‘प्रचंड’

By admin | Published: December 12, 2015 12:06 AM2015-12-12T00:06:36+5:302015-12-12T00:06:36+5:30

अंगभूत सकस नेतृत्त्वगुण आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या युगपुरूषाचा वरदहस्त यांचा परिपाक म्हणजे शरद पवार नावाचे प्रचंड क्षमता असलेले राजकीय रसायन!

'Huge' | ‘प्रचंड’

‘प्रचंड’

Next

अंगभूत सकस नेतृत्त्वगुण आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या युगपुरूषाचा वरदहस्त यांचा परिपाक म्हणजे शरद पवार नावाचे प्रचंड क्षमता असलेले राजकीय रसायन!
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले, त्यावेळी पुणे येथे विद्यार्थी दशेत असलेल्या शरद पवारांचे नेतृत्त्व गुण आणि संघटना कौशल्य महाराष्ट्राच्या आणि ज्यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील कॉँग्रेसचा कारभार चालत असे अशा यशवंतराव चव्हाणांच्या लक्षात आले. १९६७ साली त्यांनीच पारंपरिक मातब्बरांना डावलून शरदरावांना बारामतीतून विधानसभेची उमेदवारी देण्याची जोखीम उचलली. एका बाजूला साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे चेअरमन, विद्यमान आमदार व ज्या मराठा कुटुंबाचा बारामती परिसरात परंपरेने जम बसलेला त्या काकडे कुटुंबातला उमेदवार तर दुसऱ्या बाजूला कॉँग्रेसची पुण्याई आणि यशवंतरावांचे आशीर्वाद लाभलेले शरदरावांचे उदयोन्मुख नेतृत्त्व. पवार प्रचंड मतांनी निवडून आले. सहकार क्षेत्रातील साऱ्यांना व विशेषत: पुणे जिल्ह्यातील कॉँग्रेसजनांना तो धक्काच होता. या विजयातून कॉँग्रेस नेतृत्त्वासाठी एक सूत्र विकसित झाले. ‘सहकारी क्षेत्रात पकड असलेल्याच उमेदवारी दिली पाहिजे अन्यथा पराभव अटळ’, या न्यूनगंडातून महाराष्ट्र पातळीवरचे कॉँग्रेस नेते बाहेर पडले. याच सूत्राचा वापर करून पुढे सहकार क्षेत्रातील मातब्बरांची महाराष्ट्र कॉँग्रेस, या व्याख्येतून महाराष्ट्र कॉँग्रेसही बाहेर पडली.
१९६२ साली उदयास आलेले हे नेतृत्त्व आज देश पातळीवर आपल्या राजकीय अस्तित्त्वाच्या खुणा भक्कमपणे रोवून उभे आहे. १९६२ ते २०१५ म्हणजे तब्बल ५३ वर्षांचा हा कालखंड आहे. या काळात कधी राष्ट्रीय कॉँग्रेस तर कधी स्वत:ची कॉँग्रेस असा त्यांचा पक्षीय प्रवास राहिला आहे. कधी ते असलेला पक्ष महाराष्ट्रात आणि देशात सत्तेत होता तर कधी नव्हता. परंतु स्वत: शरदराव विधिमंडळ वा संसदेचे सदस्य नाहीत असा कालखंड नाही. म्हणजे गेली पन्नास वर्षे ते सतत सत्तेत आहेत. विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, अशा एकूण चौदा निवडणुका त्यांनी लढवल्या व प्रत्येकवेळी निवडून आले. हा अपघातही नाही आणि योगायोगही नाही. ही आहे त्यांच्या कर्तृत्वाला महाराष्ट्राने दिलेली सलामी.
