सिद्ध करणारा आहे असाच आहे. शशी थरुर या अपराधात दोषी असतील तर कायद्याने त्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे व योग्य ती शिक्षाही केली पाहिजे. त्या स्थितीत कोणताही शहाणा माणूस थरूर यांची बाजू घेणार नाही. मात्र तपासाला सुरुवात होण्याआधीच तपास यंत्रणांना बाजूला सारून एखादा स्वामी स्वत:च साऱ्या प्रकरणाचा खून असा निकाल लावीत असेल आणि त्यातल्या संशयितावर शिक्कामोर्तब करण्याचा आव आणत असेल तर ती कायद्याच्या मार्गातील अडसर ठरणारी बाब आहे.