‘हम दो, हमारे दो’ आमचे; १२३ अनाथांचे कुटुंब त्यांचे !
By गजानन दिवाण | Updated: January 12, 2025 09:19 IST2025-01-12T09:19:35+5:302025-01-12T09:19:35+5:30
समाजदूत: सध्या बालग्राममध्ये १०७ आणि युवाग्राममध्ये १६, असे १२३ मुलांचे कुटुंब संतोष-प्रीती सांभाळत आहेत.

‘हम दो, हमारे दो’ आमचे; १२३ अनाथांचे कुटुंब त्यांचे !
- गजानन दिवाण, सहायक संपादक
‘हम दो, हमारे दो’ असे चौघांचे कुटुंब सांभाळणे कठीण. त्यांच्यासाठीच अख्खे आयुष्य आपण खर्ची घालतो. ज्यांना आई-बाप किंवा रक्तातील नात्याचे कोणीच नाही, अशा अनाथांचे काय? त्यांना कोण सांभाळणार? ती जबाबदारी उचलली संतोष आणि प्रीती गर्जे, या तरुण दामप्त्याने. लहान-मोठे १२३ जणांचे हे कुटुंब. बीड जिल्ह्यातील गेवराईजवळ ‘बालग्राम’ नावाने हे माणुसकीचे गाव वसले आहे.
बीड जिल्हा सध्या गाजतोय तो वेगळ्याच कारणाने. बीड नव्हे, तर बिहार असेही बोलले जात आहे; पण हीच या जिल्ह्याची ओळख नाही. आदराने झुकून आपला माथा टेकवावा, अशी माणसे भेटतात तीही याच जिल्ह्यात. बालग्रामचे संतोष-प्रीती गर्जे हे बीडचेच. बीड जिल्ह्यातील पाटसरा हे संतोषचे गाव (ता. आष्टी). शेती कमी, तीही कोरडवाहू. तीन भाऊ, तीन बहिणी आणि आई-वडील, असे आठ जणांचे कुटुंब. कसे भागेल? ऊसतोड करून आई-बाबाने वाढवले. संतोष १८ वर्षांचा असतानाच लग्न झालेली मोठी बहीण बाळंतपणात मरण पावली. तिच्या मुलीला आई-बाबाने घरी आणले. बहिणीच्या नवऱ्याने चिमुकल्या पोरीचा विचार न करता दुसरे लग्न केले. मुलीला पाहायलाही आला नाही तो. घरची परिस्थिती जेमतेम असतानाच आणखी एक तोंड वाढले. आई-बाबा सहा महिने ऊसतोड करायचे, तर नंतर गावी मोलमजुरी. शिकत शिकत संतोषही मोलमजुरी करून हातभार लावू लागला. मुलीच्या मृत्यूला स्वत:ला जबाबदार धरत वडील मनातून खचले. एक दिवस न सांगताच ते घर सोडून गेले. घरची परिस्थिती आणखी बिकट झाली. सगेसोयरेही उभे करेनासे झाले. संघर्षाचाच काळ होता तो. बरे यात दोष कुणाचा? बहिणीच्या मुलीचा? वडिलांचा की संतोष आणि आईचा? संतोषच्या कुटुंबाचे जवळचे म्हणून आता कोणीच राहिले नव्हते.
