अन्नाची प्रचंड नासाडी होत असल्यानं लोकांनी काय खावे यापेक्षा ‘कसे खावे’ हे ठरवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:46 PM2017-10-22T23:46:19+5:302017-10-22T23:46:29+5:30

लोकांनी काय खावे आणि किती खावे हा ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर ना सरकार निर्बंध आणू शकते ना न्यायालये त्याबाबत कोणते दिशानिर्देश देऊ शकतात.

With the huge devastation of food, people should decide 'how to eat' rather than what they eat | अन्नाची प्रचंड नासाडी होत असल्यानं लोकांनी काय खावे यापेक्षा ‘कसे खावे’ हे ठरवावे

अन्नाची प्रचंड नासाडी होत असल्यानं लोकांनी काय खावे यापेक्षा ‘कसे खावे’ हे ठरवावे

Next

लोकांनी काय खावे आणि किती खावे हा ज्याचा, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर ना सरकार निर्बंध आणू शकते ना न्यायालये त्याबाबत कोणते दिशानिर्देश देऊ शकतात. पण आज देशात किंबहुना जगभरातच अन्नाची जी प्रचंड नासाडी होत आहे ती पाहू जाता लोकांनी काय खावे यापेक्षा ‘कसे खावे’ हे सांगण्याची वेळ आली आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. अन्नाची नासाडी हा संपूर्ण जगाच्या चिंतेचा विषय राहिला आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था नियमितपणे सर्वेक्षण करून आपल्या अहवालातून अन्न नासाडीबद्दल चिंता करीत असतात. पण कुठेही याबाबत जागृती झाल्याचे दिसून येत नाही. नागपुरात यासंदर्भात नुकत्याच झालेल्या एका पाहणीत रोज सात लाख टन अन्न वाया जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ३० लाखांच्या या शहरात रोज एवढ्या अन्नाची नासाडी होत असेल तर संपूर्ण भारताची स्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येतो. २०१५ मध्ये झालेल्या एका पाहणीत आपल्या देशात दरवर्षी एक लाख कोटी रुपयांच्या अन्नाची नासाडी होत असल्याचे निष्पन्न झाले. युरोप आणि उत्तर अमेरिका अन्न नासाडीत आघाडीवर असले तरी भारतासारख्या विकसनशील देशात, जेथे लाखो लोक उपासमार किंवा एकवेळच्या जेवणावर जगतात, लाखो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहेत तेथे अशी अन्ननासाडी होणे हा मोठा सामाजिक गुन्हा मानला पाहिजे. आज देशाची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागते दुसरीकडे लाखो टन अन्न नाल्यात फेकले जाते. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे. लग्नकार्य, पार्ट्या, सार्वजनिक उत्सव, पारिवारिक समारंभ, हॉटेलिंग ही या नासाडीची प्रमुख केंद्रे आहेत. पूर्वी लग्नकार्यात खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही पंगती उठायच्या. जेवणाचा आग्रहही व्हायचा पण पत्रावळीत उरलेले अन्न मांडवासमोर जमलेल्या गरिबांना वाटले जायचे. गावाबाहेरच्या कुडाच्या झोपड्यात राहणारे सारे जणू लग्नाला यायचे. या निमित्ताने गरीब गोडधोड खाऊन तृप्त व्हायचे. वधू-वराला तोंडभरून आशीर्वाद द्यायचे. पण आताशा पंगत हा प्रकार लोकांना मागास वाटू लागला. पंगतीत अन्न वाया जाते अशी सबब पुढे करून लोकांनी बुफे संस्कृती डोक्यावर घेतली. पण झाले उलटेच. पंगतीच्या तुलनेत बुफेमध्ये कितीतरी पटीने जास्त खाद्यान्नाची नासाडी होऊ लागली. उच्चभ्रू लोकांचे ठीक पण सर्वसामान्यांत अजूनही बुफे रुळला नाही ही वस्तुस्थिती आहे. प्लेटमध्ये सुरुवातीलाच भरपूर पदार्थ घ्यावेत आणि भूक शमली की उरलेले अन्न टाकून द्यावे, असे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. हॉटेल, रेस्टॉरंटमधील स्थितीही वेगळी नाही. लोकांत हॉटेलिंगचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. संपूर्ण फॅमिली घेऊन हॉटेलात खाणे आता स्टेटस सिम्बॉल बनले आहे. अर्थात कुणी कुठे खावे हा पुन्हा ज्याच्या, त्याच्या ऐपतीचा प्रश्न आहे. पण हॉटेलात भरमसाट पदार्थ मागवून नंतर अर्धेअधिक जिन्नस तसेच टाकून उठणेही प्रतिष्ठेचे मानले जात आहे. हे उरलेले अन्न एकतर नाल्यात फेकून दिले जाते किंवा त्याची कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. ‘आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रह्म’ मानले जाते. आजही आपली वृद्ध मंडळी ताटातील सर्व पदार्थांचा एक घास बाजूला काढून त्याला नमन केल्यावरच जेवायला सुरुवात करतात. आजची ही अन्ननासाडी या परंपरेला छेद देणारी तर आहेच पण रोज अर्धपोटी झोपणाºया गोरगरिबांची आणि सकस आहाराअभावी कुपोषणाला बळी पडणाºया देशातील लक्षावधी बालकांची क्रूर चेष्टा नव्हे का?

Web Title: With the huge devastation of food, people should decide 'how to eat' rather than what they eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न