त्यांच्या वक्तृत्त्व शैलीविषयी मी आणि राम कापसे एकदा बोलत होतो. रामभाऊ म्हणाले, पवार बोलतात तेव्हां ते जनमानसात थेट पोहचते आणि आपल्या मनातले श्रोत्यांच्या मनात पोचविणे हाच खरा सभांचा हेतू असतो. या निकषानुसार पवार उत्तम वक्ते आहेत. गर्दीच्या संख्येचा किंवा सभागृहातील वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही वा भाषेचे दडपणही येत नाही. १९६७ साली असेंब्लीतील पहिलेच भाषण ते जेवढ्या सहजतेने करतात तेवढ्याच सहजतेने ते पार्लमेंटमधले पहिले आणि इंग्रजीतील भाषणही करतात. ते शेक्सपियरियन किंवा व्हिक्टोरियन असण्याची गरज नाही. त्यांच्या मनातले देशभरातील खासदारांच्या मनात पोचवितात हेच पुरेसे आहे. ते राजकीय नेते आहेत, भाषाशास्त्री नव्हेत.
राजकीय भूमिका आणि वैयक्तिक मैत्री असे त्यांच्या मनाचे दोन कप्पे आहेत आणि त्याची ते कधीही सरमिसळ होऊ देत नाहीत. म्हणूनच हमीद दलवार्इंसारखा एखदा पुरोगामी चळवळीतला नेता किडनीचा आजार बळावला असताना मृत्यूपूर्वी वर्षभर त्यांच्या घरी राहू शकतो. बापू काळदाते, एसेम जोशी त्यांच्याकडे थांबू शकत. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला शिक्षणासाठी काही काळ मुंबईला कॉलेजात होते तेव्हा ते राहायला हॉस्टेलमध्ये नव्हे तर पवारांच्या घरी होते. मी ही सुरवातीपासून त्यांच्याच घरी उतरतो. एकदा त्यांना कॉँग्रेस पक्षातून काढल्यानंतर मी दिल्लीला महाराष्ट्र सदनात उतरलो. शरदरावांना हे समजले, ते स्वत: गाडी घेऊन महाराष्ट्र सदनात आले आणि मला म्हणाले बॅग गाडीत टाका आणि घरी चला. मी मुकाट्याने बॅग गाडीत टाकली आणि निघालो. अशी मैत्री आणि धाक. घरी येणाऱ्यांचे प्रतिभा वहिनींनाही अगत्य असते.
त्यांचा गामा नावाचा ड्रायव्हर १९६५ सालापासून त्यांच्यासोबत आहे. राजकीय सहकारी वा कुटुंबियांपेक्षा ड्रायव्हर अधिक घटनांचा व गुपितांचा साक्षीदार असतो. ‘अरे गामा, साहेब आणि तू आता नाशिकला आलात ते मुंबईहून की पुण्याहून’ या प्रश्नाचे उत्तरही तो ‘साहेबांना विचारा’ असे देतो. आता मी त्याला विचारणेच बंद केले आहे. धनाजी जाधव, विठ्ठल मणियार, चंदू चोरडिया, अजीत गुलाबचंद, डॉ. रवी बापट, माधवराव आपटे, सायरस पूनावाला, राहुल बजाज, श्रीनिवास पाटील, कर्नल पाटील, बालेंद्र अग्रवाल सगळे आणि असे अनेक गामाच्या लाईनीतले. त्यांना साहेब माहीत असतात, परंतु साहेबांचे काहीच माहीत नसते. एवढी व्यक्तिनिष्ठ निष्ठा येते कोठून? त्याचे श्रेय पवारांच्या व्यक्तिमत्त्वाला जाते.
मीदेखील गेली पन्नास वर्षे त्यांच्या व्यक्तिगत मित्रमेळाव्यात आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे जेवढे वर्णन करू तेवढे अपुरेच आहे. परंतु एकाच शब्दात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन शक्य आहे आणि तो शब्द म्हणजे ‘प्रचंड’.
- विनायक पाटील
(‘पुलोद’ सरकारमधील राज्यमंत्री)

Web Title: 'Huge'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.