संतोषला व्हायचे होते शिक्षक. बारावीपर्यंत शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. पुढे कसे शिकणार? काय होणार बहिणीच्या मुलीचे? समाजात अशा अनेक मुलींचे काय होत असेल? त्यांना कोण सांभाळत असेल? अशा अनेक प्रश्नांनी संतोषची झोप उडाली. याच मुला-मुलींसाठी काम करायचे ठरवून संतोषने घर सोडले. छत्रपती संभाजीनगर तेव्हाचे औरंगाबाद गाठले. काही दिवस नोकरी केली. थोडे पैसे जमवले आणि थेट गेवराई गाठली. अनेकांची भेट घेतली. काय करायचे हे सांगितले. कोणीचे उभे केले नाही. साधारण १५ दिवस असेच गेले. सर्व जण अनोळखी. तेव्हा संतोषचे वय होते १९ वर्षे. गेवराईजवळील केकतपांगरी हे गाव. येथून पहिले मूल संतोषने आणले. या मुलाला आई-वडील कोणीच नव्हते.कायदेशीर प्रक्रिया ठाऊक नव्हती. मुलाला घेऊन संतोष बाहेर पडला. जवळ काहीच नव्हते. आधार देणारेही कोणी नव्हते. तरीही धाडस केले. एका दात्याने जुनी पत्रे दिली. त्याचे गेवराईजवळ शेड उभारले. अशा रीतीने २००४ मध्ये ‘बालग्राम’ या अनाथालयाचा जन्म झाला. नोंदणी २००७ साली केली. मान्यता मिळाली २०११ साली. मदतीसाठी लोकांकडे जायचे तेव्हा ते कागदपत्रे मागायचे. ऑडिट रिपोर्ट आहे का, असे विचारायचे. या लोकांनीच संतोषला शहाणे केले. हळूहळू सर्व कागदपत्रे पूर्ण केली. आज ‘बालग्राम’मध्ये १०७ मुले आहेत. आतापर्यंत साधारण ३०० मुले बाहेर पडली. काही व्यवसाय करतात. काही जण संतोषसोबतच काम करतात. सहा मुलींचे लग्न लावून दिले. काही नोकरी करतात.
संतोषला स्वत:चे लग्न होईल, असे कधीच वाटले नव्हते. कारण नात्यागोत्यात त्याला ‘गेलेली केस’ समजायचे. प्रीती आणि त्याचे लग्न अपघातानेच झाले. प्रीती यवतमाळची. २०११ साली ती संतोषला यवतमाळमध्ये एका शिबिरात ती भेटली. पारध्याच्या मुलाची बालग्राममध्ये येण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात प्रीतीने संतोषला खूप मदत केली. अखेर संतोषनेच तिला लग्नासाठी विचारले. ११ नोव्हेंबर २०११ ला ११ वाजता या दोघांनी लग्न केले. तिच्या घरच्यांना सांगितले. घरच्यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा नोंदणी पद्धतीने विवाह केला. संतोषच्या आईला सांगितले. मग पाहुण्यांना बोलावून आईच्या आग्रहानुसार तिसऱ्यांदा प्रीतीसोबत लग्न केले. महिन्याचा खर्च साधारण तीन लाख रुपयांपर्यंत येत होता. सरकारचे अनुदान एक पैशाचेही नव्हते. तरीही कधी कोणाला उपाशी झोपावे लागले नाही. संतोष म्हणाला, ‘समाजात देणाऱ्यांचे हात खूप आहेत. ते आम्हाला सांभाळत होते. शासकीय नियमानुसार १८ वर्षांपर्यंत आम्ही या मुलांचा सांभाळ करू शकत असू. त्यानंतर पुढे काय? आई नाही, वडील नाही. कुठलेही रक्ताचे नाते नाही. मानवतेच्या नात्यातून त्यांचा सांभाळ करायचा आणि १८ वर्षे वय झाले, की सोडून द्यायचे. त्यांचे पुढे काय होणार? समाज त्यांना स्वीकारणार का? कुठले आई-वडील आपल्याला मुलाला असे रस्त्यावर सोडून देतील? या वयातील मुला-मुलींना आर्थिक, भावनिक मदतीची गरज असते. त्याचे काय होणार?’ मुलांविषयीच्या या चिंतेतून ‘युवाग्राम’चा जन्म झाला. संभाजीनगरच्या मित्रांचा सल्ला घेतला. बालग्रामसाठी जागा दिली, त्यांचाही सल्ला घेतला. स्कूल बससाठी मदत केली होती. त्यांनाही विचारले. सर्वांनाच ते पटले.
२०१८ साली संभाजीनगरला एन-२ मध्ये एक घर भाड्याने घेऊन ‘युवाग्राम’ सुरू केले. त्यावेळी चार मुले होती. या मुलांना सांभाळायचे. सोबत कौशल्याधारित शिक्षण द्यायचे. त्यांना स्वत:च्या पायावर उभे करायचे. यासाठी मोठी जागा हवी होती. १८ वर्षांवरील साधारण १०० मुलांसाठी ‘युवाग्राम’ उभे करण्याचे ठरले. अनेकांच्या मदतीतून दौलताबाद रोडवर शरणापूर परिसरात २०२१ साली जागा घेतली. पत्र्याचे शेड मारून ‘युवाग्राम’चा संसार सुरू केला. याच प्रकल्पाचे भूमीपूजन १७ जानेवारीला होत आहे. संतोष म्हणाला, ‘मूलभूत सुविधा आणि कौशल्य शिक्षण, असा १०० मुलांसाठी हा प्रकल्प उभारण्यासाठी साधारण सात कोटी रुपयांची गरज आहे. तीन टप्प्यांत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात फक्त राहण्याची जागा बांधू. पैसे जसे जमतील तसतसा प्रकल्प पुढे नेला जाईल.’
सध्या बालग्राममध्ये १०७ आणि युवाग्राममध्ये १६, असे १२३ मुलांचे कुटुंब संतोष-प्रीती सांभाळत आहेत. त्यांच्या मदतीला १६ जणांची टीम आहे. मूल हे मूलच असते. आई-बाप नसले तरी मायेची ऊब दिली, तर त्याही मातीच्या गोळ्याला आकार देता येतो, हे संतोष-प्रीती गर्जे या दाम्पत्याने दाखवून दिले आहे.
विदर्भात नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली. पुढे त्याच्या पत्नीलाही तोच सावकारी त्रास. तिनेही आत्महत्या केली. त्यांचा मुलगा सहावीला असताना बालग्राममध्ये आला. युवाग्रामचा हा विद्यार्थी आता पुण्यात एका मोठ्या अभियांत्रिकी महावि द्यालयात एमबीए करत आहे. पार्टटाइम जॉब करत तो त्याचा खर्च स्वत: भागवत आहे. आई- वडील पॉझिटिव्ह. वडील मरण पावले. आई काहीच करू शकत नाही. तो निगेटिव्ह आहे. सोलापूरजवळचा हा मुलगा पाचवीला असताना बालग्राममध्ये आला.थोड्याच दिवसांत तो सीए होईल.
आई-वडील दोघेही पॉझिटिव्ह. दोघेही गेले. सातवीला असतानाच ती बालग्राममध्ये आली. आता ती एमबीबीएस करत आहे. तीन वर्षांत डॉक्टर होईल.
आई-बाप म्हणून जी काही मुलांची काळजी आपण घेतो, ती सर्व काळजी बालग्राम आणि युवाग्राममध्ये घेतली जाते. युवाग्राम या अठरा वर्षांवरील अनाथ बालकांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि पद्मश्री डॉ. मंदाताई आमटे यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी होत आहे. कसा चालतो हा अनाथांचा संसार, एकदा भेट देऊन पाहायलाच हवा. यातल्या एखाद्या मुलाच्या छोट्या जबाबदारीचा भार उचलता येतो का हेही पाहायला हवे. जमले तर ठीक, नाहीतर आहेच ‘हम दो, हमारे दो’चा आपला संसार.
मन मोकळं करता येईल
अशा मनाची माणसं
देवदर्शनानंतर विसावता येईल
अशा राउळांच्या पायऱ्या
आणि नतमस्तक होऊन माथा टेकवता येईल
असे श्रद्धांकित पाय
आजकाल दुर्मीळ झालेयत...
सर्वत्र नकारात्मकता आणि अंधार पसरलेला दिसतोय. या चिंतेतूनच जालन्याचे ज्येष्ठ कवी प्रा. जयराम खेडेकर यांनी प्रसवलेली ही कविता खूप वेदना देते. त्याचवेळी संतोष-प्रीतीसारखे दाम्पत्य भेटतात आणि पणती विझू न देण्याचा आटापिटा करणारेदेखील आहेत, हा आशेचा किरणही दिसतो.
( Gajanan.diwan@lokmat.com )